krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Farmers, let’s move forward : शेतकरी बांधवांनो, चला पुढे जाऊया!

1 min read

Farmers, let’s move forward : जीवन गाणे गातच रहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे झाले गेले ते विसरून टाकायचे. मागचा खरिपाचा हंगाम फारच संकटमय गेला, हे खरं आहे. अवेळी आलेला पाऊस (Rain), महापूर (Flood), अतिवृष्टी (Heavy rain) आणि कमी वेळेत झालेल्या मुसळधार सरींनी आपली पिकं उद्ध्वस्त (Crops destroyed) करून टाकली. हंगामच हातचा गेला. डोळ्यासमोर उभं केलेलं स्वप्न चिखलात गाडलं गेलं. पण शेतकरी म्हणजे काय? संकटाशी दोन हात करून पुन्हा उभं राहणारा, पडला तरी न थकणारा, न थांबणारा. म्हणूनच आपण आता मागे वळून न पाहता, पुढे पुढे जायचं.

आता रब्बीचा हंगाम (Rabi season) दारात उभा आहे. बदलत्या ऋतूचे वारे वाहू लागले आहेत. उ वापसा होईल, या काळात प्रत्येक शेतकऱ्यानं (Farmer) नव्या उमेदीनं, नव्या जोशानं कामाला लागलं पाहिजे. मागचं नुकसान विसरून, पुढल्या हंगामाची स्वप्नं रंगवायची. पिकं घेताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल – नुसता नफा पाहून पिकं निवडायची नाहीत. ‘जास्त मिळेल, एकदम श्रीमंत करू शकेल’ असा जुगार आता आपल्याला परवडणारा राहिला नाही. पिकं हमखास यायला हवीत, कमी का असेना पण नक्की मिळायला हवीत. आपल्याला पोटापुरता आधार मिळवून देणारी पिकं मुख्य क्षेत्रावर करावीत. आणि जी पिकं भावावर अवलंबून असतात, लॉटरी लागली तरच हातावर पैसा येतो अशी, ती फार मोठ्या प्रमाणावर न करता कमी क्षेत्रावर करून पाहावी.

आपल्या हवामानात, आपल्या जमिनीत जी पिकं चांगली उभी राहतात, बाजारात ज्यांना चालना मिळते, ती पिकं हंगामासाठी मुख्य आधार बनली पाहिजेत. रब्बी हंगाम हा अशा पिकांचा काळ आहे. गहू, हरभरा, ज्वारी, ऊस, कांदा, मका यासारख्या पिकांना महत्त्व द्यायला हवं. शिवाय, थोडं थोडं करून का होईना, फळबागेकडे वळायला हवं. कारण फळबाग म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनाला दीर्घकाळाचा आधार.

शेतकरी बांधवांनो, आपली कष्टं पांडुरंग बघतोय. तोच म्हणतोय – ‘तू कष्ट कर, मी तुझ्या पाठीशी आहे.’ म्हणून मेहनतीनं, चिकाटीनं, उमेदीनं आणि आत्मविश्वासानं रब्बी हंगामाचं स्वागत करूया. आजची वेळ कठीण आहे, पण उद्या उजाडणार आहे. या जमिनीतून आपण पुन्हा उभं राहणारच. पाऊल थांबवायचं नाही, मागं वळायचं नाही. संकटं कितीही आली तरी आपण राबून, उभं राहून, फळं मिळवायचीच. शेतकरी म्हणजे आशेचं प्रतीक. म्हणूनच या रब्बी हंगामाला नव्या उमेदीनं सामोरं जाऊया आणि आपलं जीवन समृद्ध करूया.

🤝🏻 ही मैत्री विचारांची

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!