Onion Growers : कांदा उत्पादकांनाे, आता तरी सावध व्हा!
1 min read
Onion Growers : कांदा (Onion)… महाराष्ट्राच्या मातीतील हे एक असं पीक आहे, ज्याने कित्येकांना श्रीमंती दिली आणि कित्येकांना रस्त्यावर आणले. पण, अलीकडेच राज्याच्या सर्वोच्च सभागृहात माननीय मुख्यमंत्र्यांनी जे विधान केले, ते महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक (Onion Growers) शेतकऱ्यांसाठी (Farmer) केवळ विधान नसून, ती एक ‘धोक्याची घंटा’ (Warning Bell) आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे संकेत दिले आहेत की, कांदा उत्पादनात आपण स्वावलंबी झालो आहोतच, पण आता आपण गरजेपेक्षा जास्त उत्पादनाच्या चक्रात अडकलो आहोत. हा इशारा समजून न घेतल्यास भविष्यात कांदा शेती करणे हा एक तोट्याचा जुगार ठरू शकतो.
📍 गणितातील दाहक वास्तव
मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आकडेवारी डोळे उघडणारी आहे. आपल्या एकूण कांदा उत्पादनापैकी केवळ 50 टक्के कांदा देशांतर्गत बाजारपेठेत वापरला जातो. उरलेल्या उत्पादनापैकी जेमतेम 10 टक्के कांद्याची निर्यात होते. सर्वात मोठा प्रश्न उरतो तो उर्वरित 40 टक्के अतिरिक्त कांद्याचा. हा 40 टक्के कांदाच बाजारात ‘सप्लाय’ वाढवतो आणि पर्यायाने भाव पाडण्यास कारणीभूत ठरतो. जेव्हा बाजारात गरजेपेक्षा जास्त माल येतो, तेव्हा अर्थशास्त्राचा साधा नियम लागू होतो – किंमत कमी होणे. आज कांदा उत्पादक याच नियमाचा बळी ठरत आहे.
📍 क्षेत्र घटविण्याचे सरकारी धोरण
मुख्यमंत्र्यांनी भाषणात एक अत्यंत कडू पण सत्य विधान केले: ‘कांदा क्षेत्र कमी केले पाहिजे.’ हे विधान म्हणजे सरकार आगामी काळात कांदा लागवडीवर अप्रत्यक्ष मर्यादा आणण्याचे किंवा इतर पिकांकडे वळवण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे संकेत देत आहे. जो शेतकरी वर्षानुवर्षे केवळ कांदा हेच मुख्य पीक घेत आला आहे, त्याच्यासाठी हे बदल स्वीकारणे कठीण आहे. मात्र, जर 40 टक्के अतिरिक्त कांदा उत्पादनामुळे भाव मातीमोल होत असतील, तर क्षेत्र कमी करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे सरकारचे मत बनले आहे. यामुळे भविष्यात कांदा उत्पादनासाठी मिळणारी अनुदाने किंवा सरकारी मदत ही क्षेत्र घटवण्याच्या अटीवर असू शकते.
📍 निर्यात धोरण : एक दुधारी तलवार
कांदा शेतीचे भवितव्य पूर्णपणे सरकारच्या निर्यात धोरणावर अवलंबून असते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या भाषणात निर्यातीबाबत फारसे सकारात्मक चित्र उमटले नाही. 10 टक्के निर्यातीचा आकडा वाढवणे हे जागतिक स्पर्धेत कठीण जात आहे. पाकिस्तान, इजिप्त आणि चीन सारखे देश जागतिक बाजारपेठेत स्वस्त दरात कांदा पुरवत असताना, भारतीय कांद्याला निर्यातीची कवाडे उघडणे हे आव्हानात्मक ठरते. त्यातच देशांतर्गत महागाई रोखण्यासाठी सरकार जेव्हा निर्यातबंदी लावते, तेव्हा त्याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या खिशाला बसतो. मुख्यमंत्र्यांच्या संकेतानुसार, भविष्यात सरकार निर्यातीपेक्षा ‘उत्पादन नियंत्रण’ यावर जास्त भर देण्याची शक्यता आहे.
📍 प्रक्रिया उद्योगाची अनुपस्थिती : मोठी उणीव
या संपूर्ण संभाषणात एक सर्वात महत्त्वाची उणीव जाणवते, ती म्हणजे ‘प्रक्रिया उद्योग’ (Processing Units). जर 40 टक्के कांदा अतिरिक्त होत असेल, तर तो फेकून देण्यापेक्षा किंवा क्षेत्र कमी करण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून पावडर, पेस्ट किंवा फ्लेक्स बनवणे हा उत्तम मार्ग ठरला असता. मात्र, दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांच्या भाषणात कांदा प्रक्रिया उद्योगांबाबत किंवा त्यासाठी क्लस्टर्स उभारण्याबाबत ठोस आश्वासन मिळालेले नाही. जोपर्यंत कांदा हा नाशवंत स्वरूपातच बाजारात येत राहील, तोपर्यंत व्यापारी आणि बाजार समित्यांच्या लिलावावर शेतकरी अवलंबून राहील.
📍 भविष्यातील दिशा : शेतकऱ्यांनी काय करावे?
कांदा उत्पादकांसाठी आता आत्मचिंतनाची वेळ आली आहे. आगामी काही वर्षे कांदा शेतीसाठी अत्यंत संघर्षाची राहतील. यातून वाचण्यासाठी खालील पावले उचलणे गरजेचे आहे.
🔆 पीक फेरपालट (Crop Diversification) : केवळ कांद्यावर विसंबून न राहता.
🔆 फळबागा शाश्वत उत्पन्न देणारे ऊस तेलबिया किंवा कडधान्यांकडे वळणे आता अनिवार्य झाले आहे.
🔆 बाजारपेठेचा अभ्यास : लागवड करण्यापूर्वी देशातील आणि राज्यातील एकूण क्षेत्राचा अंदाज घेऊनच निर्णय घ्यावा.
🔆 साठवणुकीचे तंत्रज्ञान : केवळ ‘चाळ’ बांधून भागणार नाही, तर कांदा दीर्घकाळ टिकवण्यासाठी आधुनिक कोल्ड स्टोरेजचा विचार करावा लागेल.
मुख्यमंत्र्यांचे विधान हे स्पष्ट आहे – सरकार आता जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यापेक्षा, उत्पादन नियंत्रित करण्याला प्राधान्य देणार आहे. ‘क्षेत्र कमी करा’ हा सल्ला नसून, तो सरकारचा भविष्यातील कृती आराखडा आहे. कांदा उत्पादकांसाठी ही खरोखरच धोक्याची घंटा आहे. वेळीच सावध होऊन आपण आपल्या शेतीचे नियोजन बदलले नाही, तर निसर्गाच्या लहरीपणासोबतच सरकारच्या या बदलत्या धोरणांचा फटका सहन करण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागेल. दोन पाच रुपये अनुदान स्वीकारून गप्प बसावे लागेल.
📌 बळीराजा, आता तरी डोळे उघडा आणि बदलाचा स्वीकार करा!