संशोधनाअभावी बहुगुणी ‘पेंडी’ नामशेष होण्याच्या मार्गावर
1 min read
On the verge of extinction due to lack of research
नोंदींचा अभाव
संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील मोहपा, खुमारी, पिपळा (किनखेडे) तसेच काटोल, नरखेड, सावनेर, अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी तालुक्यातील निवडक शेतकरी आजही पेंडीचे उत्पादन घेतात. नगदी पीक समजल्या जाणाऱ्या पेंडीची पूर्वी शेकडो एकरात लागवड केली जायची. या पिकाचा अधिक काळ, वाढता उत्पादन खर्च, मजुरांची कमतरता, कमी व मर्यादित मागणी, संशोधनाचा अभाव यासह अन्य कारणांमुळे पेंडीची शेती मागे पडत गेली. परिणामी, पेंडीचे लागवड क्षेत्र वर्षानुवर्षे कमी होत चालले आहे. यावर्षी नागपूर जिल्ह्यात जवळपास 100 तर अमरावती जिल्ह्यात 90 एकरात पेंडीची लागवड करण्यात आली होती. पेंडी लागवडीच्या नोंदी कृषी विभागाकडे नाहीत.
धान पट्ट्यात भरीव मागणी
या भागात मकरसंक्रांतीला तीळगुळासोबतच पेंडीलाही महत्त्व दिले जाते. पूर्वी घरोघरी पेंड्या शिजवून खाल्ल्या जायच्या. नवीन पिढी रुचीपालट म्हणूनही पेंड्या खात नाही. धान उत्पादक पट्ट्यात पेंडीला भरीव मागणी असते. काटोल, नरखेड तालुक्यासह अमरावती जिल्ह्यात पेंडीसोबतच ‘मोमना’ आणि ‘नरसिंहपूर’ पेंडीची शेती केली जाते. त्यांचाही वापर मकरसंक्रांतीला केला जातो. संक्रांतीनंतर पेंडी व मोमना कुणीही खरेदी करीत नाही.
पेंडी उत्पादक शेतकरी
मोहपा येथील जयंत खडस्कर, केशव सुपले, रमेश वंजारी, गोपाल रेवतकर, अनंत अंजनकर, हेमंत खडस्कर, शरद सुपले, प्रकाश गणोरकर, शंकर रेवतकर, महेश गणोरकर, खुमारी येथील बाबा दैने, चंद्रशेखर काथवटे, वासुदेव काथवटे, राजू चोरे, शालिक काथवटे, रमाकांत सेवतकर, प्रेमराज केचे, शशिकांत फसाटे, मुरलीधर फसाटे आणि पिपळा (किनखेडे) येथील केशव डेबे, भास्कर रेवस्कर, राजू चैधरी, प्रीतम फुलारे व रामाजी डेबे हे प्रमुख व परंपरागर पेंडी उत्पादक शेतकरी आहेत.
50 रुपये प्रति किलो भाव
पेंडीचे लागवड क्षेत्र घटत चालल्याने त्याचे बेणे नामशेष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पेंड्यांना 2015 ते 2017 या काळात प्रति किलो 10 ते 25 रुपये प्रति किलो भाव होता. सन 2018 व 2019 मध्ये 30 प्रति किलो आणि 2020 ते 2022 या वर्षात प्रति किलो 50 ते 60 रुपये प्रति किलो भाव मिळत असल्याचे पेंडी उत्पादकांनी सांगितले.
औषधी गुणधर्म
पेंडी, मोमना ही फळ ‘डायोस्कोरिसी’ कुटुंबातील तसेच ‘डायोस्कोरिया अलाटा’ वर्गातील आहेत. पेंडीला व्हाईट याम, ग्रेटर याम, लेसर याम असेही म्हणतात. ते मानवी आरोग्यास पोषक असल्याने आयुर्वेदाच्या दृष्टीने त्यातील औषधी गुणधर्म लक्षात घेऊन त्यावर संशोधन होणे व त्याचा प्रसार करणे गरजेचे आहे. पेंड्या अथवा मोमना आधी उकडल्या जातात. त्यानंतर साल काढून त्या दही, दूध, गुळ, साखर व ताकासोबत खातात. पेंड्या उपवासालाही खातात. त्यात 70 टक्के पाण्यासह भरपूर कर्बाेदके व शर्करा असते. मधुर, शीत, बल-वीर्य व दूधवर्धक, कफनाशक व अग्निप्रदीप्त करणारी पेंडी अतिसार, अजीर्ण, श्वेतपदर व अन्य आजारांवर गुणकारी आहे, अशी माहिती आयुर्वेद चिकित्सक डॉ. आसिफ शेख यांनी दिली.
लागवड पद्धती
पुढील हंगामासाठी एप्रिलमध्ये पेंड्यांच्या काही वेली बेणी म्हणून राखून ठेवल्या जातात. त्या सौम्य प्रकाशात सुकविल्या जातात. त्याची मृग नक्षत्रात लागवड केली जाते. त्यासाठी सरी-वरंभा पद्धत अवलंबली जाते. दोन सरींमध्ये दोन ते अडीच फुटांचे अंतर असते. त्या जमिनीत 12 ते 18 इंच खोल गाडून लावल्या जातात. त्याला काळी व भारीची जमीन तसेच भरपूर शेणखत हवे असते. दोन निंदन व पाणी देण्याव्यतिरिक्त काहीही करावे लागत नाही. संक्रांतीपूर्वी 10 दिवसांपासून पेंड्या खोदून काढल्या जातात. त्यासाठी कुशल मजुरांची गरज असते. पेंड्यांचे एकरी 10 टन उत्पादन झाल्यास तसेच प्रति क्विंटल किमान 2,500 रुपये भाव मिळाल्यास पेंड्यांची शेती परवडते. याच पद्धतीने मोमनाची लागवड केली जाते. पेंडी व मोमनाच्या उत्पादन वाढीसाठी सरकारची कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांनी त्यावर संशोधन करणे, सरकारने त्याचा वापर वाढविण्यासाठी प्रचार प्रसार करणे तसेच त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे.
Very good information & need more publications on this to create awareness to save such useful crop