Summer farming season : उन्हाळी हंगाम, असाध्य ते साध्य करिता सायास…
1 min read
Summer farming season :महाराष्ट्रातील शेती सध्या एका अत्यंत निर्णायक टप्प्यावर उभी आहे. नुकताच रब्बी हंगाम संपत आला आहे आणि शेतकऱ्यांचे लक्ष आता पुढील हंगामाकडे लागले आहे. परंपरेने पाहिले तर रब्बीनंतरचा उन्हाळी काळ (Summer season) हा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आर्थिक आधार असतो. अनेक शेतकरी उन्हाळ्यात भाजीपाला, मिरची, टोमॅटो, काकडी, भेंडी, कारले, दोडका यासारखी नगदी पिके घेतात. कारण जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत बाजारपेठेत भाजीपाल्याची मोठी मागणी असते आणि योग्य नियोजन केले तर या काळात शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. पण यावर्षी परिस्थिती थोडी वेगळी दिसत आहे. हवामानातील अनिश्चितता, जागतिक युद्धजन्य तणाव, खतांचा संभाव्य तुटवडा, वाढणारा उत्पादन खर्च आणि मजुरांची टंचाई या सर्व गोष्टी एकाच वेळी शेतकऱ्यांसमोर उभ्या राहत आहेत. त्यामुळे 2026 चा खरीप हंगाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठे आव्हान ठरू शकतो.
📍 मान्सूनवर अल निनोचा परिणाम
सध्या जगभरातील हवामान अभ्यासकांचे लक्ष पॅसिफिक महासागरातील तापमानातील बदलांकडे लागले आहे. कारण तेथील बदलांचा परिणाम थेट भारताच्या मान्सूनवर होतो. अनेक आंतरराष्ट्रीय हवामान मॉडेल्सनी यावर्षी अल निनो (El Nino) विकसित होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अल निनो ही अशी नैसर्गिक हवामान प्रक्रिया आहे, ज्यामुळे पॅसिफिक महासागरातील पाणी नेहमीपेक्षा जास्त तापते आणि त्याचा परिणाम जगभरातील पावसाच्या पद्धतीवर होतो. भारतातील मान्सूनवर अल निनोचा परिणाम अनेकदा नकारात्मक दिसून आला आहे. पाऊस उशिरा सुरू होणे, पावसातील दीर्घ खंड पडणे आणि मान्सून लवकर परतणे अशा घटना यामुळे घडू शकतात. महाराष्ट्राच्या दृष्टीने पाहिले तर मराठवाडा, सोलापूर, पश्चिम विदर्भ यासारख्या भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा धोका वाढतो. शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम म्हणजे संपूर्ण वर्षाच्या अर्थकारणाचा पाया असतो. पावसावर आधारित शेती असलेल्या राज्यात मान्सून जर अनिश्चित झाला तर त्याचा परिणाम केवळ उत्पादनावर नाही तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होतो. त्यामुळे अल निनोची शक्यता ही केवळ हवामानाचा विषय नसून, शेतकऱ्यांच्या भवितव्याशी संबंधित आहे.
📍 खत पुरवठा साखळीवर परिणाम
याच काळात आणखी एक मोठे संकट जगभरातील शेतीवर परिणाम करू शकते. मध्यपूर्वेत वाढत चाललेला Iran–Israel conflict आणि त्यात अमेरिकेचा सहभाग यामुळे जागतिक खत पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराण हा जगातील महत्त्वाचा पेट्रोकेमिकल आणि नायट्रोजन आधारित खतांचा उत्पादक देश आहे. जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात युरिया आणि इतर रासायनिक खते तेथून निर्यात केली जातात. या प्रदेशात संघर्ष तीव्र झाला तर समुद्री व्यापारावर मोठा परिणाम होऊ शकतो. विशेषतः मध्यपूर्वेतील Strait of Hormuz ही सामुद्रधुनी जागतिक तेल आणि खत वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. येथे व्यापार विस्कळीत झाला तर जगभरातील खतांच्या किमती झपाट्याने वाढू शकतात.
📍 दरवाढीचा फटका शेतकऱ्यांनाच
भारत हा खतांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून असलेला देश आहे. विशेषतः Urea fertilizer आणि Diammonium Phosphate fertilizer यासारख्या खतांचा मोठा भाग परदेशातून येतो. जर जागतिक पुरवठा साखळीत अडथळे आले तर भारतातही खतांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील खरीप पेरणीवर होईल. खतांचा तुटवडा निर्माण झाला किंवा किमती वाढल्या तर सर्वात मोठा फटका लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना बसतो. कारण उत्पादन खर्च आधीच वाढलेला असताना महागडी खते खरेदी करणे त्यांच्यासाठी कठीण होते. अनेकदा अशा परिस्थितीत शेतकरी कमी खत वापरतात किंवा उशिरा पेरणी करतात. परिणामी उत्पादन घटते आणि उत्पन्न कमी होते.
📍 अमेरिकन टेरिफचा फटका
या सर्व परिस्थितीत आणखी एक आर्थिक घटक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे. जागतिक व्यापारात वाढलेला तणाव आणि अमेरिकेने लादलेले अतिरिक्त आयात शुल्क यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अनेक कच्च्या मालांच्या किमती वाढत आहेत. या धोरणांना सामान्यतः U.S. Tariffs असे म्हटले जाते. याचा परिणाम थेट शेती निविष्ठांवर होऊ शकतो. पोटॅश, फॉस्फेट, सूक्ष्म अन्नद्रव्ये, कीटकनाशके तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि मल्चिंग, ठिबक, पीव्हीसी पाईप यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. भारतातील आयातदारांना जास्त पैसे मोजावे लागतात आणि शेवटी हा खर्च शेतकऱ्यांवरच पडतो.
📍 संकटांबरोबरच संधीही
या तिहेरी संकटांच्या छायेत महाराष्ट्रातील शेतकरी सध्या चिंताग्रस्त आहेत. रब्बी हंगाम संपत असताना अनेक शेतकरी उन्हाळी भाजीपाला लागवडीचे नियोजन करत आहेत. कारण उन्हाळ्यातील भाजीपाला हा अनेक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा नगदी स्रोत असतो. विशेषतः टोमॅटो, मिरची, वांगी, काकडी, दोडका, कारले यासारख्या पिकांना जून ते ऑगस्ट दरम्यान चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता असते. उत्तर भारतात उन्हाळ्यातील प्रचंड उष्णतेमुळे भाजीपाला उत्पादन कमी होते. त्याच वेळी कर्नाटक आणि दक्षिणेकडील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस किंवा जास्त पावसामुळे उत्पादनात चढउतार होतात. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील शेतकरी उत्तर भारताच्या बाजारपेठेसाठी मोठे पुरवठादार ठरू शकतात. म्हणजेच संकटांबरोबरच संधीही अस्तित्वात आहेत. योग्य नियोजन केल्यास महाराष्ट्रातील शेतकरी या परिस्थितीतही चांगले उत्पन्न मिळवू शकतात. पण, त्यासाठी शेतकऱ्यांनी अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे.
📍 महत्त्वाच्या बाबी
🔆 पिकांची योग्य निवड
जास्त पाणी लागणारी पिके घेण्यापेक्षा कमी पाण्यात तग धरणारी पिके निवडणे भाजीपाल्याच्या बाबतीतही ठिबक सिंचन, मल्चिंग आणि सावली जाळी नैसर्गिक अच्छादन यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पाण्याची बचत होऊ शकते.
🔆 खत व्यवस्थापन
खतांचा संभाव्य तुटवडा लक्षात घेता शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे आवश्यक आहे. शेणखत, कंपोस्ट, जीवामृत, वर्मी कंपोस्ट यांचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होते.
🔆 पाणी व्यवस्थापन
येणारा काळ कोरडा असण्याची शक्यता असल्यामुळे प्रत्येक थेंब जपून वापरणे आवश्यक आहे. शेततळे, पावसाचे पाणी साठवण, ठिबक सिंचन, मल्चिंग यासारख्या उपाययोजना केल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर करता येतो.
🔆 आर्थिक नियोजन
शेती करताना खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बाजारात जास्त किंमतीला मिळणाऱ्या पण जोखीम असलेल्या पिकांपेक्षा संतुलित पीक पद्धती अवलंबणे अधिक सुरक्षित ठरते. तसेच पीक विमा योजनेचा लाभ घेणे देखील आवश्यक आहे.
🔆 मजुरांची टंचाई
मजुरांची टंचाई ही देखील एक गंभीर समस्या बनत आहे. ग्रामीण भागातून शहरांकडे होणारे स्थलांतर वाढल्यामुळे शेतीकामासाठी मजूर मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे शक्य तिथे यंत्रिकीकरणाचा वापर करणे आवश्यक ठरते.
🔆 2026 चा खरीप हंगाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सोपा नसणार आहे. हवामानातील अनिश्चितता, जागतिक राजकीय तणाव आणि वाढणारा उत्पादन खर्च या तिन्ही घटकांचा परिणाम शेतीवर होणार आहे. पण शेतीचा इतिहास पाहिला तर शेतकऱ्यांनी नेहमीच संकटांवर मात केली आहे.
🔆 आज गरज आहे ती घाबरण्याची नाही, तर सजग होण्याची. परिस्थितीचे योग्य आकलन करून सूक्ष्म नियोजन केले तर येणाऱ्या संकटांवर मात करणे शक्य आहे. योग्य पीक निवड, पाणी आणि खत व्यवस्थापन, आर्थिक शिस्त आणि बाजारपेठेचा अभ्यास या चार गोष्टींवर भर दिल्यास शेतकरी या कठीण काळातही आपला मार्ग शोधू शकतात.
🔆 शेती ही केवळ व्यवसाय नाही, तर ती जीवनपद्धती आहे. निसर्गाशी संवाद साधत, संकटांशी झुंज देत आणि प्रत्येक हंगामातून नवे धडे घेत पुढे जाण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे. म्हणूनच येणाऱ्या उन्हाळी व खरीप हंगामाकडे भीतीने नाही, तर सजग नियोजन आणि धैर्याने पाहण्याची वेळ आली आहे.
असाध्य ते साध्य करिता सायास
कारण अभ्यास तुका म्हणे।
🔆 अतिशय काटेकोर वैज्ञानिक पद्धतीने नियोजन अभ्यासपूर्ण करूया!