Crop damage Employee salary : पाऊस पडो की न पडो, आमचे पगार चालू राहतात !
1 min read
Crop damage Employee salary : टीव्हीच्या पडद्यावर अतिवृष्टीने (Heavy rain) झालेली वेदना बघतोय. लहान मुलासारखे धाय मोकलून रडणारे शेतकरी (Farmer) आणि त्यांच्या भकास नजरा… नुसते बघणे अशक्य होताना जगणे कसे असेल…? कोणत्या आशेवर ते पुन्हा शेतात जात असतील…? ‘पाऊस पडो की न पडो, आमचे पगार (salary) चालू राहतात,’ असे एक वाक्य काही दशकांपूर्वी प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ वि. म. दांडेकर बोलले होते. आज अतिवृष्टीने शेतीची जी भयानक स्थिती झाली आहे, तेव्हा ते वाक्य आठवले. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आणि शेतकरी यांची तुलना वि. म. दांडेकर यांनी केली होती. केवळ वेदना समजावून घेण्यासाठी हे रूपक वि. म. दांडेकर यांनी वापरले होते, हे लक्षात घ्यायला हवे… उगाचच त्यांनी नोकरदारांवर (Employee) टीका केली म्हणून गळे काढण्यात अर्थ नाही…!
उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अशी मांडणी पूर्वी लग्न ठरविताना वापरली जायची. याचे कारण शेतीमध्येच फायदा आहे, असे गृहीतक त्याच्या मागे होते पण आजच्या काळात शेतीची जी दुरावस्था झाली आहे, ती अतिशय वेदनादायक आहे. आज वर्तमानपत्रांमध्ये शेतीची मातीच वाहून गेली आणि फक्त खडक, दगड शेतात उरले, असे फोटो बघून अक्षरश: वेदना झाल्या.. आपण काहीच करू शकत नाही, ही आपली मर्यादा अधिकच अस्वस्थ करते.
आमच्या तालुक्यात एकदा शेतकऱ्याच्या शेतात डोंगराची दरड कोसळली. दुःखाचा डोंगर कोसळणे या शब्दाचा अर्थ मला त्या दिवशी समजला. ज्याच्यावर आयुष्य काढायचे ते साधनच हिरावले गेल्यानंतर काय परिस्थिती होत असेल…? थेट वेदना फोटो मधून आणि बातम्यांमध्ये शेतकऱ्यांचे अश्रू पिळवटून टाकतात. जेव्हा दुष्काळ असतो तेव्हा आकाशाकडे बघणारे शेतकरी आणि जेव्हा ओला दुष्काळ असतो. तेव्हा मान खाली घालून पाण्याकडे बघणारा शेतकरी या दोन टोकातून शेतकऱ्याची कधी सुटकाच होणार नाही का?
वि. म. दांडेकर म्हणाले तसे खाजगी क्षेत्रातील पगार आणि सरकारी क्षेत्रातील पगार हे तुलनेत स्थिर असतात. दांडेकर यांना असे म्हणायचे होते की निसर्गाच्या ऋतुचक्राचा फटका या स्थिर वर्गाला फार बसत नाही. अगदी कोरोना काळात सुद्धा सरकारने कर्मचाऱ्यांना त्यांचे पगार दिले. दांडेकर यांना असे म्हणायचे होते की असा एक वर्ग असतो की ज्या वर्गाला सरकार पूर्ण संरक्षण देते, त्या वर्गाच्या कुटुंबाची काळजी घेते, इतकेच काय त्यांच्या मृत्यूनंतरही कुटुंबाची काळजी घेते, त्याबद्दल तक्रार नाही. ते करायला हवेच पण ही संवेदनशीलता शेतकऱ्यांबद्दल कुठे जाते?
असंघटित बांधवांबद्दल ही सरकारी संवेदना कुठे जाते? आज मूठभर पॅकेजच्या नोकरी सोडल्या तर खाजगी क्षेत्रात सुद्धा 15 ते 20 हजारांवर काम करणाऱ्याची संख्या लाखांमध्ये आहे आणि ते रोजगारही कधीही जातील अशा प्रकारचे आहेत. तेव्हा एकीकडे निवडक उद्योगपती, सुरक्षिततेचे कवच लाभलेले सरकारी कर्मचारी, खाजगी क्षेत्रातील पॅकेज घेणाऱ्या वर्ग आणि दुसरीकडे अक्षरशः निसर्गाच्या हवाली केलेला हा दुर्दैवी शेतकरी वर्ग आणि ज्यांच्यावर विकासाचे पाणीच पडले नाही असा शहरात आणि खेड्यात राबणारा असंघटित वर्ग आणि अल्प वेतनावर काम करणारा कंत्राटी कामगार आणि कमी वेतन राबणारा वर्ग हे बघून खूप अस्वस्थता येते आणि शेतात नीट भागत नाही म्हणून शहरातला असंघटित आणि कंत्राटीवर्ग सुद्धा याच शेतकरी कुटुंबातला आहे हे आणखी एक दुष्टचक्र!
काल कापसाच्या शेतात साठलेल्या पाण्यामध्ये पोहणारे तरुण बघितले ते हसत होते व त्यांच्या हसण्यामागच्या दुःखाने वेदना झाल्या. पुन्हा या अतिवृष्टीतून शेतकऱ्यांची सुटका नाही, जी पिके वाचतील त्याला पण दिवाळीत पाऊस येणारच आहे आणि त्यातूनही काही फळबागा वाचल्या तर पुन्हा मार्च, एप्रिलमध्ये येणारा पाऊस त्यांनाही उद्ध्वस्त करून टाकेल. आपला साधा रुमाल हरवला तर दिवसभर चुटपुट लागते. डोळ्यासमोर आलेल्या पिकातून कर्ज फेडायचे किंवा डोळ्यासमोर आलेल्या पिकातून आपल्याला दारिद्र्यातून किमान एक पाऊल बाहेर निघता येईल, अशी स्वप्न बघायची आणि क्षणात होत्याचे नव्हते, कशी मन:स्थिती टिकवत असतील? खत आणि बियाणे देणाऱ्या दुकानदारालाही पीक विकलं की तुझे पैसे देतो, असे सांगणारे शेतकरी त्या दुकानावरून खाली मान घालून जाताना किती लज्जित होत असतील?
मुलामुलींचे शिक्षण, लग्न, जुनाट घराची दुरुस्ती, समोर ठेवलेली स्वप्नं क्षणात वाहून जाताना काय वाटत असेल? आज मराठवाडा मुक्ती संग्राम शुभेच्छा फिरणाऱ्या पोस्ट आणि बातम्या वाचताना मला फक्त मराठवाड्यातल्या खेड्यापाड्यात रडणारा शेतकरी आठवत होता. मान टाकलेला कापूस आणि बुडालेला सोयाबीन दिसत होता. राजवटी बदलल्या निजामाची राजवट जाऊन आम्ही आमचे सरकार आणले हे नक्कीच चांगले झाले. पण शेतकऱ्याच्या गुलामगिरीचे काय? शेतकऱ्याला आज जी अस्थिरता आहे, त्या राजवटीतही होती आणि या राजवटीत आहे. कितीही नुकसान झाले तरी त्याला किमान जगण्यात आधार देईल, अशी व्यवस्था कधी निर्माण होईल? विलक्षण अस्वस्थता येते.
ज्या वर्गाने भांडून त्यांचे अधिकार मिळाले आहेत, ते सरकारी कर्मचारी असतील किंवा खाजगीकरणातील कौशल्य मिळवून लाखोंचे पॅकेज मिळवणारे तरुण असतील त्यांच्याबद्दल असूया नाही, पण या माणसांचे काय होईल? कसे जगायचे या माणसांनी? म्हणून सकाळपासून वि. म. दांडेकर यांचे ते वाक्य आठवते आहे, ‘पाऊस पडो किंवा न पडो पगार मात्र चालू राहतात.’ शेतकऱ्यांची मन:स्थिती किती नाजूक झाली आहे, हे विहिरीत उडी मारलेल्या शेतकऱ्यांच्या घटनेने दाखवले आहेत. तेव्हा शेतकऱ्यांना मानसिक आधार देणे, उभारी देणे हे करणे नुकसान भरपाई देणे इतकेच महत्त्वाचे आहे, अन्यथा आत्महत्या वाढण्याची भीती आहे. मोठ्या संख्येने शेतकरी आज निराशेने त्याच वर्तुळाकडे खेचले जाण्याची भीती वाटते.
शेतकरी आत्महत्यावर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांनी हे वास्तव बघून शेतकरी कशी मन:स्थिती टिकवत असतील, याचा विचार करावा. ऋतुमानात इतके टोकाचे बदल दिसत आहेत तर शेतीची फेररचना कशी करता येईल, त्याचे कायमस्वरूपी उपाय आता करावे लागणार आहेत. त्यासाठी शेतीत मोठी गुंतवणूक करावी लागेल. परंतु, शरद जोशी म्हणायचे तसे ‘भारत आणि इंडिया’ अशी गुंतवणूक सुरू आहे. मेट्रोच्या एका किलोमीटरला आणि महामार्ग बांधण्यासाठी एका किलोमीटरला किती खर्च येतो, याची आकडे सातत्याने समोर येतात. शहरी भागातल्या गुंतवणुकीसाठीच सरकार आहे की काय? काल या नुकसानी होताना प्रत्येक नगरपालिकेला एक कोटी रुपयांची बाग तयार करायला एकूण 400 कोटी रुपये सरकारने मंजूर केले. सडून जाणाऱ्या द्राक्षाच्या, डाळींबाच्या बागांपेक्षा शहरातल्या बागेवर गुंतवणूक करणारी सरकारी मानसिकता कधी बदलणार? त्यामुळे पंचनामे आणि नुकसान भरपाई पलीकडे जाऊन शेती धोरणाची फेररचना आणि शहरी भागातील गुंतवणुकीपेक्षा शेतीत गुंतवणूक हेच दोन मुद्दे चर्चेला घ्यायला हवे.
हे विषय सातत्याने लावून धरावेत, अशा संघटनाही ताकदवान राहिल्या नाहीत, त्याचा फायदा सरकार घेते. पण दुर्दैवाने या दुःखालाही आता reels सारखे अल्प आयुष्य आहे. काही दिवसात या बातम्या बाजूला जाऊन त्याची जागा महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीच्या बातम्या घेतील. सोशल मीडियातील पोस्टही बदलत जातील आणि उरतील फक्त आत्महत्याचे आकडे! ते आकडे आणि त्याला सरावलेले आपण सगळे….! दीर्घकालीन काय करायचं…?