krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

शेतकऱ्यांनो… कापूस विकण्याची घाई करू नका!

1 min read
कापसाचे दर जानेवारी 2022 च्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात प्रति क्विंटल 300 ते 450 रुपये उतरले आहेत. याला आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात प्रति पाऊंड 2 ते 3 सेंटने म्हणजेच 200 ते 250 रुपयांनी उतरलेले दर तसेच पहिल्या आठवड्यात दक्षिण भारतातील वस्त्रोद्योग व कोलकाता एक्स्पोर्टर लॉबीने केंद्र सरकारवर आणलेला दबाव आणि तिरुपूर एक्स्पोर्टर्स असोसिएशनने सोशल मीडियावर व्हायरल केलेले पत्र कारणीभूत ठरले आहे.

‘टीईए’चे पत्र

तिरुपूर एक्स्पोर्टर्स असोसिएशन (टीईए)ने 5 जानेवारी 2022 ला त्यांच्या सदस्यांना पाठविलेले एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल केले. ‘कापसाच्या किमतीत असामान्य वाढ झाल्याने 17 व 18 जानेवारीला युनिट बंद ठेवण्याचा’ निर्णय ‘टीईए’ने या पत्राद्वारे त्यांच्या सदस्यांना कळविला होता. केंद्रीय वस्त्रोद्वोग मंत्रालयाचे सचिव श्री उपेंद्र प्रसाद सिंग यांच्याशी 6 जानेवारीला कापसावरील 11 टक्के आयात शुल्क हटविण्यासह अन्य मुद्यांवर चर्चा करणार असल्याचेही ‘टीईए’ने त्यांच्या सदस्यांना कळविले होते. ‘टीईए’चा निर्णय व मागण्यांचे पत्र देशभर व्हायरल झाल्याने त्याचा कापूस व्यापारी व जिनिंग-प्रेसिंग मालक मानसिकदृष्ट्या थोडे दबावात आले. त्याचा परिणाम कापसाच्या दरावर झाला.

‘जीएम’ बियाण्यांचा मुद्या ऐरणीवर

कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय)चे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी 6 जानेवारीला केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन ‘भारतातील कापसाचे उत्पादन वाढविण्यासाठी कापसाच्या नवीन बियाण्यांना परवानगी देणे, यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयासोबत तताडीने बैठक बोलावणे, जोपर्यंत भारतीय शेतकऱ्यांना कापसाचे नवीन तंत्रज्ञानाने विकसित केलेले बियाणे उपलब्ध करून दिले जात नाही, या बियाण्यांच्या वापरला  परवानगी दिली जात नाही, तोपर्यंत देशातील कापसाचे उत्पादन व उत्पन्न वाढू शकत नाही.’ आदी महत्त्वाच्या मुद्यांवर त्यांनी चर्चा केली. परिणामी, कापसाच्या ‘जीएम’ बियाण्यांचा मुद्या ऐरणीवर आला आहे.

घटते उत्पादन व वाढती मागणी

जागतिक पातळीवर कापसाचे उत्पादन हे त्याच्या मागणी व वापराच्या तुलनेत घटत आहे. ‘यूएसडीए’ (युनायटेड स्टेस्टस् डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅग्रीकल्चर)च्या अहवालानुसार सन 2017-18 मध्ये जगात कापसाचे 269.9 लाख टन उत्पादन झाले होते. यातील 268.8 लाख टन कापूस वापरण्यात आल्याने 1.1 लाख टन कापूस शिल्लक होता. सन 2018-19 मध्ये 258.2 लाख टन कापसाचे उत्पादन झाले असून, 262.3 लाख टन कापूस वापरण्यात आल्याने 4.1 लाख टन कापसाची कमी आली होती. सन 2019-20 मध्ये एकूण 264.2 लाख टन कापसाचे उत्पादन झाले तर यातील  244.4 लाख टन कापूस वापरल्याने 19.8 लाख टन कापूस शिल्लक होता. सन 2020-21 मध्ये 244.2 लाख टन कापसाचे उत्पादन झाले तर 263.2 लाख टन कापूस वापरण्यात आला. त्यामुळे 19 लाख टन कापसाची कमतरता भासली होती. सन 2021-22 मध्ये एकूण 262.2 लाख टन कापसाचे उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या हंगामातील कापसाची मागणी 270.2 लाख टन असल्याने 8 लाख टन कापसाची कमतरता भासणार आहे. शिवाय, मागणी वर्षीचा कापूसही शिल्लक नाही. या काळात कापसाचा वापर सरासरी 2.66 टक्क्यांनी वाढला आहे. कोरोना संक्रमणानंतर जगभरातील सूत व कापड उद्योग सुरळीत होत आहेत. त्यामुळे एकीकडे कापसाचा वापर व मागणी वाढली तर दुसरीकडे उत्पादन घटन्याने जुलै 2021 पासून जगभरात वाढीव दराने कापूस खरेदीचे करार व सौदे होत आहेत.

खोटी आकडेवारी व बाजार नियंत्रण

‘सीएआय’ (कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया)ने सन 2019-20 च्या हंगामात 365 लाख तर सन 2020-21 मध्ये 380 लाख गाठी कापसाचे उत्पादन होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. यात आधीच्या वर्षांचा क्लोसिंग स्टॉक व आयात केलेल्या 15 लाख गाठींचा समावेश होता. वास्तवात, सन 2019-20 मध्ये 335 लाख आणि 2020-21 मध्ये 330 लाख गाठी कापसाचे उत्पादन झाले होते. सन 2021-22 च्या हंगामात जुलै 2021 मध्ये 360.13 लाख गाठी कापसाचे उत्पादन होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. हा अंदाज जानेवारी 2022 मध्ये 340 लाख गाठींवर आला. वास्तवात, कापसाचे 310 ते 315 लाख गाठी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. देशातील कापड उद्योगांची कापसाची मागणी वर्षाकाठी 335 ते 340  गाठींची असून, कापसाच्या वापरात 2.66 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोबतच सन 2020-21 चा कापसाचा क्लोसिंग स्टॉक 60 लाख गाठींचा दाखविण्यात आला असला तरी हा स्टॉक मुळात 4 ते 5 लाख गाठींचा होता. सूत व कापड उत्पादक तसेच व्यापारी सुरुवातीपासूनच मोठ्या आकड्यांवर लक्ष्य केंद्रीत करीत असल्याने या खोट्या आकडेवारीमुळे केंद्र सरकार कापसाचा बाजार व दर नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते. यात कापूस उत्पादकांचे नुकसान कापड उद्योजक व व्यापाऱ्यांची फसगत  होते.

कापसाची आयात-निर्यात

31 जुलै 2020 पर्यंत भारताने 15 लाख गाठी कापसाची आयात केली होती. सीसीआयने आॅक्टोबर 2020 पर्यंत 65 लाख गाठी कापसाची निर्यात केली होती. ही निर्यात 2019-20 च्या तुलनेत 30 टक्के अधिक होती. या काळात कापसाचे दर किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) आसपास किंवा कमी होते. ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 या तीन महिन्यात भारतातून 50 लाख गाठी कापसाची निर्यात करण्यात आली. जानेवारी व फेब्रुवारी 2022 या दोन महिन्यात आणखी 20 लाख गाठी कापसाची निर्यात होणार आहे. आयातीत कापूस देशांतर्गत कापसाच्या तुलनेत महाग पडत असल्याने भारतीय सूत व कापड उद्योजकांनी अद्याप कापसाची आयात केली नाही. देशात कापसाच्या 340 लाख गाठीचे उत्पादन होणार असे मानले आणि त्यात मागच्या वर्षीच्या 5 लाख गाठी समाविष्ट केल्या आणि 70 लाख गाठींची निर्यात लक्षात घेतली तर देशात 275 लाख गाठी कापूस शिल्लक राहतो. देशातील कापड उद्योगाला 340 लाख गाठी कापसाची आवश्यकता असल्यााने यात 65 लाख गाठी कापसाची कमतरता भासणार आहे.

केंद्र सरकार वस्त्रोद्योग व एक्स्पोर्टर्स लॉबीच्या दबावाखाली येण्याची शक्यता तूर्तास कमी आहे. देशात 30 लाख गाठी कापसाची आयात होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी त्याला अद्याप केंद्र सरकारने परवानगी दिली नाही. जागतिक पातळीवर असलेले सध्याचे कापसाचे चढे दर, आयात शुल्क, गाठी पॅकिंग व वाहतुकीच्या खर्चात झालेली वाढ विचारात घेतली तर आयातीत कापूूस महाग पडणार आहे. त्यामुळे कापसाच्या आयातीची शक्यताही थोडी कमी आहे. ‘तेजी-मंदी’ हा बाजाराचा स्वभाव शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला हवा. कापसाच्या दरात पुन्हा तेजी येण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी कापूस विकण्याची घाई न करता बाजारातील कापसाची आवक स्थिर ठेवावी.

4 thoughts on “शेतकऱ्यांनो… कापूस विकण्याची घाई करू नका!

  1. Government of India not interested in agriculture development specialist in cotton , soyabean all products new technology urgently required for farmers picking machine new quality seeds and new pesticides

  2. माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी शेतकऱ्यांना दर्जेदार बोंडअळी मुक्त बियाणे उपलब्ध करून द्यावे त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारेल कृपया याकडे लक्ष द्यावे पुढील खरीप हंगामात चांगले बियाणे उपलब्ध करून द्यावे

  3. कापूस बोंड अळी थांबविण्यासाठी काही उपाययोजना आहे का?…..स्थानिक देशातला कापूस उत्पादक शेतकरी असाच मारणार का?….आणि बाहेरून कापूस आयात करून शेतकऱ्यांचे आत्महत्या वाढीस कारण ठरणार आहात..,.सरकार कृषी मंत्र्यांनी उत्तरे द्यावीत….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!