krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

MSP, Soybean Growers Losses ₹Five Crore : एमएसपी नावालाच; सोयाबीन उत्पादकांचे पाच हजार कोटींचे नुकसान

1 min read

MSP, Soybean Growers Losses ₹Five Crore : सरकार व सत्ताधारी नेत्यांकडून शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीत (MSP – Minimum Support Price) वाढ केल्याचे ढाेल बढवले जात आहे. मात्र, केंद्र व राज्य सरकार एकूण उत्पादनाच्या किती टक्के शेतमाल एमएसपी दराने खरेदी करते, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. सरकारने सन 2025-26 च्या हंगामात देशभरात एकूण उत्पादनाच्या 15.87 टक्के तर महाराष्ट्रात 12.54 टक्के साेयाबीन एमएसपी दराने खरेदी केले. या हंगामात साेयाबीनचे बाजारभाव एमएसपीपेक्षा कमी असल्याने तसेच एमएसपी दराने खरेदी यंत्रणा प्रभावी नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांना एमएसपीपेक्षा कमी दराने साेयाबीन विकावे लागले. यात त्यांना प्रतिक्विंटल किमान 700 रुपयांचे नुकसान सहन करावे लागल्याने देशभरातील साेयाबीन उत्पादकांचे (Soybean Growers) 4,711.28 काेटी रुपयांचे तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे 2,350.85 काेटी रुपयांचे नुकसान (Losses) झाले आहे. नुकसानीचा हा आकडा पाहता एमएसपीसाेबतच सरकारी खरेदीवर (Procurement) प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

♻️ साेयाबीनचे पेरणीक्षेत्र
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सन 2025-26 च्या हंगामात देशभरात 114.95 लाख हेक्टरवर साेयाबीनची पेरणी करण्यात आली हाेती. साेपा (SOPA – Soybean Processors Association of India) च्या सुधारित आकडेवारीनुसार 112.13 लाख हेक्टरवर साेयाबीनची पेरणी करण्यात आली हाेती.

📍 केंद्रीय कृषी मंत्रालयाचा पेरणी अहवाल
राज्य – क्षेत्र
🔆 महाराष्ट्र – 49.95 लाख हेक्टर
🔆 मध्य प्रदेश – 48.64 लाख हेक्टर
🔆 राजस्थान – 9.07 लाख हेक्टर
🔆 कर्नाटक – 3.57 लाख हेक्टर
🔆 तेलंगणा – 3.66 लाख हेक्टर

📍 साेपाचा पेरणी अहवाल
राज्य – क्षेत्र
🔆 मध्य प्रदेश – 48.64 लाख हेक्टर
🔆 महाराष्ट्र – 44.68 लाख हेक्टर
🔆 राजस्थान – 9.06 लाख हेक्टर

♻️ साेयाबीनचे उत्पादन
सन 2025-26 च्या हंगामात देशभरात 127.20 लाख टन साेयाबीन उत्पादनाचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने तर 110.25 लाख टन साेयाबीन उत्पादनाचा अंदाज साेपाने व्यक्त केला हाेता. यात महाराष्ट्रातील 52.14 लाख टन साेयाबीन उत्पादनाचा समावेश आहे.

📍 केंद्रीय कृषी मंत्रालयाचा राज्यनिहाय साेयाबीन उत्पादन अंदाज
राज्य – उत्पादन अंदाज – एकूण उत्पादनातील वाटा
🔆 महाराष्ट्र – 52.14 लाख टन – 41 टक्के
🔆 मध्य प्रदेश – 49.32 लाख टन – 39 टक्के
🔆 राजस्थान – 9.85 लाख टन – 8 टक्के
🔆 गुजरात – 3.50 लाख टन – 3 टक्के
🔆 कर्नाटक – 3.12 लाख टन – 2.5 टक्के
🔆 इतर राज्ये – 9.27 लाख टन – 6.5 टक्के

📍 साेपाचा राज्यनिहाय साेयाबीन उत्पादन अंदाज
राज्य – उत्पादन अंदाज
🔆 महाराष्ट्र – 46.74 लाख टन
🔆 मध्य प्रदेश – 46.74 लाख टन
🔆 राजस्थान – 5.67 लाख टन
🔆 गुजरात – 2.43 लाख टन
🔆 तेलंगणा – 1.25 लाख टन
🔆 इतर राज्ये – 9.65 लाख टन
(इतर राज्यांमध्ये कर्नाटक, छत्तीसगड या राज्यांचा समावेश आहे.)
🔆 या हंगामात देशभरात 100 लाख टन तर महाराष्ट्रात 48 लाख टन साेयाबीन झाल्याचे बाजारपेठांमधील आवकवरून स्पष्ट हाेते.

♻️ साेयाबीनची एमएसपी दराने खरेदी
सरकारने पाच साेयाबीन उत्पादक राज्यांमधून एकूण 15.87 लाख टन म्हणजेच एकूण उत्पादनाच्या 15.87 टक्के तसेच महाराष्ट्रात एकूण उत्पादनाच्या 12.54 टक्के म्हणजेच 6,02,048.4838 टन साेयाबीन खरेदी केले. उर्वरित साेयाबीनपैकी 75 टक्के साेयाबीन शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना एमएसपीपेक्षा कमी दरात विकल्याने त्यांना प्रतिक्विंटल किमान 700 रुपयांचे नुकसान सहन करावे लागल्याने देशातील साेयाबीन उत्पादकांचे 4,711.28 काेटी रुपयांचे तर महारारूट्रातील शेतकऱ्यांचे 2,350.85 काेटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

📍 एमएसपी दराने साेयाबीन खरेदी
राज्य – लक्ष्य – खरेदी
🔆 मध्य प्रदेश – 22.21 लाख टन – 8 लाख टन
🔆 महाराष्ट्र – 18.50 लाख टन – 6.02 लाख टन
🔆 राजस्थान – 2.91 लाख टन – 1.5 लाख टन
🔆 तेलंगणा – 60 हजार टन – 35 हजार टन
(महाराष्ट्रात 19 टन साेयाबीन एमएसपी दराने खरेदी करण्यात येणार असल्याची घाेषणा राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी केली हाेती.)

♻️ एमएसपी दरातही कपात
केंद्र सरकारने 2025–26 च्या हंगामासाठी साेयाबीनची एमएसपी प्रतिक्विंटल 5,328 रुपये जाहीर केली आहे. सरकारने नाफेड (NAFED – National Agricultural Cooperative Marketing Federation of India Ltd) व एनसीसीएफच्या (NCCF – The National Cooperative Consumers’ Federation of India Limited) माध्यमातून साेयाबीनची खरेदी केली असली तरी या दाेन्ही संस्थांनी ओलावा, कचरा व इतर कारणे सांगून एमएसपीपेक्षा 15 ते 20 टक्के कमी दराने साेयाबीन खरेदी केले. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 799 ते 1,065 रुपये एमएसपीपेक्षा कमी मिळाले. यात देशातील शेतकऱ्यांचे 1,268.013 ते 1,690.155 कोटी रुपये तर महाराष्ट्रातील साेयाबीन उत्पादकांना 481.036 ते 641.18 कोटी रुपये कमी देण्यात आले.

📍 साेयाबीनचे बाजारभाव
महिना – किमान दर – कमाल दर (रुपये-प्रतिक्विंटल)
🔆 नाेव्हेंबर 2025 – 4,100 – 5,100
🔆 डिसेंबर 2025 – 4,200 –- 5,200
🔆 जानेवारी 2026 – 4,700 – 5,300
🔆 फेब्रुवारी 2026 – 4,800 – 5,600
🔆 मार्च 2026 – 4,700 – 5,100

♻️ साेयाबीन खरेदीचे उद्दिष्ट अपूर्णच
राज्याच्या पणन मंत्रालयाने 2025-26 च्या हंगामात राज्यात 19 लाख टन साेयाबीन एमएसपी दराने खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले हाेते. केंद्र सरकारने 18.50 लाख टन साेयाबीन खरेदीला मंजुरी दिली हाेती. नाफेड व एनसीसीएफ या दाेन्ही संस्थांना साेयाबीन खरेदीचे उद्दिष्ट खरेदी सुरू केल्यापासून 90 दिवसांत पूर्ण करावयाची हाेती. या संस्थांनी राज्यात नियाेजित काळात उद्दिष्टाच्या 31.69 टक्के तर देशात 15.87 टक्के साेयाबीन खरेदी केल्याने सरकारने जाहीर केलेल्या एमएसपी आणि एमएसपी दराने शेतमाल खरेदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाची अनास्था, जिल्हानिहाय मर्यादा व नाेंदणीतील जाचक अटींमुळे शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना एमएसपीपेक्षा कमी दरात साेयाबीन विकले. महाराष्ट्रात नाफेड व एनसीसीएफने 30 ऑक्टाेबर 2025 पासून नाेंदणी आणि 15 नाेव्हेंबर 2025 पासून साेयाबीन खरेदीला सुरुवात केली. या दाेन्ही संस्थांनी 12 फेब्रुवारी 2026 ला साेयाबीन खरेदी बंद केली. 15 नाेव्हेंबर 2025 ते 12 फेब्रुवारी 2026 या काळात नाफेड व एनसीसीएफने एकूण 6,02,048.4838 टन साेयाबीन खरेदी केली.

♻️ खरेदी केंद्रे, नाेंदणी व खरेदी
साेयाबीन खरेदीसाठी नाफेडने महाराष्ट्रात 910 खरेदी केंद्रे मंजूर करून 795 केंद्रे सुरू केले आणि 2,12,467 नाेंदणीकृत शेतकऱ्यांकडून 5,38,729.4839 टन साेयाबीन खरेदी केले. एनसीसीएफने 158 खरेदी केंद्रांना मंजुरी देत 139 केंद्रे सुरू केले आणि या केंद्रांवर 26,449 नाेंदणीकृत शेतकऱ्यांकडून 63,318.9999 टन साेयाबीन खरेदी केले. देशात मात्र सरकारने एकूण उत्पादनाच्या 15.87 टक्के साेयाबीन एमएसपी दराने खरेदी केले.

♻️ ओलावा व जिल्हानिहाय मर्यादा
या हंगामात बहुतांश जिल्ह्यातील साेयाबीनची उत्पादकता कमी दाखवून जिल्हानिहाय साेयाबीन खरेदी मर्यादा कमी ठरविण्यात आली हाेती. शेतकरी संघटनेच्या रेट्यामुळे पुढे ही मर्यादा थाेडी वाढविण्यात आली हाेती. कमी मर्यादेमुळे शेतकऱ्यांना एमएसपी दराने नाफेड व एनसीसीएफला साेयाबीन विकण्यास अडचणी आल्यात. साेयाबीनमधील ओलावा व कचऱ्याचे कारण सांगून नाफेड व एनसीसीएफने अनेक शेतकऱ्यांकडील साेयाबीन खरेदी करण्यास नकार दिला हाेता.

♻️ 3,78,541 नाेंदणीकृत शेतकरी शिल्लक
एमएसपी दराने साेयाबीन विकण्यासाठी राज्यातील 5,48,078 शेतकऱ्यांनी नाफेडकडे नाेंदणी केली हाेती. नाफेडने यातील 5,46,288 शेतकऱ्यांना पात्र ठरविण्यात आले आणि त्यातील 2,12,467 शेतकऱ्यांकडील साेयाबीनचे माेजमाप करण्यात आल्याने नाफेडकडील 3,33,821 नाेंदणीकृत शेतकऱ्यांकडील साेयाबीनचे माेजमाप करण्यात आले नाही. एनसीसीएफकडे 71,312 शेतकऱ्यांनी नाेंदणी केली हाेती तर यातील 71,167 शेतकऱ्यांना एनसीसीएफने पात्र ठरविले हाेते. एनसीसीएफने 26,449 शेतकऱ्यांकडील साेयाबीन खरेदी केल्याने त्यांच्याकडील 44,720 नाेंदणीकृत शेतकऱ्यांकडील साेयाबीन खरेदी करण्यात आले नाही. या दाेन्ही संस्थांकडील एकूण 3,78,541 नाेंदणीकृत शेतकऱ्यांकडील साेयाबीनचे माेजमाप करण्यात आले नाही. यावरून केंद्र व राज्य सरकार एमएसपी दराने शेतमाल खरेदी करण्यासंदर्भात किती गंभीर आहे, हे स्पष्ट हाेते.

© मातीतलं अर्थकारण

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!