krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

बीटी वांग्याची लागवड करणार!

1 min read
Bt eggplant : यावर्षी काही शेतमालाला चांगले दर मिळू लागताच केंद्र सरकारने वायदे बाजारात हस्तक्षेप करून काही शेतमालांच्या वायद्यांवर बंदी घातली आहे. बीटी वांगी व इतर पिकांच्या जीएम बियाण्यांवर बंदी घालून भारतीय शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य नाकारले आहे. याच्या विरोधात शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्ष सत्याग्रह करणार असून, बीटी वांग्याची लागवड करणार आहे, अशी माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी पुणे येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली.

Bt eggplant :

यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. परिणामी, सोयाबीनला चांगले दर मिळत होते. मात्र, पोल्ट्री उद्योजकांच्या दबावामुळे सरकारने सेबी (SEBI) मार्फत सोयाबीनसह इतर आठ शेतमालांच्या वायदे बाजारातील सौद्यावर बंदी घातली आहे. शेतकर्‍यांना दोन पैसे नफा मिळण्याची परिस्थिती निर्माण झाली की, सरकार नेहमीच अशा प्रकारे शेतमाल बाजार व व्यापारामध्ये हस्तक्षेप करून भाव पाडते. आता टेक्सटाईल लॉबी कापसाचे दर पाडणयासाठी सक्रीय झाली आहे. सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, यासाठी आपण केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र दिले आहे, असेही अनिल घनवट यांनी सांगितले.

बीटी वांग्याची लागवड करणार

जगभर जनुकीय अभियांत्रिकी (जीएम) तंत्रज्ञानाला मान्यता मिळाली असून, या तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या विविध पिकांच्या बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. मात्र, भरतात या तंत्रज्ञानाला बंदी घातली आहे. जीएम तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या पिकांच्या चाचण्या घेऊन मान्यता देण्यासाठी असलेली सरकारी संस्था जी.ई.ए.सी.ने भारतात तयार केलेल्या बीटी वांग्याच्या चाचण्या घेऊन ते पर्यावरण, जनावरे व मणुष्यास हानीकारक नसल्याचा निर्वाळा देत मान्यता दिली होती. मात्र, काही गटांच्या दबावाला बळी पडून 2010 मध्ये बीटी वांग्याच्या चाचण्या व उत्पादन घेण्यास सरकारने बंदी घातली आहे. शेतकरी संघटनेने अनेक वेळा विनंती करून ही सरकार बंदी हटवायला तयार नाही. सरकारच्या या आडमुठ्या भूमिकेच्या विरोधात स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटना कायदे भंग करून सत्याग्रह करणार आहे. सरकारने ही बंदी न हटविल्यास दि. 17 फेब्रुवारीला अनिल घनवट यांच्या शेतात बीटी वांग्याची जाहीर लागवड करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

शेती सुधारणांबाबत स्वतंत्र भारत पक्षाने खुल्या पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेल्या मागण्या

❇ देशाच्या कृषिधोरणाबाबत एक श्वेतपत्रिका तयार करण्यात यावी.
❇शेतमाल बाजार व व्यापारातील सरकारचा  हस्तक्षेप बंद करावा.
❇ शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य देण्यात यावे.

केंद्र सरकारने भारतात झिरो बजेट शेतीवर जास्त भर देण्याचे ठरविले आहे. मात्र, हा प्रयोग देशाला उपासमारीकडे घेउन जाईल. झिरो बजेट शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने बजेट खर्च करण्याऐवजी सरकारने, महाग झालेली रासायनिक खते शेतकर्‍यांना कमी किमतीत देण्यासाठी खर्च करावे, असेही स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी सांगितले.

(मा. पंतप्रधान व चेअरमन SEBI यांना पाठवलेले पत्रे swatantra.org.in या संकेत स्थळावर, Agriculture या विभागात पहायला मिळेल.)

1 thought on “बीटी वांग्याची लागवड करणार!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!