Agricultural Universities Vacant Posts : कृषी विद्यापीठांत 5,800 पदे रिक्त, कसला साजरा करताय ‘कृषी दिन’?
1 min read
Agricultural Universities Vacant Posts : 1 जुलै हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जयंती दिन म्हणजेच ‘कृषी दिन’ संपूर्ण राज्यभर साजरा होत असताना महाराष्ट्राच्या कृषी प्रगतीचा पाया असलेल्या कृषी विद्यापीठांचा (Agricultural Universities) कणाच रिक्त पदांमुळे (Vacant Posts) मोडीत निघाला आहे. राज्यातील राहुरी, अकोला, परभणी आणि दापोली येथील चार सरकारी कृषी विद्यापीठांसह त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या 100 हून अधिक महाविद्यालयांमध्ये तब्बल 5,800 पेक्षा जास्त मान्यताप्राप्त पदे रिक्त असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे कृषी शिक्षण, विस्तार आणि शेतमालाच्या नवीन वाणांचे तसेच फळबागांवरील संशोधन (Research) पूर्णपणे कोलमडले असून, संपूर्ण शासकीय कृषी शिक्षण व्यवस्था (Government Agricultural Education System) व्हेंटिलेटरवर (Ventilator) आहे.
♻️ एक प्राध्यापक, तीन विभाग
या चारही कृषी विद्यापीठांमध्ये एकूण मंजूर वैज्ञानिक व शैक्षणिक पदांपैकी 42 टक्के, तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 50 टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत. त्यातही गंभीर बाब म्हणजे, या विद्यापीठांचे कुलसचिव, संशोधन संचालक, विस्तार शिक्षण संचालक आणि महाविद्यालयांचे अधिष्ठाता यासारखी सर्वोच्च वैधानिक व वरिष्ठ प्रशासकीय पदे वर्षानुवर्षे प्रभारींच्या भरवशावर सुरू आहेत. मुख्य प्राध्यापकांची 65 टक्के पदे रिक्त असल्याने एकाच प्राध्यापकाकडे 3-3 विभागांचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
♻️ प्रयोगशाळांना कुलुपे
दरवर्षी महाविद्यालयांमध्ये 100 टक्के प्रवेश पूर्ण होतात, मात्र विद्यार्थ्यांना शिकवायला कायमस्वरूपी प्राध्यापकच नाहीत. केवळ कंत्राटी आणि तासिका तत्त्वावरील शिक्षकांवर जगात अग्रेसर असणाऱ्या या कृषी विद्यापीठांचा गाडा हाकला जात आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रचंड दुष्काळामुळे विद्यापीठांच्या अत्याधुनिक प्रयोगशाळांना कुलुपे लागली आहेत. कृषी सहायक आणि क्षेत्र मजूर नसल्याने संशोधन क्षेत्रावर वेळेत पेरणी किंवा कीड व्यवस्थापनाचे नियंत्रण करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे नवीन बियाणे आणि तंत्रज्ञान विकसित करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे.
♻️ प्रयोग करण्याची संधीच मिळत नाही
शेतीचे शिक्षण हे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांवर आधारित असते. मात्र, प्रयोगशाळा सहायक आणि तांत्रिक कर्मचारी नसल्याने विद्यार्थ्यांना प्रयोग करण्याची संधी मिळत नाही. परिणामी, दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना केवळ वर्गातील पुस्तकी ज्ञानावर समाधान मानावे लागत असून, त्यांचे शैक्षणिक व व्यावसायिक भवितव्य अंधारात आहे.
♻️ स्वीकृत, मंजूर आणि रिक्त पदांची अधिकृत स्थिती
कृषी विद्यापीठ (एकूण 4) :- एकूण घटक व संलग्न महाविद्यालये :- एकूण रिक्त पदे (अ, ब, क, ड वर्ग) : सद्यस्थितीतील प्रमुख प्रभारी पदे
📍 महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी : 25+ : 1,650+ : कुलसचिव, अधिष्ठाता, संचालक
📍 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला : 25+ : 1,500+ : संशोधन संचालक, कुलसचिव
📍 वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी : 25+ : 1,400+ : विस्तार संचालक, अधिष्ठाता
📍 डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली : 25+ : 1,250+ : नियंत्रक अधिकारी, संचालक
📍 एकूण : 100 हून अधिक : 5,800 हून अधिक : ‘प्रभारी राज’ सुरू