October Heat : यंदा ऑक्टोबर ‘हीट’चा तडाका अधिकच
1 min read
October Heat : संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून (Monsoon) त्याच्या सरासरी तारीख 10 ऑक्टोबर ऐवजी 2 दिवस अगोदर म्हणजे 8 ऑक्टोबरला निघून गेला. येत्या 5-6 दिवसांत म्हणजे 15 ऑक्टोबर या त्याच्या सरासरी तारखेला देशातून निघून जाण्याची शक्यता जाणवते. सध्या महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या (October) दुसऱ्या आठवड्यातच महाराष्ट्रात दुपारच्या उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. दरवर्षी महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात साधारण 32 ते 34 डिग्री असते. परंतु महाराष्ट्रात दुपारच्या 3 चे सध्याचे कमाल तापमान वेगवेगळ्या भागानुसार म्हणजे खानदेश, पूर्व विदर्भ व उत्तर कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात त्यांच्या सरासरी कमाल तापमानापेक्षा अंदाजे 2 ते 7 डिग्रीने वाढलेले जाणवत आहे. मुंबई (सांताक्रूझ ) व रत्नागिरी येथे तर गुरुवारी (दि. 8 ऑक्टाेबर) उष्णतेच्या लाटेची स्थिती जाणवली.
🔶 वेगवेगळ्या भागानुसार कमाल तापमान (वाढ) तफावत
🔆 मुंबईसह संपूर्ण कोकणात गुरुवार (दि. 8 ऑक्टाेबर)चे कमाल तापमान 33 ते 38 डिग्री (2 ते 7 डिग्रीने वाढ) जाणवले.
🔆 मध्य महाराष्ट्रातील खानदेश व नाशिक ते सोलापूरपर्यंतच्या 10 जिल्ह्यात सध्याचे कमाल तापमान 34 ते 38 डिग्री (2 ते 4.5 डिग्रीने वाढ)
🔆 मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत सध्याचे कमाल तापमान 34 ते 36.6 डिग्री (2 ते 4.5 डिग्रीने वाढ) जाणवले.
🔆 विदर्भातील 11 जिल्ह्यांत सध्याचे कमाल तापमान 35 ते 39 डिग्री (2 ते 6.2 डिग्रीने वाढ).
🔶 किमान तापमानाचा आढावा व रात्रीचा उकाडा
त्यामानाने पहाटेच्या किमान तापमानात विशेष वाढ जाणवत नसून महाराष्ट्रात शुक्रवारी (दि. 9 ऑक्टाेबर) केवळ अलिबाग येथे 27.6 डिग्री किमान तापमानाची नोंद झाली असुन ही सरासरीपेक्षा 3 डिग्रीने अधिक आहे. अलिबाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात रात्रीचा उकाडा जाणवत नाही. शुक्रवार दि. 16 ते गुरुवार दि. 22 ऑक्टोबरपर्यंतच्या आठवड्यात मात्र महाराष्ट्रात रात्रीचा उकाडाही जाणवेल.
🔶 ऑक्टोबर हीटचा प्रभाव
मंगळवार दि. 20 ऑक्टोबर (दसऱ्या) पासून दिवसाच्या कमाल तापमानात घसरण होवून महाराष्ट्रात काहीसा दिलासा मिळू शकतो, असे वाटते. यंदा ऑक्टोबर महिन्यातही अधिक तीव्रतेची उष्णता जाणवत आहे. याची कारणे पुढीलप्रमाणे
🔆 एल-निनोमुळे कमी झालेला पाऊस.
🔆 भारत मध्यावर, उत्तर गुजरात ते पश्चिम बंगाल दरम्यान तयार झालेली उच्च दाबाची पोळ, त्यामुळे महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 4 ते 6 हेकटापास्कलने वाढलेला हवेचा दाब (सरासरी 1008 ते 1010. परंतु सध्या 1012 ते 1014 हेकटापास्कल आहे.)
🔆 उत्तर भारतातून वायव्य दिशेने ताशी 20 ते 25 किमी वेगाने उष्ण व कोरडे वारे महाराष्ट्रात येताच ते वळण घेऊन पूर्वेकडून पश्चिमकडे अरबी समुद्राकडे वाहत आहे. त्यामुळे समुद्री थंड वाऱ्यांना अटकाव होत आहे.
🔆 निरभ्र आकाशामुळे सूर्याची किरणे संपूर्ण दिवस लांबीत आपली उष्णता ओकत आहे.
🔶 चक्रीवादळ वा पावसाची शक्यता
येत्या नजीकच्या काळात म्हणजे पुढील 2 आठवड्यात भारत समुद्रीय परिक्षेत्रात चक्रीवादळाची शक्यता व महाराष्ट्रात पावसाची शक्यता जाणवत नाही.
🔶 मुंबईतील सध्याच्या अधिक उष्णतेची कारणे
जेव्हा देशावर मोठ्या व्यापक प्रत्यावर्ती वारा प्रणालीमुळे हवेचा दाब अधिक काळापर्यंत शहरावर टिकून राहतो, तेव्हा या किनारपट्टी शहरातील खारा-मतलई वाऱ्याच्या वहनावर हवेच्या दाबामुळे रोध तयार होतो. त्यामुळे दुपारी 4 नंतर भू-भागावर थंडावा होणे व सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत जाणवणारा आल्हाददायकपणा यावर परिणाम होतो. त्यामुळे एकूणच शहराच्या उष्णतेत वाढ होते. मुंबई असे बेट आहे की, सर्वसाधारण समुद्रसपाटीपेक्षा खोली अधिक असल्यामुळे हवेच्या उच्च दाबाचा डोंगर म्हणजेच हवेच्या दाबाची उंची अधिक असते. त्यामुळे उष्णतेचा परिणाम अधिक जाणवतो. मान्सून निघून गेलेला असतो. आकाश निरभ्र असते. उष्णता अधिक जमिनीवर पोहचते. हवा कोरडी होते. आर्द्रता कमी होवून 70 टक्क्यांपर्यंत येते. कमाल तापमान 30 ते 34 डिग्री दरम्यान असते. पाऊस शक्यतो होत नाही. कारण सरासरी 7 ते 8 सेमी असते. दिवसाचे 12 तास पूर्ण उष्णता मिळते. किनारपट्टीवरून वाहणारे दैनिक खारे वारे संथ झाल्यामुळे समुद्राचा थंडावा उशिरा मुंबईच्या भू-भागावर पोहचतो. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये मुंबई अधिक तापते व जीवाची घालमेल होते. यावर्षी तर ऑक्टोबरमध्ये कमाल व किमान दोन्हीही तापमाने सरासरीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे ऑक्टोबर हीट (Heat) चांगलीच जाणवणार, असे वाटते.