krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Farming is feeding Soil, not Crops : पिकांना नव्हे, मातीला खाऊ घालणे हीच खरी शेती

1 min read

Farming is feeding Soil, not Crops : शेतीकडे (Farming) पाहण्याची आपली जुनी सवय अशी आहे की, खत टाकले की पीक (Crops) ते खातं आणि उत्पादन वाढतं. अनेक वर्षे आपण हेच मानत आलो. पण आज प्रत्यक्ष अनुभव सांगतो की, भरपूर खत देऊनही पिकं कमजोर दिसतात, जमिनी (Soil) थकतात आणि उत्पादन अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. याच ठिकाणी एक मूलभूत सत्य लक्षात घ्यायला हवे. शेती म्हणजे पिकाला खाऊ (feeding) घालणे नव्हे, तर मातीला खाऊ घालणे. कारण शेवटी पिकाला पोसणारी शक्ती ही मातीच असते.

मानवाने रासायनिक खतांचा (Chemical fertilizers) शोध लावला, हे शेतीसाठी मोठे संशोधन होते. नायट्रोजन (Nitrogen), फॉस्फरस (Phosphorus), पोटॅशियम (Potassium) यासारखी अन्नद्रव्ये प्रयोगशाळेत तयार झाली आणि उत्पादन वाढले. पण निसर्गाने निर्माण केलेली माती ही केवळ खत पोहोचवण्याचे माध्यम नाही. माती ही एक जिवंत व्यवस्था आहे. तिच्यात कोट्यवधी सूक्ष्मजीव, बुरशी, जिवाणू, सेंद्रिय पदार्थ आणि खनिजे एकत्र काम करत असतात. या मातीमध्ये जैविक आणि रासायनिक क्रिया अखंडपणे, ज्ञात-अज्ञात पद्धतीने सुरू असतात. या अविरत चालणाऱ्या प्रक्रियांनाच मृदाशास्त्र (Soil science) म्हणतात.

शेतात टाकलेली रासायनिक खतांची गोणी पीक थेट खात नाही, हा मुद्दा समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही खत टाकता तेव्हा ते सर्वप्रथम जमीन स्वीकारते. जमीन त्या खतावर प्रक्रिया करते, त्याचे रूपांतर करते आणि मगच पीक त्यातून अन्न घेतं. म्हणूनच दोन शेतकरी एकसारखं खत, एकाच पिकासाठी, एकाच हंगामात वापरूनही वेगवेगळं उत्पादन घेतात. फरक असतो तो मातीच्या आरोग्याचा.

वनस्पती खत शोषून घेत नाहीत. त्या आयन स्वरूपातील अन्नद्रव्ये शोषून घेतात. नायट्रेट, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फेट अशी ही अन्नद्रव्ये मातीमध्ये उपलब्ध असतील, तरच ती मुळांपर्यंत पोहोचतात. पण मातीचा pH बिघडलेला असेल तर ही अन्नद्रव्ये मातीमध्ये अडकून पडतात. शेतकरी म्हणतो, खत टाकलं तरी पीक वाढत नाही; प्रत्यक्षात खत आहे, पण पिकाला मिळत नाही.

यात सूक्ष्मजीवांची भूमिका फार मोठी आहे. हे सूक्ष्मजीव खताचे पिकाला उपयोगी अशा स्वरूपात रूपांतर करतात. नायट्रोजन स्थिरीकरण असो किंवा सेंद्रिय पदार्थांचे विघटन – ही सगळी कामं हे अदृश्य कामगार करत असतात. माती जिवंत असेल, सूक्ष्मजीव सक्रिय असतील, तरच खताचा खरा उपयोग होतो. अन्यथा कितीही खत टाकलं तरी ते निष्प्रभ ठरतं. माती जिवंत राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सेंद्रिय कर्ब म्हणजेच ऑरगॅनिक कार्बन (Organic carbon). ऑरगॅनिक कार्बन ही मातीची ऊर्जा आहे. तो कमी झाला की माती निर्जीव होते. सेंद्रिय कर्ब चांगला असेल तर सूक्ष्मजीव वाढतात, माती भुसभुशीत राहते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि अन्नद्रव्ये हळूहळू पिकाला उपलब्ध होत राहतात. पिकांची मुळे खोलवर जातात, झाडे तणाव सहन करतात आणि उत्पादन स्थिर राहते.

पिकांचे अवशेष शेतात परत जाणे, शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खते, सेंद्रिय पदार्थ यांचा वापर झाला, तरच माती खऱ्या अर्थाने ‘खात’ राहते. तेव्हा मातीतील जीवन जागे होतं, जैविक प्रक्रिया वेग घेतात आणि तुम्ही टाकलेली रासायनिक खतंही पिकाला पूर्णपणे लागू पडतात. म्हणजेच रसायनशास्त्र आणि मृदाशास्त्र यांचा मिलाफ झाला, तरच शेती टिकाऊ होते. आज शेतीसमोरचा खरा प्रश्न खत किती टाकायचं हा नाही, तर माती किती जिवंत ठेवायची हा आहे. अधिक खत नव्हे, तर समजूतदार खत व्यवस्थापन गरजेचं आहे. माती जिवंत ठेवली, ऑरगॅनिक कार्बन वाढवला, pH संतुलित ठेवला आणि सूक्ष्मजीवांना जगण्यासाठी वातावरण दिलं, तर पिकं आपोआप सुदृढ होतील. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की, शेती म्हणजे पिकाला खाऊ घालण्याची स्पर्धा नाही. शेती म्हणजे मातीशी नातं जपण्याची प्रक्रिया आहे. माती पोटभर खाल्ली, तर ती तुमच्या पिकांना कधीच उपाशी ठेवणार नाही.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!