My farmer brother : माझ्या शेतकरी भावा…
1 min read
My farmer brother : तुला जगलेच पाहिजे माझ्या भावा
तुझ्या लेकरासाठी
तुझ्या म्हाताऱ्या आईबापासाठी
आणि तुझ्या खांद्याला खांदा लावून राबणाऱ्या कारभारणीसाठी…
हे अगदीच मान्य आहे की, असे सल्ले देणे नक्कीच सोपे असते….
पर:दुख शीतल असते… तरीही सांगावेसे वाटतात चार शब्द….
पिकाचा चिखल बघताना, नांगरणीच्या दिवसापासून सगळे घामेजलेले दिवस तुला आठवत असतील…
उधारीवर घेतलेले बियाणे खते आणि औषधे… देणेकऱ्यांना दिलेले शब्द…
प्रकाशाकडे झेपावणारे बियाणाला फुटलेले अंकुर.. अंधार करील दूर अशी आशा…
अंकुर जागवता जागवता, बघता बघता सारे संपले…
माती सुद्धा जिथं वाहून गेली, तिथं आता कुठून सुरुवात करायची?
या तुझ्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही. ज्या मातीत जन्म झाला, ज्या मातीवर मोठा झाला ती मातीच शेतातून साथ सोडून गेल्यावर त्या उरलेल्या खडकावर डोके आपटायचं का? हे सारं सारं मनात येईल…
पण तरीही तुला जगावं लागेल… मातीमोल झालेलं पीक, शेतातली गेलेली माती आणि जगण्याचा आलेला चिखल… यातून उभे राहावे लागेल माझ्या भावा…
तू जर हताश होऊन निघून गेला तर त्या मागच्या माणसांनी कुणाकडे बघायचं मला सांग….?
मान्य आहे, व्यवस्थेच्या या गर्दीतही तू एकटा आहेस… तुझ्या शेतावर फिरणारे चॅनेलचे कॅमेरे लगेच पुन्हा नेत्यांची एकमेकातील भांडणे दाखवायला पुन्हा मुंबईत सरकलीत…
तुझ्या दुःखाला टीआरपी नाही मित्रा..
टीआरपीसाठी एक पडळकर तुझ्या दुःखाला भारी आहे.. तू बांधावर रडत बसताना, चिखलात लोळताना मुंबईत आय फोन खरेदीसाठी चेंगराचेंगरी होते आहे… ही विसंगती हाच व्यवस्थेचा खरा चेहरा आहे.
तुला नुकसान भरपाई का मिळत नाही हे विचारण्यापेक्षा मध्य प्रदेशात एका बाईला दोन पाणीपुरी कमी मिळाल्या हे रिल शेअर करण्यात आम्हाला गंमत वाटतेय…. या मानसिकतेतील अंतराला शरद जोशी भारत इंडिया म्हणत होते…
विचार करण्याचे इंद्रिय मेंदू नसून खिसा आहे असे त्यामुळेच ते बोलत होते…

शेतकऱ्यावर काहीच आमचे अवलंबून नाही.. त्याच्या आनंदावर आमचे सुख अवलंबून नाही आणि त्याच्या रडण्याने आमचे काहीही बिघडत नाही.. अशी मानसिकता तयार झालेला बांडगुळी वर्ग हीच आजची समस्या आहे…. त्याच्या डिजे वर नाचण्याचा आवाजात तुमच्या किंकाळ्या व्यवस्थेपर्यंत जाणारच नाहीत… मिरवणुकीत लावलेल्या लाईटच्या प्रकाशझोतात तुझ्या आयुष्यातला अंधार पोहोचणार नाही मित्रा….
ट्रम्प त्यांच्या आयुष्यावर परिणाम करू शकतो पण तुझ्या दुःखाने त्यांच्या आयुष्यावर ओरखडाही उमटणार नाही हा त्यांचा आत्मविश्वास तुझ्या दुःखाला अधिकच गहिरे करणारा आहे.. तुला कर्जमाफी दिल्यावर आमच्या टॅक्स मधून का देता हा प्रश्न विचारणारा आणि कर्ज बुडवून पळालेल्या वेळी गप्प राहणारा हाच वर्ग आहे.. या बोलक्या वर्गाचे मौन तुझ्या दुःखाचा सन्नाटा अधिकच गहिरा करत आहे भावा…
पण जेव्हा सावरशील तेव्हा बांधावर उभा राहून व्यवस्थेला प्रश्न विचारावे लागतील… आज सारे एकटे पडलेत त्यामुळे प्रत्येक संकट हवालदिल करून टाकते… एकेकाळी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या संघटना होत्या.. तेव्हा कितीही संकट आली तरी आपण एकटे नाही ही भावना सुद्धा त्या संकटातून तरुन नेत होती… शेतकऱ्यांना चक्काजाम केला की सरकारे जाम होत होती. आज आपण संघटित नाही, विखुरलेले आहोत… त्यातून एकटेपण अधिक गहिरं होत आहे…
निसर्गाशी लढणं कठीण आहे पण सरकार आणि या लुटीच्या व्यवस्थेशी नक्कीच लढता येईल… आपल्या हक्काचा वाटा सरकारकडे मागता येईल.. ट्रिलियन डॉलर मध्ये वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा प्रवाह जर मेट्रो आणि महामार्ग बांधायला आणि शेअर मार्केट फुलण्याकडे जाणार असेल… शरद जोशींच्या शब्दात भारताचे रक्त शोषून इंडिया कडेच जाणार असेल तर तो प्रवाह त्या प्रवाहात उतरून तो प्रवाह उलटा फिरवावा लागेल… आपल्याच पोटची पोर गोडी गुलाबी करून व्यवस्थेचे दलाल होऊन आपल्याला व्यवस्थेच्या दावणीला बांधत असते तर तो कावा ओळखून त्यांनाही झटकावे लागेल आणि त्या व्यवस्थेचा हिशोब बांधून मांडावा लागेल मित्रा… त्यासाठी भांडावा लागेल मित्रा.
तेव्हा पंचनामे करा आणि हेक्टरी मदत करा, इथेच न थांबता माझ्या शेतातून या व्यवस्थेने नेलेल्या रुपया रुपयाच्या हिशोब या व्यवस्थेला मागाव लागेल मित्रा… एक पाऊस जर संपूर्ण संसाराची धूळधाण उडवत असेल तर या व्यवस्थेत एका दाण्याचे शंभर दाणे करून सुद्धा आपल्या पदरात काय पडलं याचा सुद्धा हिशोब मांडायची हीच वेळ आहे… इतकी केविलवाणी अवस्था का झाली आमची?…. पाऊस वर्षभर सारखा पडत राहणार, पावसाने साथ दिली तर बाजार भाव पाडत राहणार.. कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ… पडणारा पाऊस आणि पडणारे भाव यातून सुटका होणार की नाही….?
तेव्हा उठ आता डोळे पूस,
भांबावलेल्या लेकरांच्या डोक्यावरून हात फिरवून शेतात चल…
आणि जेव्हा सावरशील, तेव्हा आता संघटित व्हायचा निर्धार कर
पुन्हा एकदा महाराष्ट्रात सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्यांचा आवाज बुलंद केला तर अर्थव्यवस्थेचा इंडियाकडे गेलेला प्रवाह पुन्हा खेड्याकडे वाहू लागेल… तुझ्या संघटित शक्तीला टीआरपी असेल, माध्यम सुद्धा पुन्हा बांधा बांधावर फिरू लागतील… शेतकऱ्याच्या संघटित शक्तीला ओलांडून कोणालाच जाता येणार नाही.. शेताचे पंचनामे जरूर झाले पाहिजेत.. पण व्यवस्थेचा पंचनामा करून पुन्हा एकदा राजकारणाच्या चिखलात संघटनाची पेरणी करावी लागेल… आंदोलनांचे खत टाकावे लागेल त्यातून फुलून येणारे पीक हेच अंतिम उत्तर असेल, व्यवस्थेला झुकवणारे….