krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Startup Funding in Agriculture : कृषिक्षेत्रातील ‘स्टार्टअप फंडिंग’

1 min read

Startup Funding in Agriculture : गरज ही शोधाची जननी आहे, ही म्हण अनुभवतच आपण सर्व मोठे झालो आहोत. आजच्या वेगाने बदलणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेत व्यवसाय, उत्पादन आणि प्रत्येक क्षेत्रातील नावीन्याला अत्यंत महत्त्व दिले जाते. कोणत्याही देशाची व्यावसायिक प्रगती आणि शाश्वत विकास यांचे मोजमाप त्या देशातील ‘स्टार्टअप इकोसिस्टम’ (The Startup Ecosystem)च्या ताकदीवरून केले जाते. आज विशेषतः कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण कल्पना, तंत्रज्ञानाधारित उपाय आणि उद्योजकतेला चालना मिळाल्यास केवळ आर्थिक प्रगतीच होत नाही तर, सामाजिक परिवर्तनालाही गती मिळते. याच उद्देशाने जगभरात कृषिक्षेत्रासाठी पोषक वातावरण निर्माण करून ‘स्टार्टअप इकोसिस्टम’ विकसित करण्यावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. अशा इकोसिस्टममुळे आर्थिक स्थैर्य, रोजगारनिर्मिती, ग्रामीण विकास आणि समाजाच्या सर्वांगीण उन्नतीला मोठा हातभार लागतो.

स्टार्टअप इकोसिस्टमचा विकास व्हावा, यासाठी शासकीय तसेच खासगी पातळीवर मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून विविध कार्यक्रम आणि फंडिंग (Funding) योजना राबविल्या जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांपासून ते नवउद्योजकांपर्यंत सर्वांसाठी ही एक मोठी आणि जीवन बदलणारी सुवर्णसंधी ठरत आहे. याच प्रक्रियेतून आपल्या राज्यातही एक सक्षम स्टार्टअप इकोसिस्टम उभी राहत आहे. कृषिक्षेत्रातील नवकल्पना, समस्या ओळख व निराकरण तसेच उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करण्यासाठी प्रामुख्याने तीन टप्प्यांमध्ये मदत केली जाते. यामध्ये स्टुडंट ओरिएंटेशन प्रोग्राम (Student Orientation Program), अ‍ॅग्रीप्रेन्युअरशिप ओरिएंटेशन (Agripreneurship Orientation) आणि स्टार्टअप अ‍ॅग्री-बिझनेस इन्क्युबेशन (Startup Agri-business Incubation) यांचा समावेश होतो. या तिन्ही टप्प्यांमध्ये प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य दिले जाते.

♻️ स्टुडंट ओरिएंटेशन प्रोग्राम
स्टुडंट ओरिएंटेशन प्रोग्राम अंतर्गत विद्यार्थ्यांना 4 लाख रुपयांपर्यंतचे फंडिंग दिले जाते. याचा उद्देश म्हणजे लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये नावीन्याची बीजे रुजवणे आणि महाविद्यालयीन स्तरावर त्यांची उद्योजकीय मानसिकता विकसित करणे.

♻️ अ‍ॅग्रीप्रेन्युअरशिप ओरिएंटेशन
त्यानंतर अ‍ॅग्रीप्रेन्युअरशिप ओरिएंटेशन कार्यक्रमामधून कृषिक्षेत्रात उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना मार्गदर्शनासह 5 लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

♻️ अ‍ॅग्री-बिझनेस इन्क्युबेशन
प्रत्यक्ष स्टार्टअप सुरू करण्यासाठी स्टार्टअप अ‍ॅग्री-बिझनेस इन्क्युबेशन अंतर्गत 5 ते 25 लाख रुपयांपर्यंतचे फंडिंग उपलब्ध करून दिले जाते. विशेष म्हणजे, हे संपूर्ण सहाय्य ग्रांट म्हणजेच अनुदान स्वरूपात दिले जाते. यासाठी कोणताही परतावा द्यावा लागत नाही. केवळ निधीचा वापर मंजूर संकल्पनेनुसार होत आहे का, याची तपासणी केली जाते.

♻️ फंडिंग का दिले जाते?
अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, असे फंडिंग का दिले जाते? यामागील मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांनी आणि नवउद्योजकांनी मांडलेल्या नावीन्यपूर्ण कल्पना आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणे. आजच्या तरुणांमध्ये सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याची मोठी क्षमता आहे. योग्य मार्गदर्शन, संसाधने आणि आर्थिक पाठबळ मिळाल्यास ही क्षमता यशस्वी उद्यमात रूपांतरित होऊ शकते. या कार्यक्रमांमुळे केवळ कल्पना मांडण्यापुरते मर्यादित न राहता, समस्या सोडवण्याची क्षमता आणि उद्योजकीय विचारसरणी विकसित करण्यास मदत होते. तसेच स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योग समूह, गुंतवणूकदार, संशोधन संस्था आणि शासकीय यंत्रणांशी थेट जोडणी होऊन स्टार्टअप्सची व्यावसायिक वाढ होते.

♻️ फायदे
या संपूर्ण प्रक्रियेचे अनेक फायदे आहेत. सर्वप्रथम, स्टार्टअप्सना तंत्रज्ञानाची तांत्रिक पडताळणी आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळते. विकसित केलेले तंत्रज्ञान प्रत्यक्ष उपयोगी आहे का, याची चाचणी केली जाते. दुसरे म्हणजे प्रत्यक्ष शेतात किंवा बाजारात प्रयोग करून उत्पादनाची परिणामकारकता तपासता येते. यशस्वी उद्योजकांकडून मिळणारे मार्गदर्शन स्टार्टअप्सना योग्य दिशा निवडण्यास मदत करते. प्रयोगशाळा, उपकरणे आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाजाराशी जोडणी आणि गुंतवणूकदारांशी थेट संपर्क साधण्याची संधी मिळते.

♻️ कृषिक्षेत्रातील महत्त्वाची क्षेत्रे
कृषिक्षेत्रात अनेक महत्त्वाची क्षेत्रे आहेत. कृषी यांत्रिकीकरणामुळे उत्पादन खर्च कमी होतो आणि कार्यक्षमता वाढते. प्रिसिजन शेतीत एआय, डेटा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अचूक शेती शक्य होते. कृषी मूल्यसाखळी आणि वाहतूक व्यवस्थेत नावीन्य आल्यास शेतमालाची नासाडी कमी होते आणि शेतकऱ्यांना योग्य दर मिळतो. काढणी व काढणीपश्चात प्रक्रिया उद्योगांमुळे शेतमालाचे मूल्य वाढते. कचऱ्यापासून संपत्ती आणि नवीकरणीय ऊर्जा, जसे शेणावर आधारित वीज व खत निर्मिती, हे पर्यावरणपूरक उपाय ग्रामीण भागात नवे उत्पन्न स्रोत निर्माण करतात. तसेच दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन, कुक्कुटपालन यांसारख्या कृषिपूरक क्षेत्रात नावीन्यपूर्ण स्टार्टअप्ससाठी मोठ्या संधी आहेत. कृषी फिनटेकमुळे शेतकऱ्यांना कर्ज, विमा आणि डिजिटल आर्थिक सेवा सुलभ होतात. कृषी निविष्ठा व जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील नावीन्यामुळे उत्पादनक्षमता आणि गुणवत्ता वाढते. नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाद्वारे पाणी, माती आणि जैवविविधतेचे शाश्वत व्यवस्थापन शक्य होते. कृषी विस्तार आणि शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे ज्ञानाचा प्रसार अधिक वेगवान आणि प्रभावी होत आहे.

♻️ महत्त्वाच्या संस्था
देशपातळीवर भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI – Indian Agricultural Research Institute), पुसा, नवी दिल्ली; राष्ट्रीय कृषी विपणन संस्था (NIAM – National Institute of Agricultural Marketing), जयपूर; राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था (MANAGE – National Institute of Agricultural Extension Management), हैदराबाद; कृषी विज्ञान विद्यापीठ, धारवाड; तसेच आसाम कृषी विद्यापीठ, जोरहाट यांसारख्या संस्थांचा मोठा सहभाग आहे. महाराष्ट्रात सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी (Central Institute for Research on Cotton Technology) यांच्या माध्यमातूनही हे कार्य सुरू आहे. दिल्लीमधील इंडिग्राम सारख्या संस्था आणि मराठा चेंबर्सच्या माध्यमातून क्रिकेटर अजिंक्य रहाणे हे देखील स्टार्टअपला काही अटींवर चांगले सहकार्य करत आहेत. या सर्व संस्थांच्या सहकार्याने संशोधन, प्रशिक्षण, विस्तार आणि विपणन क्षेत्रातील तज्ज्ञ कृषी स्टार्टअप्स, उद्योजक आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन व धोरणात्मक पाठबळ देत आहेत.

स्टार्टअप उपक्रमांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील नवउद्योजकतेला मोठी चालना मिळाली आहे. आतापर्यंत शासनाद्वारे 2,154 स्टार्टअप्सचे इन्क्युबेशन करण्यात आले असून, 6,181 स्टार्टअप्सना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नवकल्पनांना आर्थिक बळ देण्यासाठी 20,696 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. या प्रयत्नांमुळे कृषी स्टार्टअप अधिक सक्षम होत असून, रोजगारनिर्मिती, तंत्रज्ञानाचा प्रसार आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास महत्त्वाचे योगदान दिले जात आहे.

आज महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी, शेतकरी आणि सुशिक्षित तरुणांनी कृषी क्षेत्रात स्टार्टअप सुरू करून नवी उंची गाठली आहे. विविध कार्यक्रम आणि फंडिंग योजना केवळ स्टार्टअप्सपुरत्या मर्यादित नसून, त्या संपूर्ण कृषी व्यवस्थेला बळकटी देतात. विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, तरुणांची उद्योजकता आणि तंत्रज्ञानाची ताकद एकत्र आल्यास शेतीत आमूलाग्र परिवर्तन शक्य आहे. दीर्घकालीन आर्थिक विकास, रोजगारनिर्मिती आणि सामाजिक समृद्धीसाठी हीच योग्य दिशा आहे.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!