krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Soil pH crucial role : पिकांच्या उत्पादनात मातीच्या ‘पीएच’ची निर्णायक भूमिका

1 min read

Soil pH crucial role : मानवी आराेग्यविषयक समस्यांमुळे अलीकडे सेंद्रिय शेतमालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उत्पादन कमी हाेत असल्याने तसेच बाजारात समाधानकारक दर मिळत नसल्याने शेतकरी सेंद्रिय शेतमालाचे उत्पादन घेण्यास उत्सुक नसतात. पिके त्यांना आवश्यक आलेली अन्नद्रव्ये मातीतून (Soil) त्यांच्या मुळांवाटे शाेषून घेतात. मातीत मिसळलेली अन्नद्रव्ये सेंद्रिय आहेत की रासायनिक याची ओळख पिकांना करता येत नाही. मातीचा पीएच (pH) जर याेग्य असेल तर पिकांना मातीतील अन्नद्रव्ये शाेषून घेणे साेपे जाते आणि त्यामुळे त्यांचे याेग्य संगाेपन हाेऊन वाढ चांगली हाेते. पर्यायाने शेतमालाचे उत्पादन चांगले हाेण्यास मदत हाेते. त्यामुळे पिकांच्या उत्पादनात मातीचा पीएच अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक भूमिका (crucial role) बजावताे.

♻️ पिके आणि खते
पिकांना जी रासायनिक खते दिली जातात, ती मुख्यतः अमोनियम, नायट्रेट्स किंवा फॉस्फेट स्वरूपात मातीमध्ये उपलब्ध होतात. पिके ही रसायने पूर्णपणे सेंद्रिय स्थितीत रूपांतरित करत नाहीत. त्याऐवजी वनस्पतींच्या चयापचय क्रियेदरम्यान काही प्रमाणात रूपांतर होते, त्यातील बरेच अवशेष रासायनिक स्वरूपातच राहतात. खतांच्या अतिवापरामुळे हे अवशेष पिकांच्या खाण्याच्या भागात म्हणजेच मुळाशी जमा होऊन झाडांच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकतात. रासायनिक खतांमधील नायट्राेजन आणि फॉस्फरस पिकांमध्ये नायट्रेट्स किंवा फॉस्फेट म्हणून आढळतात, जे झाडांमधील प्रोटीनमध्ये रूपांतरित होत असले तरी त्यांचे अवशेष शिल्लक राहतात. पोटॅशियम मात्र जलद शोषले जाते आणि कमी अवशेष सोडते. योग्य डोस आणि सेंद्रिय खतांसोबत वापरल्यास अवशेष कमी होतात. पिके रसायने पूर्णपणे सेंद्रिय (कार्बनयुक्त) बनवत नाहीत. मातीतील सूक्ष्मजीव आणि झाडांमधील प्रक्रियांमुळे त्यांचे नायट्रेट्स अमिनो ॲसिड्समध्ये रुपांतर हाेते. या अवशेषांमुळे मातीची सुपिकता कमी होते आणि मानवी आरोग्यावर परिणाम होतो, म्हणून माती परीक्षण आणि संतुलित खत व्यवस्थापन आवश्यक आहे.

♻️ पीएच म्हणजे काय?
मातीचा पीएच (pH) म्हणजे माती किती आम्लयुक्त (Acidic) किंवा अल्कधर्मी (Alkaline/basic) आहे, याचे मोजमाप हाेय. जे हायड्रोजन आयनच्या (H+) एकाग्रतेवर अवलंबून असते. 7 पीएच तटस्थ व नैसर्गिक (neutral) असतो. 7 पेक्षा कमी पीएच आम्लयुक्त, तर 7 पेक्षा जास्त पीएच अल्कधर्मी दर्शवतो. योग्य पीएच पातळी पिकांना पोषक तत्वे शोषण्यास मदत करते, म्हणून शेतीसाठी मातीचा पीएच महत्त्वाचा आहे. पिकांच्या उत्तम उत्पादनासाठी 6 ते 7.5 दरम्यानचा पीएच आदर्श मानला जाताे. कारण या रेंजमध्ये बहुतेक पोषक तत्वे पिकांना सहज उपलब्ध होतात व त्यांची चांगली वाढ होते.

मापन श्रेणी (Scale) :- पीएच पट्टी 0 ते 14 या अंकांमध्ये मोजली जाते.
🔆 पीएच 7.0 :- ही माती उदासीन (Neutral) मानली जाते.
🔆 पीएच 7.0 पेक्षा कमी :- ही माती आम्लधर्मी (Acidic) असते.
🔆 पीएच 7.0 पेक्षा जास्त :- माती विम्लधर्मी किंवा अल्कधर्मी किंवा चोपण (Alkaline) असते.

♻️ पीएच व त्याचे कमी-अधिक प्रमाण
🔆 मातीचा पीएच 5.5 पेक्षा कमी असेल तर ती माती जास्त आम्लधर्मी होते. ज्यामुळे फॉस्फरस हा महत्त्वाचा घटक लोह व ॲल्युमिनियमच्या बंधनात अडकल्याने पिकांना मिळत नाही. ॲल्युमिनियम व मॅंगनीज मातीसह पिकांसाठी घातक ठरतात.
🔆 मातीचा पीएच 8.0 पेक्षा जास्त असेल तर ती माती जास्त अल्कधर्मी होते. ज्यामुळे पिकांना झिंक, लाेह, बोरोन, मॅंगनीज ही अन्नद्रव्ये मिळत नाही. त्यामुळे पिकांची पाने पिवळी पडतात, वाढ खुंटते आणि उत्पादनात घट येते.
🔆 बिघडलेल्या पीएचमुळे माती जिवंत ठेवणारे जिवाणू मृतवत हाेतात व बुरशी वाढते. त्यामुळे मातीतील नायट्राेजनचे स्थिरीकरण मंदावते व जमिनीची सुपिकता हळूहळू कमी हाेते. अशा परिस्थितीत खते देऊनही पिकांना त्याचा फारसा फायदा हाेत नाही.

♻️ पीएचचा असमताेल व त्याचे दुष्परिणाम
🔆 जमिनीत क्षारांचे प्रमाण अधिक असणे, सिंचनाच्या पाण्याचा अतिवापर करणे किंवा पाण्याची कमतरता भासणे, परस्पर विराेधी खते एकत्र मिसळून देणे, खतांचा अतिवापर, जमिनीतील सेंद्रिय पदार्थांची कमतरता, परस्पर विराेधी अन्नद्रव्ये यामुळे मातीच्या पीएचचा असमताेल निर्माण हाेताे.
🔆 मातीत क्षारांचे प्रमाण वाढल्यास पाण्याचा याेग्य निचरा हाेत नाही. त्यामुळे ऑस्मोटिक दाब वाढतो व झाडांना पाणी व अन्नद्रव्ये शोषणे कठीण जाते.
🔆 पीएच खूप आम्लधर्मी किंवा अल्कधर्मी असल्यास पिकांच्या मुळांना नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे मुख्य अन्नद्रव्ये मिळत नाही.
🔆 चिकट किंवा जड जमीन असल्यास त्यात हवा खेळती राहत नसल्याने पाणी व अन्नद्रव्यांची हालचाल मंदावते. सेंद्रिय पदार्थांच्या कमतरतेमुळे जमिनीची पाणी धारणशक्ती व अन्नद्रव्ये संतुलन बिघडते.

♻️ खत व पाणी व्यवस्थापनातील चुका
🔆 अतिपाणी दिल्यास खते मुळांच्या भागातून वाहून जातात किंवा मुळकुज होते. पिकांना खत दिल्यानंतर पाणी न दिल्यास त्यातील नायट्रोजन उडून जाताे.
🔆 मुळांभोवती क्षार साचल्यास पिकांच्या मुळांना इजा होते. खतांच्या अतिवापरामुळे क्षारदाह होतो.
🔆 युरिया व अमोनियम नायट्रेटसारखी विसंगत खते एकत्र मिसळल्यास विद्राव्यता कमी हाेत असल्याने त्यांचे शोषण होत नाही.

♻️ अन्नद्रव्यांचा परस्परविरोध
🔆 जास्त फॉस्फरस – झिंक व काॅपरचे कमी शोषण.
🔆 जास्त नायट्रोजन – काॅपर व पोटॅशियमचे कमी शोषण.
🔆 जास्त पोटॅशियम – मॅग्नेशियम व बोरॉनचे कमी शोषण.

♻️ उपाय
🔆 आम्लधर्मी मातीला चुना, डोलोमाइट, बायोचार व राख तसेच अल्कधर्मी जमिनीला जिप्सम, सल्फर, सेंद्रिय पदार्थांची जोड आवश्यक असते. हे उपाय तो माती परीक्षणानंतर करणे गरजेचे आहे. चांगल्या उत्पादनासाठी पाणी तसेच नांगरणीच्या आधी मातीची चाचणी व प्रत्येक खत वापराआधी मातीचा स्वभाव ओळख विचारात घेऊन उपाययाेजना करणे गरजेचे असते.
🔆 खते देताना समतोल पाणी व्यवस्थापन ठेवणे. पिकांची गरज व हंगामानुसार संतुलित खतांचा वापर करणे. नायट्रोजन दिल्यानंतर तात्काळ पाणी देणे. सेंद्रिय खतांचा वापर करून जमिनीची रचना व हवा खेळती ठेवणे. अन्नद्रव्य संतुलन राखणे.

©️ मातीतलं विज्ञान

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!