krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

पाचवीला पुजलेली ‘बोंडअळी-बोंडसड’

1 min read
भारतीय शेतकरी वापरत असलेले कपाशीचे कोणतेही वाण आता कीड प्रतिबंधक राहिले नाही. त्यामुळे एकीकडे कापसाचा उत्पादन खर्च वाढत चालला आहे, तर दुसरीकडे उत्पादनात घट होत असून , कापसाचा दर्जाही खालावत चालला आहे. राज्यात सन 2020-21 च्या खरीप हंगामामध्ये मागील व त्या आधींच्या वर्षाच्या तुलनेत कापसाच्या उत्पादनात 30 ते 42 टक्के घट आली आहे. मात्र, बाजारात सुरुवातीला कापसाच्या दरात तेजीऐवजी मंदीचे सावट होते. व्यापारी किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने कापसाची खरेदी करीत असल्याने बहुतांश शेतकरी कापूस विक्रीसाठी 'सीसीआय' (कॉटन कार्पाेरेशन ऑफ इंडिया) आणि महाराष्ट्र कापूस पणन महासंघाच्या खरेदी केंद्राला प्राधान्य दिले.

महाराष्ट्रात (कोकण विभाग वगळता) सन 2020-21 च्या खरीप हंगामात एकूण 42 लाख 34 हजार 65 हेक्टरमध्ये कपाशीची लागवड करण्यात आली होती. प्रतिकूल व दमट वातावरणामुळे राज्यातील सातही विभागांत सुरुवातीला ‘बोंडसड’ या बुरशीजन्य रोगाचा व नंतर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यात काही प्रमाणात यश आले. मात्र, ‘बोंडसड’चा प्रादुर्भाव पेरणीनंतर 80 ते 90 दिवसांनी झाल्याने बोंडांच्या देठाजवळ काळी बुरशी तयार होऊन बोंडं पक्व होण्यापूर्वी सडली व गळाली. तग धरून राहिलेल्या बोंडांमधील कापूसही काळवंडलेल्याने कपाशीच्या पहिल्या ‘फ्लॅश’चे किमान 45 ते 50 टक्के नुकसान झाले.

‘बोंडसड’चे प्रमाण कमी होते न होते तोच पेरणीनंतर 100 दिवसांनी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे बोंड पूर्ण क्षमतेने फुलले नाही. काहीसे फुललेल्या बोंडांमधील कापसाच्या दोन पाकळ्या किडलेल्या, तर दोन पाकळ्या थोड्या व्यवस्थित होत्या. बोंडअळीमुळे कपाशीच्या दुसऱ्यां’फ्लॅश’चे किमान 28 ते 34 टक्के नुकसान झाले. बोंडसड व गुलाबी बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचे प्रमाण नागपूर विभागात सरासरी 45 टक्के, अमरावती 42  टक्के, औरंगाबाद व लातूर विभागात सरासरी 37 ते 39 टक्के, पुणे 25 ते 27 टक्के, तर कोल्हापूर व नाशिक विभागात ते सरासरी 22 ते 24 टक्के एवढे होते.

‘चिकटा’वर संशोधन आवश्यक

सूर्यकिरणांची प्रखरता कमी होताच बोंडांमधील कापूस चिकट व्हायला सुरुवात व्हायची. बोंडसड व चिकटा हा प्रकार पहिल्यांदाच अनुभवायला मिळाला. त्यामुळे कापूस वेचणीला वेळ लागत असल्याने वेचणीचा खर्च वाढला आहे. गुलाबी बोंडअळीमुळे हा प्रादुर्भाव झाल्याचे कापूस अभ्यासकांनी सांगितले. त्यामुळे या चिकटावर संशोधन करून उपाययोजना शोधून काढणे आवश्यक आहे.

सरकीच्या मुळावर घाला

गुलाबी बोंडअळी कपाशीच्या पुंकेसरसोबत बोंडात शिरून सरकी पोखरते. त्यामुळे सरकीतील स्निग्ध पदार्थ व प्रोटिनचे प्रमाण कमी होते. बोंडातच तिची विष्ठा राहत असल्याने व ती तिथेच कोषात जात असल्याने आत बुरशीचा प्रादुर्भाव होतो. हीच बुरशी पुढे सरकीद्वारे ढेपेत संक्रमित होत असल्याने आणि ती ढेप पशुखाद्य असल्याने गुरांना पोटाचे आजार बळावतात, अशी असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागातील तज्ज्ञांनी दिली. ही बोंडअळी सरकीतील स्निग्ध पदार्थ खात असल्याने यावर्षी तेलाच्या उत्पादनात घट आली. या सरकीपासून तयार होणाऱ्या ढेपेतही बुरशीचे व नंतर जीवाणूचे संक्रमण होत असल्याने सरकी व ढेपेतील पोषण मूल्ये संपतात. ढेपेची टिकून राहण्याची व साठवण क्षमता कमी झाली. भारतातून चीन, बांगलादेश व श्रीलंकेत ढेपेची निर्यात होते. दर्जा खालावल्याने निर्यात तसेच देशांतर्गत बाजारातील ढेपेची किंमत घटली होती.

कापूस-सरकी-तेल यांचे प्रमाण

एक क्विंटल कापसापासून सरासरी 63.5 किलो सरकी मिळते. एक क्विंटल सरकीपासून 13 किलो तेल, 82 किलो ढेप व तीन किलो साबण तयार करण्यासाठी वापरले जाणारे उत्पादन मिळते. या प्रक्रियेत दोन किलोची तूट येते. गुलाबी बोंडअळीमुळे तेलाचे उत्पादन 13 किलोवरून साडेनऊ ते 10 किलोवर आले आहे. त्याचा परिणाम सरकीच्या भावावर झाला. मागील वर्षी (सन 2019-20) सरकीचे दर 1,800 ते 2,300 रुपये प्रतिक्विंटल होते. कोरोना संक्रमण व ‘लॉकडाऊन’मुळे ढेपेची मागणी घटली होती. यावर्षी सरकीच्या दरात वाढ अपेक्षित असताना ते 1,850 ते 2,200 रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर होते. सरकीतील तेलाचे प्रमाण घटल्याने ही स्थिरता आली होती.

गुरांच्या आरोग्यावर परिणाम

ढेपेतील बुरशी व जीवाणूमुळे गुरांना विषबाधा होण्याची शक्यता असून, दुधाचे प्रमाण कमी होते. गुरांची पचनशक्ती चांगली राहत असल्याने हा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवत नाही. त्यामुळे त्याच्यावर फारसे संशोधनही होत नाही. बुरशी व जीवाणूमुळे गुरांना ‘ऑक्झेलेट पॉयझनिंग’ होत असून, यात गुरांना उत्सर्जन क्रियेचा त्रास होतो, अशी माहिती पशुसंवर्धन विभागातील तज्ज्ञांनी दिली.

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव व नुकसानीचे प्रमाण वर्षानुवर्षे वाढत आहे. या गुलाबी बोंडअळीमुळे कापसाच्या उत्पादनात घट, वाढलेला खर्च, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात खालावलेला कापसाचा दर्जा, ढेपेद्वारे गुरांना होणारे आजार, अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. जगात गुलाबी बोंडअळीला प्रतिबंधक असलेले जनुकीय तंत्रज्ञानाने (GM Seed) विकसित केलेले कपाशीचे वाण वापरले जात आहे. भारतात मात्र या जनुकीय तंत्रज्ञान बियाण्यांच्या वापरावर सरकारने बंदी घातली आहे.

2 thoughts on “पाचवीला पुजलेली ‘बोंडअळी-बोंडसड’

  1. अतिशय समर्पक आणि अभ्यासपूर्ण लेख. शेतकरी नक्कीच प्रभावित होऊन विचार करतील….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!