krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Cocktail Spraying : शेतीमधील ‘कॉकटेल’ फवारणी

1 min read

Cocktail Spraying : भारतीय शेती आज एका अशा वळणावर उभी आहे, जिथे उत्पादन वाढवण्याच्या घाईत निसर्गाच्या आणि विज्ञानाच्या नियमांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. विशेषतः ग्रामीण भागात ‘कमी वेळात जास्त काम’ उरकण्याच्या नादात शेतकरी औषध फवारणीच्या बाबतीत जे प्रयोग करत आहेत, ते भविष्यात पिकांसाठी आणि जमिनीच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. कीटकनाशके (Pesticides), बुरशीनाशके (Fungicides) आणि विद्राव्य खते (Water-soluble fertilizers) यांचा अघोरी ‘कॉकटेल’ (Cocktail) तयार करून फवारणी (Spraying) करण्याची पद्धत सध्या सर्रास पाहायला मिळते. वरवर पाहता यामुळे मजुरीचा खर्च वाचत असल्याचे वाटत असले, तरी त्यामागील रासायनिक गुंतागुंत (Chemical Complexity) आणि होणारे छुपे नुकसान समजून घेणे काळाची गरज आहे.

📍 पाण्याचा सामू
कोणतेही औषध किंवा खत जेव्हा पाण्यात मिसळले जाते, तेव्हा त्या पाण्याचा सामू (pH) हा सर्वात कळीचा मुद्दा ठरतो. निसर्गतः कीटकनाशके ही आम्लयुक्त (Acidic) वातावरणात प्रभावी ठरतात, तर अनेक विद्राव्य खते पाण्यात मिसळल्यानंतर द्रावणाला अल्कली (क्षारीय – Alkali) बनवतात. जेव्हा शेतकरी औषधे आणि खते एकाच टाकीत एकत्र करतो, तेव्हा त्यांच्यात तात्काळ रासायनिक अभिक्रिया सुरू होते. जर द्रावणाचा सामू 7 पेक्षा वाढला, तर कीटकनाशकातील सक्रिय घटक ‘न्यूट्रल’ होतात. याचा अर्थ असा की, शेतकरी महागडे औषध फवारत असूनही कीड मरत नाही, कारण त्या औषधाची ताकद खतांसोबतच्या रासायनिक युद्धात आधीच संपलेली असते. अनेकदा औषध फवारल्यानंतरही रिझल्ट मिळत नाही म्हणून शेतकरी कंपन्यांना दोष देतो, पण खऱ्या अर्थाने दोष हा चुकीच्या मिश्रणाचा असतो.

📍 औषधांमध्ये खते मिसळणे
पानांची रचना आणि त्यांचे अन्न शोषून घेण्याची प्रक्रिया ही अत्यंत संवेदनशील असते. पानांवर ‘स्टोमॅटा’ (Stomata) म्हणजेच सूक्ष्म पर्णरंध्रे असतात. खते ही या रंध्रावाटे अत्यंत वेगाने शोषली जातात. जेव्हा आपण जहाल कीटकनाशके खतांसोबत मिसळतो, तेव्हा ही खते त्या विषारी औषधांनाही अतिवेगाने झाडाच्या पेशींपर्यंत पोहोचवतात. यामुळे पिकावर ‘स्कॉचिंग’ (Scotching) किंवा ‘बर्निंग’चा (Burning) प्रादुर्भाव होतो. पानांच्या कडा करपणे किंवा कोवळी फूट जळून जाणे ही याचीच लक्षणे आहेत. झाडाला अन्न देण्याच्या प्रयत्नात आपण अनवधानाने त्याला विषाचा डोस पाजत आहोत, याचा विचार गांभीर्याने व्हायला हवा. विशेषतः गंधक (Sulphur) आणि तेलयुक्त औषधे किंवा कॅल्शियम (Calcium) आणि फॉस्फरसयुक्त (Phosphorus) खते (Fertilizers) एकत्र करणे म्हणजे रासायनिक स्फोटाला आमंत्रण देण्यासारखे आहे.

📍 शॉर्टकट धाेकादायक
केवळ रासायनिक बदलांवरच हे थांबत नाही, तर भौतिक बदलही तितकेच धोकादायक असतात. अनेकदा औषधे एकत्र केल्यावर द्रावण फुटते, त्यात दह्यासारख्या गुठळ्या तयार होतात किंवा ते मिश्रण गरम होते. असे द्रावण फवारणी यंत्राच्या नोझलमध्ये अडकून यंत्राचे नुकसान तर करतेच, पण पिकाच्या पानांवर औषधांचे थवे साचून तिथे कायमस्वरूपी डाग पडतात. यामुळे झाडाची प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया मंदावते आणि पर्यायाने उत्पादनात घट येते. शेतीमधील हा ‘शॉर्टकट’ प्रत्यक्षात नुकसानीचा ‘हायवे’ ठरत आहे.

📍 कॉकटेल माेह टाळा
आज गरज आहे ती विज्ञानाधिष्ठित शेतीची. प्रत्येक बाटलीवर दिलेल्या सूचना वाचणे, ‘जार टेस्ट’ (काचेच्या बाटलीत छोटे मिश्रण करून पाहणे) करणे आणि पाण्याचा दर्जा तपासणे या प्राथमिक बाबी आहेत. मजुरी वाचवण्यासाठी पिकाचे आयुष्य पणाला लावणे हा शहाणपणा नाही. शेती हे केवळ कष्ट करण्याचे क्षेत्र नसून, ते एक प्रयोगशाळा आहे, जिथे प्रत्येक थेंब मोजून – मापून पडला पाहिजे. जर आपण रसायनांच्या या जंजाळाचा आणि त्यांच्या परस्पर अभिक्रियेचा विचार केला नाही, तर आपली शेती खर्चिक आणि पिके कमकुवत होत जातील. त्यामुळे, फवारणीतील हा ‘कॉकटेल’ संस्कृतीचा मोह आवरून, विज्ञानाची कास धरणे हेच खऱ्या अर्थाने शाश्वत शेतीचे सूत्र ठरेल.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!