Drought Rainfall Deficit : काेरडा दुष्काळ; पावसाच्या सरासरीऐवजी खंड महत्त्वाचा!
1 min read
Drought Rainfall Deficit : राज्य सरकारने उशिरा का हाेईना राज्यातील 34 पैकी 32 जिल्ह्यांमधील आधी 265 आणि नंतर 40 अशा एकूण 305 तालुक्यांमध्ये तीव्र दुष्काळाची (Drought) घाेषणा केली आणि त्याबाबतचा पहिला शासन निर्णय 25 सप्टेंबर 2026 राेजी व दुसरा 14 ऑक्टाेबर 2026 राेजी जाहीर केला. त्यापूर्वी दुष्काळ जाहीर करण्याबाबतची सत्ताधारी मंत्र्यांची नाटके सुरू हाेती. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 12 सप्टेंबर 2026 राेजी नागपुरातील एका पत्रपरिषदेत राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे सांगितले हाेते, हे या नाटकांचे एक महत्त्वाचे उदाहरण हाेय. दुष्काळ आणि दुष्काळसदृश परिस्थिती या दाेन शब्दांमधील फरक मंत्र्यांना कळू नये, याबाबत नवल वाटणे स्वाभाविक असले तरी ती सरकारची एक स्ट्रॅटेजी हाेती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 23 सप्टेंबर 2026 राेजी मराठवाड्यातील लातूर व धाराशिव आणि 24 सप्टेंबर 2026 राेजी विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. त्यांना पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या अगतिकतेला तर दुसऱ्या दिवशी राेषाला सामाेरे जावे लागल्याने शेवटी सरकारने काेरड्या दुष्काळाचा शासन निर्णय जाहीर केला. या निर्णयात नेहमीप्रमाणे पावसाच्या तुटीला (Deficit) थाेडेफार महत्त्व दिले असले तरी पावसाच्या (Rainfall) खंडाला (Break) मुळीच स्थान व महत्त्व दिले नाही.
🔶 प्रांतनिहाय पावसाची तूट
हवामान विभाग – सरासरी पाऊस – प्रत्यक्ष पाऊस – तूट
🔆 कोकण-गाेवा :- 2870.6 मिमी – 2443.0 मिमी – -15%
🔆 मध्य महाराष्ट्र :- 677.4 मिमी – 633.4 मिमी – -7%
🔆 मराठवाडा :- 642.8 मिमी – 389.6 मिमी – -39%
🔆 विदर्भ :- 937.3 मिमी – 687.3 मिमी – -27%
🔶 विभागनिहाय पावसाची तूट
विभाग – सरासरी पाऊस – झालेला पाऊस – पावसाची तूट
🔆 काेकण – 2868.2 – 2592.4 – 9.6
🔆 नाशिक – 707.1 – 466.1 – 34.1
🔆 पुणे – 945.0 – 648.6 – 31.1
🔆 छ. संभाजीनगर – 679.5 – 446.1 – 34.3
🔆 अमरावती – 749.8 – 522.6 – 30.3
🔆 नागपूर – 1072.5 – 789.7 – 26.4
🔶 जिल्हानिहाय पावसाची तूट
जिल्हा – पावसाची तूट
🔆 सोलापूर :- सुमारे -59%
🔆 बीड :- सुमारे -49%
🔆 हिंगोली :- सुमारे -49%
🔆 जालना :- सुमारे -48%
🔆 अहिल्यानगर :- सुमारे -47%
🔆 धाराशिव :- सुमारे -45%
🔆 अमरावती :- सुमारे -43%
🔆 अकोला :- सुमारे -42%
🔆 वाशिम – -37%
🔆 नागपूर – -34%
🔆 वर्धा – -34%
🔆 चंद्रपूर – -33%
(ही आकडेवारी 1 जून ते 30 सप्टेंबर या चार महिन्यांतील आहे.)
♻️ परतीच्या पावसाने केला सरकारचा अपेक्षाभंग
परतीच्या प्रवासात मान्सून महाराष्ट्राला चांगला पाऊस देईल आणि पावसाची तूट कमी हाेऊन दुष्काळ जाहीर करण्यात आपल्याला पळवाटा काढता येईल, असा अंदाज राज्य सरकारने लावला हाेता. वास्तवात, मान्सूनने पश्चिम राजस्थानातून 19 सप्टेंबर 2026 पासून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आणि 8 ऑक्टोबर 2026 रोजी महाराष्ट्रातून पूर्णपणे बाहेर पडला. याच काळात शेतकऱ्यांचा राेष उफाळून आला, साेबतच परतीचा मान्सून काेरडा गेल्याने राज्यातील पावसाची तूट कमी हाेण्याऐवजी वाढली व मान्सूननेही सरकारचा अपेक्षाभंग केीला.
♻️ मातीचा पाेत आणि पाण्याचा ताण
दुष्काळ जाहीर करताना सरकारने पावसाच्या सरासरीऐवजी पावसाचा खंड, शेतजमिनीचा हलका, मध्यम व भारी काळी हा पाेत, याच जमिनीतील पिकांची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता व त्यातून होणारे पिकांचे नुकसान विचारात घेणे आवश्यक आहे. यावर्षी कोकणातील पाच जिल्हे वगळता राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट 29 ते 59 टक्के तर पावसाचा खंड 29 ते 52 दिवसांचा आहे. राज्यातील 45 टक्के शेतीक्षेत्र हलक्या प्रतीचे असून, 35 टक्के मध्यम प्रतीचे आणि 20 टक्के शेतजमीन ही भारी काळीची आहे. राज्यातील 79 टक्के शेती कोरडवाहू तर 21 टक्के शेती ओलिताखाली आहे. हलक्या जमिनीतील पिके 5 ते 12 दिवसांचा पाण्याचा ताण सहन करू शकतात तर मध्यम प्रतीच्या जमिनीतील पिके 8 ते 16 दिवसांचा आणि भारी काळी जमिनीतील पिके 10 ते 25 दिवसांचा पाण्याचा ताण सहन करू शकतात. राज्यातील 29 जिल्ह्यांमधील सर्वच पिकांना किमान 29 आणि कमाल 52 दिवसांचा पाण्याचा ताण सहन करावा लागल्याने हलक्या व मध्य प्रतिच्या जमिनीतील पिके करपली व पिकांसाेबतच व शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे काेरडा दुष्काळ जाहीर करताना विविध पिकांना त्यांच्या विविध अवस्थेत बसलेला पाण्याचा ताण, प्लांट फिजिऑलाॅजी व कृषिविज्ञान विचारात घेणे अत्यावश्यक आहे.
♻️ पावसाची अट नको
कोरड्या दुष्काळासाठी एनडीआरएफ (NDRF – National Disaster Response Force)च्या निकषानुसार पावसाची तूट 60 टक्क्यांपेक्षा अधिक आणि सलग 3 ते 4 आठवड्याचा खंड असे दोन महत्त्वाचे नियम सरकारने लावले आहेत. राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट 60 टक्क्यांपेक्षा कमी असली तरी हा कमी दिवसांत अधिक आलेला पाऊस असून, सरकार व प्रशासन देत असलेली पावसाची आकडेवारी ही सरासरी आहे. त्यामुळे या पावसाचा पिकांना फारसा फायदा झाला नाही. महसूल मंडळांच्या गावांमध्ये लावलेले पर्जन्यमापक यंत्र त्यांच्या अवतीभवतीचा पाऊस मोजतात. या यंत्रांपासून अर्धा किमी व त्यापेक्षा अधिक अंतरावरील पाऊस मोजला जात नसल्याने पावसाची ही सरासरी गावातील असून, शेतातील नाही.
🔶 पीक व जमीननिहाय नुकसानीची टक्केवारी
पीक – हलकी – मध्यम – भारी काळी
🔆 कापूस – 75 ते 85 – 45 ते 55 – 25 ते 35
🔆 साेयाबीन – 95 ते 100 – 70 ते 80 – 45 ते 55
🔆 धान – 80 ते 100 – 65 ते 75 – 50 ते 60
🔆 तूर – 65 ते 75 – 40 ते 50 – 15 ते 25
🔆 मका – 90 ते 100 – 65 ते 75 – 35 ते 45
🔆 मूग – 80 ते 90 – 55 ते 65 – 30 ते 40
🔆 उडीद – 85 ते 95 – 60 ते 70 – 35 ते 45
🔆 ज्वारी – 85 ते 95 – 50 ते 60 – 25 ते 35
(आकडे टक्क्यांमध्ये %)
♻️ पावसाचा खंड आणि पिकांची खुंटलेली वाढ
यावर्षी काेकण वगळता संपूर्ण राज्यात कमी-अधिक प्रमाणात पावसाचा सलग 29 ते 52 दिवसांचा खंड राहिला आहे. खरीप पिकांना पाण्याचा हा दीर्घ ताण असह्य असल्याने तसेच हवेच्या सरासरी तापमानात थाेडी वाढ झाल्याने साेयाबीन व तत्सम 90 ते 110 दिवसांच्या कालावधीची पिके करपली असून, तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीची कापूस व तत्सम पिकांची वाढ खुंटली आहे. महत्त्वाच्या काळात काेणत्या ना काेणत्या कारणाने पिकांची वाढ खुंटल्यास त्याचे परिणाम त्या पिकाच्या उत्पादनावर हाेताे, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. पावसाचा खंड व तूट यामुळे बहुतांश पिकांच्या नुकसानीची तीव्रता 35 ते 90 टक्क्यांवर पाेहाेचली तसेच पाण्याअभावी रब्बी हंगाम व फळबाग संकटात सापडल्या आहेत.
🔶 पाण्याचा ताण व उत्पादनातील घट
पीक – उत्पादनातील घट
🔆 साेयाबीन – 70 ते 95 टक्के
🔆 कापूस – 55 ते 80 टक्के
🔆 धान – 80 ते 98 टक्के
🔆 तूर – 45 ते 70 टक्के
🔆 मका – 75 ते 95 टक्के
🔆 ज्वारी – 40 ते 80 टक्के
🔆 बाजरी – 35 ते 75 टक्के
(सलग 20 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस पाण्याच्या ताणामुळे विविध अवस्थेतील पिकांचे नुकसान)
🔶 विभागनिहाय पावसाचा सलग खंड
विभाग – पावसाचा खंड
🔆 नाशिक – 26 ते 44 दिवस
🔆 पुणे – 35 ते 43 दिवस
🔆 छ. संभाजीनगर – 30 ते 45 दिवस
🔆 अमरावती – 21 ते 49 दिवस
🔆 नागपूर – 18 ते 36 दिवस
♻️ मराठवाडा, पश्चिम विदर्भात विदारक चित्र
पावसाची सर्वाधिक 58.6 टक्के तूट साेलापूर जिल्ह्यात असून, त्याखालोखाल नंदूरबार जिल्ह्यात 57.7 टक्के, लातूर जिल्ह्यात 55.9 टक्के, परभणी जिल्ह्यात 52.3 टक्के, अमरावती जिल्ह्यात 50.3 टक्के, काेल्हापूर जिल्ह्यात 49.7 टक्के एवढी तूट आहे. संपूर्ण मराठवाडा व पश्चिम विदर्भ, अहिल्यानगर, नंदूरबार या जिल्ह्यांमधील चित्र अत्यंत विदारक आहे. विभाग व जिल्हानिहाय पावसाची तूट व खंड विचारात घेता आकडे थाेडे लहान वाटत असले तरी महसूल विभागाच्या मंडळनिहाय हेच आकडे माेठे व चिंताजनक आहेत. विषम पाऊस हे यंदाचे पावसाळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले आहे.
♻️ सरासरी आकडेवारी शेतकऱ्यांसाठी घातक
महाराष्ट्रातील प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्र नसल्याने पावसाची गावनिहाय आकडेवारी व कमी – अधिक पावसाचे प्रमाण समाेर येत नाही. सरकार महसूल मंडळनिहाय पावसाचे आकडे जाहीर करते. पर्जन्यमापक यंत्र महसूल मंडळाच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ लावलेले असते. ते यंत्र त्याच्या 250 मीटर अंतरावरील पाऊस माेजत नाही. मग, त्या महसूल मंडळातील यंत्रापासून 12 ते 15 किमी अंतरावरील विविध गाव व शिवारातील पाऊस कसा माेजेल? हे कळायला मार्ग नाही. सरकार दुष्काळ व नुकसान भरपाई जाहीर करताना पावसाच्या सरासरी आकडेवारीचा हवाला देते. ही सरासरी आकडेवारी कमी पाऊस झालेल्या गावांमधील शेतकऱ्यांची अत्यंत घातक तर सरकार व अधिक पाऊस झालेल्या गावांमधील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. पावसाचे दिवस कमी हाेत असताना याला सरकार महत्त्व द्यायला तयार नाही. ‘यंदा पावसाच्या प्रमाणात जिल्हानिहाय माेठी तफावत दिसून येते. काही जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक तर अनेक जिल्ह्यांमध्ये 40 ते 50 टक्के कमी पाऊस आहे. त्यामुळे पावसाचे विश्लेषण केवळ राज्याच्या सरासरीवर न करता विभाग, जिल्हा आणि पाणलोट क्षेत्रनिहाय करणे आवश्यक आहे’, असे मत हवामान साक्षरता अभियानाचे मुख्य प्रबंधक राहुल पाटील यांनी व्यक्त केले.
©️ मातीतलं विज्ञान