krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

UMED Exhibition : मुंबईतील ‘फास्ट लाईफ’मध्येही विरघळणार अवघ्या महाराष्ट्राच्या मातीचा सुगंधी गोडवा!

1 min read

UMED Exhibition : लोकलच्या धावत्या चाकांवर स्वार होऊन घड्याळाच्या काट्याशी शर्यत लावणाऱ्या मुंबईकरांच्या ‘फास्ट’ लाईफमध्ये कधीतरी मातीच्या ओल्या सुगंधाचा निवांत क्षण शोधवासा वाटतो. कॉर्पोरेट ऑफिसच्या चकचकीत काचेच्या केबिनमध्ये बसून जगाशी कनेक्ट होणाऱ्या मुंबईच्या आधुनिक जीवनशैलीला आता साद घालतेय आपल्या मातीचे अस्सल वैभव. उपराजधानी नागपुरात यशाची सर्व शिखरे सर करून कोट्यवधींची उलाढाल करणारी संत्रानगरीची ही ‘उमेद’ (UMED) ऊर्जा आता राज्याच्या राजधानीत म्हणजेच मुंबईत धडकण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या 24 मार्च ते 4 एप्रिल 2026 दरम्यान वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये ‘महालक्ष्मी सरस’ (Mahalakshmi Saras) प्रदर्शनाचा (Exhibition) हा शाही सोहळा रंगणार असून, मुंबईकरांसाठी ही ग्रामीण संस्कृतीची एक अविस्मरणीय मेजवानी ठरणार आहे.

विदर्भाच्या पाहुणचाराने आणि संत्रानगरीच्या उदंड प्रतिसादाने ज्या महिला उद्योजिकांच्या डोळ्यांत स्वप्न पेरली, तशाच उमेद च्या राज्यभरातील उद्योजिका लखपती दीदी आता मुंबईच्या ‘बिझनेस हब’मध्ये आपली कला सिद्ध करायला येत आहेत. नागपूरचे यश ग्रामीण महिलांच्या कष्टाला मिळालेली पावती ठरली. तोच आत्मविश्वास घेऊन आधी वाशीच्या सिडको सेंटरपासून ते नंतर एप्रिल अखेरीस बीकेसीच्या कॉर्पोरेट कॉरिडॉरपर्यंत या ‘महालक्ष्मी’ आपल्या उत्पादनांची मोहोर उमटवणार आहेत.

📌 बदलती मुंबई अन् ग्रामीण ‘उमेद’
आजची नवी मुंबई आणि मुंबई झपाट्याने बदलत आहे. सिडकोच्या गगनचुंबी इमारती, अटल सेतूमुळे जवळ आलेली अंतरे आणि डिजिटल क्रांतीमुळे बदललेली जीवनशैली… अशा काळात मुंबईकर ‘ब्रँडेड’ गोष्टींच्या मागे धावतोय. पण खरी ‘ब्रँड व्हॅल्यू’ ही ग्रामीण भागातील शुद्धतेत आणि हाताने विणलेल्या कलेत आहेत. वेळेअभावी घरातील पारंपरिक चवीला मुकलेल्या मुंबईकरांसाठी हे प्रदर्शन म्हणजे एक ‘स्ट्रेस-बस्टर’ ठरेल. हाय-टेक जगात वावरताना आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मुळांशी जोडण्याचे काम ‘उमेद’ करत आहे. नावातच ‘महालक्ष्मी’ असल्याने या भगिनींच्या रूपाने घराघरात समृद्धी पोहोचणार आहे.

📌 चवींचा राजेशाही थाट… एकाच छताखाली साऱ्या महाराष्ट्राचा स्वाद!
महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती विविधतेने नटलेली आहे, जिचा प्रत्येक घास संस्कृतीची साक्ष देतो. ‘महालक्ष्मी सरस’च्या 70 भव्य स्टॉल्सवर हा चवींचा खजिना उलगडणार आहे. विदर्भाचा विचार केला तर तिथल्या वऱ्हाडी तिखटाचा ठसका आणि सावजी मसाल्याची झणझणीत चव मुंबईच्या उन्हाळ्यातही अंगात तरतरी आणेल. कोकणच्या ओल्या नारळाची चव, आमसुलाची ताजी सोलकढी आणि कोकणी माशांच्या रश्श्याचा तो अमूल्य ओलावा जिभेवर रेंगाळेल. खानदेशची नजाकत म्हणजे तिथले जगप्रसिद्ध वांग्याचे भरीत आणि कळण्याची खरपूस भाकरी, जो साधेपणातील सर्वात मोठा राजेशाही आनंद देईल. मराठवाड्याच्या रांगडेपणात दडलेली खमंग शेंगदाणा चटणी, हुरडा आणि खुसखुशीत थालीपीठं तृप्तीची ढेकर नक्कीच मिळवून देतील. तर पश्चिम महाराष्ट्राचा रुबाब म्हणजे कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा आणि साताऱ्याचे सुप्रसिद्ध कंदी पेढे, जे खऱ्या अर्थाने अन्नाला पूर्णब्रह्म बनवतील. सेंद्रिय धान्य, गावरान तूप, सुका मेवा आणि पारंपरिक हस्तकलांच्या या जत्रेत प्रत्येक घास महाराष्ट्राच्या मातीची आणि इथल्या सुगरणींच्या हाताच्या जादूची साक्ष देईल. हे अनुभवायचे असेल तर 24 मार्चची तारीख कॅलेंडरवर आत्ताच मार्क करून ठेवा.

‘उमेद’, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश सागर यांनी सांगितले की, ग्रामीण महिलांच्या कष्टाला योग्य बाजारपेठ मिळवून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ‘महालक्ष्मी सरस’ हे एक प्रभावी व्यासपीठ आहे. नागपुरात मिळालेला उत्तुंग प्रतिसाद आणि झालेली कोटींची उलाढाल हे सिद्ध करते की, नागरिकांना अस्सल आणि दर्जेदार उत्पादनांची ओढ आहे. ‘उमेद’च्या माध्यमातून आम्ही लाखो महिलांना केवळ संघटित केले नाही, तर त्यांना उद्योजकीय प्रवाहात आणले आहे. मुंबईच्या कॉर्पोरेट जगताने या ग्रामीण उद्योजिकांच्या कौशल्याला दाद द्यावी. तुमची एक खरेदी एका कुटुंबाचा आत्मविश्वास वाढवून त्यांना स्वावलंबनाकडे नेणारी ठरेल, असे आवाहन उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश सागर यांनी केले आहे.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!