krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Water Potential & Crops : वॉटर पोटेन्शियल समजलं नाही तर मेहनत पाण्यात!

1 min read

Water Potential & Crops : बागायतदार बंधूंनो, तुम्ही उन्हाळी पिके (Crops) घेताय? तर मग हा लेख तुमच्यासाठी जीवनदान ठरू शकतो. आपण पिकांना महागडी खते देतो, महागड्या औषधांची फवारणी करतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, खते आणि कीटकनाशकांपेक्षाही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उन्हाळ्यात पिकांना ‘किती, केव्हा आणि कसे’ पाणी द्यावे? जर पाण्याचे गणित चुकले, तर तुमची सर्व गुंतवणूक वाया जाऊ शकते. उन्हाळ्याच्या या तीव्र चटक्यात प्रत्येक बागायतदाराने योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी हे जल-विज्ञान समजून घेणे काळाची गरज आहे. उन्हाळ्याच्या कडक उन्हात शेतात उभं राहिल्यावर एक दृश्य वारंवार डोळ्यासमोर येतं, माती ओलसर असते, ड्रिप चालू असते, खतं वेळेवर दिलेली असतात… पण तरीही पिकांची पानं वाकलेली, रंग फिकट पिवळसर आणि वाढ खुंटलेली दिसते. शेतकरी गोंधळात पडतो, ‘पाणी तर देतोय… मग पिकं अशी सुकलेली आणि तहानलेली का दिसतात?’ हा प्रश्न केवळ निरीक्षणाचा नाही, तर तो शेतीच्या सर्वात खोल विज्ञानाशी जोडलेला आहे. याचं उत्तर आहे, ’वॉटर पोटेन्शियल’ (Water Potential).

📍 मात्रा महत्त्वाची की उपलब्धता?
आजपर्यंत आपण पाण्याकडे फक्त ‘मात्रा’ (Quantity) म्हणून पाहिलं. किती लिटर पाणी दिलं, ड्रिप किती तास चालवली… पण शेतीत खरी जादू मात्रात नसून, ती पिकाला मिळणाऱ्या ‘उपलब्धतेत’ आहे. मातीमध्ये पाणी असणं आणि ते पिकाच्या मुळांनी प्रत्यक्षात उचलणं, या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. या दोन टोकांमधील दुवा म्हणजेच ‘वॉटर पोटेन्शियल’. वॉटर पोटेन्शियल म्हणजे सोप्या भाषेत पाण्याचा प्रवाह निर्माण करण्याची ताकद. पाणी नेहमी जास्त ऊर्जेच्या (High Potential) ठिकाणाहून कमी ऊर्जेच्या (Low Potential) ठिकाणी वाहते. मातीतून मुळांकडे, मुळांतून खोडाकडे, तिथून पानांत आणि शेवटी बाष्परूपाने वातावरणात. ही एक अखंड साखळी आहे. या साखळीत कोठेही अडथळा आला की पाणी थांबतं आणि पिकं पाणी असूनही तहानलेली राहतात.

📍 पिकांच्या तहानलेली राहण्याची तीन मुख्य कारणे
🔆 पाण्याचा दाब (Turgor Pressure)
जेव्हा झाडाच्या पेशी पाण्याने काठोकाठ भरलेल्या असतात, तेव्हा त्यात एक दाब तयार होतो ज्याला ‘टर्गर प्रेशर’ म्हणतात. हा दाब पानांना ताठ आणि टवटवीत ठेवतो. जेव्हा पाणी असूनही मुळं ते शोषू शकत नाहीत, तेव्हा हा दाब घटतो आणि पानं त्वरित वाकतात.
🔆 उत्सर्जनाचा अतिरेक (Transpiration)
उन्हाळ्यात तापमान 35-40 अंशांच्या पुढे गेले की पानांवाटे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होते. जर पानातून उडून जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण आणि मुळांकडून येणाऱ्या पाण्याचा पुरवठा यात ताळमेळ बसला नाही, तर झाड ‘स्ट्रेस’ (तणाव) मध्ये जाते.
🔆 वहनातील अदृश्य अडथळे (Hydraulic Resistance)
काही वेळा मातीमध्ये पाणी असते, पण ते मातीच्या कणांना इतके घट्ट चिकटलेले असते (विशेषतः चिकणमातीत) की मुळांना ते खेचता येत नाही. त्यातच जर मातीचा EC (क्षारता) वाढला असेल, तर उलट प्रक्रिया सुरू होते. मुळांना पाणी मिळण्याऐवजी मुळांतील पाणी मातीकडे खेचले जाते. यालाच ‘ऑस्मोटिक स्ट्रेस’ म्हणतात, जो पिकांसाठी कर्दनकाळ ठरतो.

📍 प्रत्यक्ष अनुभव : डाळिंब बागेचा धडा
अनेक बागायतदारांचा अनुभव असतो की, ड्रिपने नियमित पाणी आणि खते देऊनही डाळिंबात नर फुलांची संख्या वाढते, पाने पिवळी पडतात. कारण समस्या खतांची नसते, तर ती जमिनीतील क्षारांची आणि वॉटर पोटेन्शियलची असते. अशा वेळी संपूर्ण बागेला एकदा ‘फ्लड’ (भरपूर) पाणी देऊन जमीन तृप्त केली, तर साचलेले क्षार खाली निघून जातात, मातीचा खोल भाग ओला होतो आणि झाडं अचानक ताजीतावानं होतात. कोणताही अतिरिक्त खर्च न करता मिळालेला हा बदल विज्ञानाच्या योग्य वापराचा परिणाम आहे.

📍 उन्हाळ्यातील संकटाची लक्षणे
🔆 पाने वाट्यासारखी वाकणे – हे झाडाने स्वतःचे बाष्पीभवन रोखण्यासाठी केलेले प्रयत्न आहेत.
🔆 फुलगळ आणि फळांची कमी वाढ – तणावाखालील झाड स्वतःचे पुनरुत्पादन (Reproduction) थांबवते, ज्यामुळे डाळिंब, टोमॅटो आणि भाजीपाल्यात नर फुले वाढतात आणि सेटिंग कमी होते.
🔆 रोगप्रतिकारशक्ती कमी होणे – पाणी कमी पडले की झाड कमकुवत होते, ज्यामुळे व्हायरस, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.

📍 बागायतदारांसाठी सुवर्ण उपाय
🔆 पाण्याचे नियोजन – फक्त ड्रिपवर अवलंबून न राहता उन्हाळ्यात मधूनच संपूर्ण रान ओलं करणे (Leaching) गरजेचे आहे, जेणेकरून मुळांचा विस्तार वाढेल.
🔆 वेळेचे महत्त्व – पाणी नेहमी पहाटे किंवा सायंकाळी द्यावे. भर उन्हात पाणी दिल्यास जमिनीचे तापमान वाढून मुळांना इजा होऊ शकते.
🔆 मल्चिंग (आच्छादन) – जमिनीवर पालापाचोळा किंवा मल्चिंग पेपरचा वापर केल्यास माती थंड राहते आणि बाष्पीभवन रोखले जाते.
🔆 खत व्यवस्थापनात पोटॅशचा वापर – पोटॅशियम हा घटक झाडांमधील पाण्याचा तोल (Osmotic regulation) राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
🔆 पूरक फवारणी – पिकांची तणाव सहन करण्याची शक्ती वाढवण्यासाठी अमिनो ॲसिड किंवा सीवीड एक्स्ट्रॅक्टची फवारणी फायदेशीर ठरते.

थोडक्यात सांगायचे तर… आजची शेती ही केवळ कष्टावर नाही, तर विज्ञानावर आधारलेली आहे. ‘पाणी देणे ही एक सवय आहे, पण पाणी उपलब्ध करून देणे ही एक कला आहे.’ हे सूत्र ज्या शेतकऱ्याला समजले, तो उन्हाळ्यातही आपली शेती हिरवीगार ठेवू शकतो. वॉटर पोटेन्शियल समजून घेऊन पाण्याचे योग्य नियोजन करणे, हीच खऱ्या समृद्धीची गुरुकिल्ली आहे.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!