Cold weather Possibility : संक्रांतीपासून थंडी पुन्हा वाढण्याची शक्यता!
1 min read
Cold weather Possibility : मकर संक्रांतीपर्यंत कमी झालेली थंडी (Cold) व वाढलेल्या किमान तापमानाची श्रेणी, मध्य महाराष्ट्र व कोकणातील ढगाळ वातावरण व खालावलेली थंडी तसेच थंडीच्या चढ-उतारानुसार शनिवार (दि. 10 जानेवारी) ते बुधवार (दि. 14 जानेवारी) म्हणजेच मकर संक्रांतीपर्यंतच्या गेल्या पाच दिवसात मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर व परभणी या आठ जिल्ह्यात पहाटेच्या किमान तापमानात सरासरीपेक्षा 3 ते 5 अंश सेल्सीअसने तर मुंबईसह कोकणात 2 ते 3 अंश सेल्सीअसने वाढ होवून पाच दिवसात या जिल्ह्यात थंडी कमी झाली. मध्य महाराष्ट्र व कोकणातील एकूण 15 जिल्ह्यांत किमान तापमान 14 ते 20 अंश सेल्सीअस दरम्यानच्या श्रेणीत वाढलेले राहिले. सोमवार (दि. 12 जानेवारी) ते बुधवार (दि. 14 जानेवारी) हे तीन दिवस भागपरत्वे या जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहून दमटपणा टिकून राहिला.
🌀 विदर्भ व मराठवाड्यातील थंडी
नांदेड व यवतमाळ जिल्हा वगळता विदर्भ व मराठवाड्यातील उर्वरित 17 जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान जवळपास सरासरी इतके म्हणजे 12 ते 16 अंश सेल्सीअस दरम्यान राहुन भले काहीशी कमी का होईना पण या भागात थंडी टिकून राहिली. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात सरासरीच्या 5.9 अंश सेल्सीअस किमान तापमान खालावून ते 8.8 अंश सेल्सीअसच्या दरम्यान राहुन तेथे थंडीच्या लाटेचा प्रभाव जाणवत आहे.
🌀 आता थंडी वाढणार
मकरसंक्रांतीनंतर म्हणजे गुरुवार (दि. 15 जानेवारी) म्हणजे संक्रांतीच्या ‘करी’ दिनापासून ते रविवार (दि. 18 जानेवारी) अर्थात पौष(मौनी) आमावस्या पर्यंतच्या चार दिवसात पहाटे 5 वाजाच्या किमान तापमानात घसरण होवून महाराष्ट्रात पुन्हा थंडीत काहीशी वाढ होण्याची शक्यता जाणवते.
🌀 दव (बादड)
बंगालच्या उपसागरातून मध्य महाराष्ट्रात आलेल्या आर्द्रतेच्या अवशेषातून खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, बीड, नांदेड, परभणी, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व यवतमाळ या 13 जिल्ह्यात या चार दिवसात थंडी बरोबर एखाद्या-दुसऱ्या दिवशी पहाटे-सकाळी दव (बादड) पडण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.
🌀 ईशान्य मान्सून अजूनही जागेवरच!
दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक तसेच पुडुचेरी काराईकल भागातून जानेवारी महिन्यात होणारे ईशान्य मान्सूनचे निर्गमन आणि त्यानंतर उत्तर भारतात पुन्हा पाऊस व बर्फबारीचे आवर्तनातून महाराष्ट्राला चांगल्या थंडीचा लाभ होत असतो. दोन वर्षांपूर्वी म्हणजे 14 जानेवारीला 2024 च्या संक्रांतीला तर मागील वर्षी 27 जानेवारी 2025 ला तो बाहेर पडला होता. परंतु, यावर्षी ईशान्य मान्सून अजूनही कार्यरतच आहे. त्यामुळे थंडी जरी जाणवत असली तरी आपण माफक थंडीचाच अनुभव घेत आहोत.
@ शेतकरी बांधवांसहित सर्वांना, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
तीळगुळ घ्या, गोडगोड बोला!
तीळ-तैलसम स्नेह अन्
गुळ-गोडसम संवाद
असाच कायम ठेवू या!
व वृद्धिंगत करू या!