Cloudy weather : पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण
1 min read
Cloudy weather : महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहता, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, निफाड, सटाणा, कळवण, देवळा, मालेगाव, धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री, सिंदखेडा, शिरपूर या तालुक्यांसह नंदुरबार व जळगाव जिल्हे तसेच लगतच्या परिसरात साेमवार (दि. 2 फेब्रुवारी) ते बुधवार (दि. 4 फेब्रुवारी) या तीन दिवस ढगाळ वातावरण (Cloudy weather) राहून अगदीच तुरळक ठिकाणी झालाच तर 2 ते 4 मिमी. इतक्या अगदी किरकोळ स्वरुपाच्या हलक्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवार (दि. 5 फेब्रुवारी) पासून मात्र लगेच हे ढगाळ वातावरण निवळण्याची शक्यता आहे.
📍 फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातील तापमान
शनिवार (दि. 7 फेब्रुवारी)पर्यतच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात पहाटे 5 च्या किमान तापमानाचा पारा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातील त्याच्या या काळातील सरासरी तापमानापेक्षा 3 ते 4 डिग्रीने अधिक राहून थंडीऐवजी उकाडा तसेच उत्तर कोकण व मध्य महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यात थंडीऐवजी रात्रीचा उकाडा जाणवेल. उर्वरित महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यात मात्र पहाटे 5 च्या किमान तापमानाचा पारा सरासरी इतका राहून संमिश्र वातावरणाच्या अनुभवातून केवळ माफक थंडीची शक्यता आहे.
📍 उर्वरित फेब्रुवारीतील थंडी व तापमान
फेब्रुवारी महिन्यातील उर्वरित तीन आठवड्यात महाराष्ट्रात थंडी जाणवेल, परंतु मुंबईसह संपूर्ण कोकण खान्देश व मध्य महाराष्ट्र व छत्रपती संभाजीनगर व जालना अशा 19 जिल्ह्यात मात्र थंडीचे प्रमाण मात्र कमी असेल. नाशिक व अहिल्यानगर हे दोन जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांत दुपारी 3 वाजताचे दिवसाचे कमाल तापमान सुद्धा दरवर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात जाणवणाऱ्या कमाल तापमानापेक्षा, यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात दुपारचे कमाल तापमान अधिक असेल. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात दुपारीही उन्हाचा चटका जाणवेल. त्यामुळे रब्बीच्या बागायती पिकांनाही या महिन्यात अधिक सिंचनाच्या आवर्तनाची गरज भासण्याची शक्यता बळावली आहे.
📍 पावसाची शक्यता?
संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात भागानुसार पावसाचे प्रमाण सहसा 0 ते 10 मिमी. असते. चालू 2026 च्या संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, नागपूर, भंडारा असे 6 जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यात पावसाची शक्यता ही सरासरीपेक्षा म्हणजे 10 मिमीपेक्षा कमी असेल. म्हणजेच संपूर्ण महिना जवळपास पावसाविना कोरडा जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, नागपूर, भंडारा जिल्ह्यांत मात्र सरासरी इतक्या म्हणजे 0 ते 10 मिमी किंवा त्यापेक्षा कमी इतक्या किरकोळ पेंडकळवनी पावसाची शक्यता नाकारता येत नाही. रब्बी पिकांच्या बाबतीत ही एक जमेची बाजू समजावी.
📍 कशामुळे असे वातावरण?
नेहमी जम्मू काश्मिर, लेह लडाख यांच्या अक्षवृत्तांवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे पश्चिमी प्रकशोभ सध्या या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अधिक दक्षिणेकडे म्हणजे पंजाब, राजस्थान राज्यांच्या अक्षवृत्तांवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना, वाहणारे थंड व कोरडे वारे खान्देशसह सध्या उत्तर महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत. शिवाय, या बरोबरच सध्या महाराष्ट्रावर प्रत्यावर्ती चक्रीय वारे स्थित असल्यामुळे बंगालच्या उपसागरातील वाहून येत असलेली आर्द्रता या थंड वाऱ्यात मिसळत आहे. म्हणून खान्देशसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रावर ढगांचे सावट आहे.