krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Superstition : माझा हात नको पाहू…

1 min read

Superstition : कवयित्री बहिणाबाई चौधरी (Bahinabai Chaudhari) यांनी अनेक वर्षांपूर्वी आपल्या साध्या, ओघवत्या पण तितक्याच थेट शब्दांत एक मोठं सत्य मांडलं होतं, ‘माझे दैव मला कळे, माझा हात नको पाहू.’ त्या काळात ना आधुनिक शिक्षणाची व्यापकता होती, ना विज्ञानाचा एवढा गजर; तरीही एका शेतकरी स्त्रीने ज्योतिष, भविष्यकथन आणि अंधश्रद्धेवर (Superstition) एवढा प्रखर प्रहार केला. आज, शतकाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या समाजाला मात्र त्या ओळींचा अर्थ विसरल्यासारखा वाटतो, हेच दुर्दैव.

राज्यात मोठे राजकीय बदल घडत होते. विकास, प्रगती, आधुनिकता, डिजिटल भारत, नवभारत अशा घोषणा दिल्या जात होत्या. पण याच काळात एक वेगळीच सावली समाजावर पडताना दिसू लागली. अंधश्रद्धेची, कर्मकांडांची आणि तथाकथित ‘बाबा संस्कृती’ची. हा विरोधाभास जितका ठळक, तितकाच चिंताजनक होता. महाराष्ट्र हा संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा सांगणारा प्रदेश. विवेक, विज्ञान, समता आणि सामाजिक न्याय यांची शिकवण देणाऱ्या या भूमीत, पुन्हा एकदा भविष्यकथन, ग्रहदोष, यज्ञ-याग, ताईत आणि अघोरी प्रथा यांना राजाश्रय मिळू लागला, ही गोष्ट केवळ आश्चर्यकारक नाही, तर ती धोक्याची घंटा आहे.

आजच्या राजकीय वातावरणात सत्तेच्या बदलासोबतच समाजातील प्राधान्यक्रमही बदलताना दिसले. निवडणूक प्रचारात विकासाच्या घोषणा असल्या तरी, प्रत्यक्षात अनेक राजकीय नेते सार्वजनिकरीत्या बाबांच्या आश्रमात जाताना, त्यांचे आशीर्वाद घेताना आणि त्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसू लागले. प्रश्न असा आहे की, हे केवळ वैयक्तिक श्रद्धेचं प्रकरण आहे का, की त्यामागे एक व्यापक सामाजिक संदेश दडलेला आहे?

जेव्हा सत्ताधारी व्यक्ती अंधश्रद्धेला झुकतं माप देतात, तेव्हा सामान्य माणसासाठी तो एक संकेत ठरतो, ‘हे योग्यच आहे.’ आणि याच संकेतावर समाजाची दिशा ठरते. बहिणाबाईंच्या काळात अज्ञानामुळे लोक ज्योतिषाकडे वळत होते; आज मात्र सुशिक्षित समाजही त्याच मार्गाने जातो आहे, ही अधिक भीषण बाब आहे. यामागचं कारण केवळ अंधविश्वास नाही, तर एक राजकीय सोयही आहे. अंधश्रद्धा ही प्रश्न विचारण्याची सवय नष्ट करते. विवेक हरवला की सत्ता टिकवणं सोपं होतं. त्यामुळे समाजाला तर्कशक्तीपासून दूर ठेवणं हे अनेकदा सत्ताधाऱ्यांसाठी फायद्याचं ठरतं. हा इतिहास आहे आणि वर्तमानातही तोच खेळ सुरू असल्याचं दिसतं.

महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अनेक चळवळी उभ्या राहिल्या. विवेकवादी विचार मांडणाऱ्या कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन लोकांना जागं करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच काळात अशा कार्यकर्त्यांवर हल्ले झाले, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. हे केवळ व्यक्तींवरचे हल्ले नव्हते, तर विचारांवरचे हल्ले होते. ज्योतिषशास्त्र आणि भविष्यकथन याबाबत विज्ञान स्पष्ट सांगतं की, ग्रह-नक्षत्रांचा मानवी जीवनावर थेट परिणाम असल्याचा कोणताही ठोस पुरावा नाही. तरीही ‘नऊ ग्रह’, ‘रेषा’, ‘दोष’ या संकल्पनांवर आधारित भीती निर्माण करून लोकांची आर्थिक आणि मानसिक लूट केली जाते. बहिणाबाईंच्या शब्दांत सांगायचं तर- ‘बापा नको मारू थापा’ – पण आज या थापा अधिक संघटित आणि प्रभावी झालेल्या दिसतात.

अधिक वेदनादायक म्हणजे, या अंधश्रद्धेच्या बाजारात सर्वाधिक फसवले जातात ते दुर्बल घटक – शेतकरी, महिला, आर्थिकदृष्ट्या कमजोर लोकं, संकटात सापडलेला माणूस आशेच्या शोधात असतो आणि त्याच आशेचा गैरफायदा घेतला जातो. उपचाराऐवजी ताईत दिले जातात, उपायाऐवजी यज्ञ सांगितले जातात आणि विज्ञानाऐवजी भीती पसरवली जाते. आज देश अंतराळ संशोधनात मोठी झेप घेत होता. एका बाजूला रॉकेट्स आकाशात झेपावत होते, तर दुसऱ्या बाजूला समाजातील मोठा घटक अजूनही ग्रहदोष घालवण्यासाठी पूजा करत होता. हा विरोधाभास केवळ विनोदी नाही – तो शोकांत आहे.

राजकारणाने जर विज्ञानाला पाठिंबा दिला असता, तर समाजाची दिशा वेगळी असती. पण जेव्हा राजकारणच अंधश्रद्धेचं पोषण करू लागतं, तेव्हा प्रगतीचा वेग मंदावतो. कारण विज्ञान प्रश्न विचारायला शिकवतं, आणि अंधश्रद्धा प्रश्न विचारू देत नाही. बहिणाबाईंच्या ओळी आज पुन्हा वाचण्याची गरज आहे, कारण त्या केवळ कविता नाहीत – त्या एक इशारा आहेत. त्या सांगतात की, माणसाने स्वतःच्या कष्टांवर, विवेकावर आणि अनुभवावर विश्वास ठेवला पाहिजे. भविष्य हे हाताच्या रेषांमध्ये नसतं, ते आपल्या कृतीत असतं.

आजच्या महाराष्ट्रासमोर प्रश्न उभा आहे – आपण कोणत्या मार्गाने जाणार? बहिणाबाईंच्या विवेकाच्या मार्गाने, की अंधश्रद्धेच्या अंधारात? राजकारणाने जर समाजाला मागे नेण्याचा प्रयत्न केला, तर समाजानेच त्याला प्रश्न विचारले पाहिजेत. कारण लोकशाहीत अंतिम सत्ता जनतेची असते आणि ती जागी राहिली तरच विवेक जिवंत राहतो. पुरोगामी महाराष्ट्राची खरी ओळख ही मोठ्या घोषणा देण्यात नाही, तर छोट्या-छोट्या अंधश्रद्धांना नाकारण्यात आहे. आणि तोपर्यंत, बहिणाबाईंचा तो साधा पण धारदार प्रश्न आपल्या कानात घुमत राहील –

‘माझा हात नको पाहू…’
कवयित्री बहिणाबाई चौधरी
नको नको ज्योतिषा
माझ्या दारी नको येऊ
माझे दैव मला कळे
माझा हात नको पाहू
धनरेषांच्या चऱ्यांनी
तळहात रे फाटला
देवा तुझ्याबी घरचा
झरा धनाचा आटला
म्हणे नशिबाचे नऊ ग्रह
तळहाताच्या रेघोट्या
बापा नको मारू थापा
अशा उगा खऱ्या खोट्या

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!