Soil politics : मातीचे राजकारण आणि तुमचीच माती
1 min read
Soil politics : खताच्या (Fertilizer) प्रत्येक दाण्यात, फवारणीच्या प्रत्येक थेंबात जे राजकारण (politics) काम करत असतं. जसं देशाच्या राजकारणात पक्ष, युती, आघाडी, मतभेद, संघर्ष आणि तडजोडी असतात, तसंच मातीतील मूलद्रव्यांचंही असतं. शेतकरी हा या संपूर्ण व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे, पण अनेकदा त्याला हे जाणवत नाही की आपण केवळ खत देत नाही आहोत, तर एका सरकारची रचना करत आहोत.
🌱 मुख्य अन्नद्रव्य
नायट्रोजन (Nitrogen), फॉस्फरस (Phosphorus) आणि पोटॅश (Potash) हे शेतीतील मोठे राष्ट्रीय पक्ष आहेत. त्यांच्याशिवाय कोणतंही सरकार स्थिर राहू शकत नाही. नायट्रोजन विकासाच्या घोषणा देतो, झपाट्याने वाढ घडवून आणतो, हिरवळ निर्माण करतो. फॉस्फरस मुळांचा पाया मजबूत करतो, ऊर्जा व्यवस्थापन पाहतो, पुढील पिढीची तयारी करतो. पोटॅश शिस्त लावतो, पेशी मजबूत करतो, रोगांशी लढण्याची ताकद देतो. पण हे तिन्ही एकमेकांचे नैसर्गिक मित्र नाहीत. काही ठिकाणी त्यांची युती यशस्वी होते, तर काही ठिकाणी ती पूर्णपणे अपयशी ठरते.
नायट्रोजन आणि पोटॅश यांची युती मात्र मजबूत आहे. दोघे एकत्र आले की सरकार स्थिर राहतं. वाढ होते, पण ती आडवी-तिडवी होत नाही. पिक उंच वाढतं, पण कोसळत नाही. म्हणूनच या युतीवर आधारित खतं वर्षानुवर्षे चालत आलेली आहेत. इथे संघर्ष नाही, सहमती आहे, निष्क्रियता नाही. ही जणू बहुमताचं सरकार असतं. पण जसं राजकारणात काही पक्ष एकत्र आले की गोंधळ होतो, तसंच फॉस्फरस आणि कॅल्शियम एकत्र आले की थेट संघर्ष होतो. हे दोघे कट्टर विरोधक आहेत. एकत्र आले की लगेचच अघुलनशील संयुग तयार होतं, म्हणजेच खत असूनही पिकाला काहीच मिळत नाही. शेतकरी म्हणतो, ‘सगळं दिलं, तरी पीक का चाललं नाही?’ कारण त्या सरकारमध्येच अंतर्गत युद्ध चालू असतं. कागदावर सरकार असतं, पण प्रत्यक्षात प्रशासन ठप्प झालेलं असतं.
🌱 दुय्यम अन्नद्रव्य
दुय्यम अन्नद्रव्य म्हणजे कॅल्शियम (Calcium), मॅग्नेशियम (Magnesium) आणि सल्फर (Sulphur) हे जणू मध्यम पक्ष आहेत. फारसा गाजावाजा नाही, पण यांच्याशिवाय काम चालत नाही. मॅग्नेशियम आणि सल्फर एकत्र आले की काम सुरळीत चालतं. पण कॅल्शियम आला की समीकरणं बदलतात. तो पेशी मजबूत करतो, फळांचा दर्जा वाढवतो, पण चुकीच्या पक्षासोबत गेला तर सरकार अडचणीत येतं.
🌱 सूक्ष्म अन्नद्रव्य
सूक्ष्म अन्नद्रव्य (Micronutrients) म्हणजे झिंक (Zinc), आयर्न (Iron), कॉपर (Copper), मँगनीज (Manganese) हे छोटे पण प्रभावी पक्ष आहेत. त्यांची संख्या कमी असली तरी त्यांचा प्रभाव मोठा असतो. थेट चुकीच्या पक्षासोबत गेले, तर ते लगेच निष्क्रिय होतात. म्हणूनच इथे थेट युती न करता मध्यस्थ आणावा लागतो. चिलेटेड स्वरूप हे त्या मध्यस्थासारखं असतं. प्रत्यक्षात पक्ष वेगळे असतात, पण समान कार्यक्रमावर सरकार चालवलं जातं. बाहेरून पाहणाऱ्याला सरकार एकसंघ वाटतं, पण आतमध्ये खूप काळजीपूर्वक संतुलन साधलेलं असतं.
🌱 शेतकऱ्याच्या एक निर्णय महत्त्वाचा
हे सगळं राजकारण शेतकऱ्याच्या एका निर्णयावर अवलंबून असतं. कुठलं खत कधी, कुणासोबत, कुठल्या स्वरूपात द्यायचं – हा निर्णय म्हणजे मतदानासारखा असतो. चुकीच्या युतीला मत दिलं, तर सरकार अपयशी ठरतं. योग्य आघाडीला पाठिंबा दिला, तर पीक यशस्वी होतं. इथे शेवटी येतो तो खरा मुद्दा – शेतकरी हा केवळ सरकार बनवणारा नेता नाही, तर तो या व्यवस्थेतील एकमेव मतदार आहे. मातीमध्ये कुणाला सत्ता द्यायची, कुणाला बाहेर ठेवायचं, कुणाला मध्यस्थाच्या मदतीने संधी द्यायची, हे सर्व अधिकार शेतकऱ्याच्या हातात आहेत. खत टाकताना तो जर विचार न करता मतदान करत असेल, तर अपयश अटळ आहे. पण जर तो मूलद्रव्यांचं हे अदृश्य राजकारण समजून, जाणीवपूर्वक, संतुलित निर्णय घेत असेल, तर त्याचं पीक बहुमताने जिंकतं. म्हणून शेतीत यश हे खताच्या महागड्या पिशवीत नाही, तर शेतकऱ्याच्या समजूतदार मतात आहे. मातीतील राजकारण समजून घेणारा शेतकरीच खरा सजग मतदार आहे – आणि त्याच्याच शेतात विकासाचं सरकार टिकून राहतं.
🤝🏻 शेतकरी बंधूंनो, हे राजकारण समजून घ्या. सतरंज्या उचलण्यापेक्षा नक्कीच फायदा होईल.