krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Evergreen Conocarpus tree : कर्दनकाळ ठरणारे सदाहरीत ‘कोनोकार्पस’

1 min read

Evergreen Conocarpus tree : अलीकडे मार्गांच्या साैंदर्यीकणाला विशेष महत्त्व दिले जात आहे. साैंदर्यीकरणासाबतच पर्यावरण संवर्धनास (Environmental Conservation) मदत व्हावी म्हणून बहुतांश राेडच्या दुतर्फा, दुभाजकात (Divider) आणि शहरांमधील बागांमध्ये आकर्षक दिसणारी, तसेच कमी कष्ट व देखाभालीत वर्षभर हिरवीगार राहणाऱ्या झाडांच्या लागवडीला प्रथम प्राधान्य दिले जाते. या सदाहरीत झाडांमध्ये ‘कोनोकार्पस’ या झाडाचे प्रमाण खूपच अधिक असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, हे झाड पर्यावरणासह मानवी आराेग्यासाठी कर्दनकाळ ठरू शकते.

♻️ सर्वांचे आवडते झाड
या कोनोकार्पस इरेक्टस (Conocarpus erectus) झाडाला इंग्रजीत बटन वूड ट्री (Buttonwood tree), असे म्हणतात. हे झाड कमी काळात वाढत असल्याने तसेच सुबक व डाैलदार दिसत असल्याने बाग आणि विकास कामांमध्ये ते सर्वांचे आवडते आहे. त्यामुळे महाराष्ट्रात या झाडांची संख्या अधिक दिसून येते. विशेष म्हणजे, या झाडाला काेणताही शाकाहारी प्राणी ताेंड देखील लावत नाही. ते कमी पाण्यात तग धरून राहते व अती पाण्यामुळे खराब देखील हाेत नाही. त्यामुळे या झाडाच्या लागवडीचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती हाॅर्टिकल्चरिस्ट प्रा. डाॅ. याेगेश पावशे यांनी दिली.

♻️ मानवी आरोग्याच्या समस्या
या झाडाच्या परागकणांमुळे (Pollens) आणि धुरकणांमुळे (Dust trapping) तसेच त्यावरील प्रदूषित धुळीचे कण, राेगकारक बुरशी, सूक्ष्म जीवांचे बिजाणू असे असंख्य कण हवेत सतत तरंगत असतात. श्वास घेताना नाकातील केसांची लव व श्लेष्मा या कणांना अडवतात. काहींना या कणांमुळे ॲलर्जी हाेते. इतर झाडांच्या तुलनेत कोनोकार्पसचे परागकण मानवी आराेग्याला हानीकारण असल्याने त्याचा
मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अनेकांना सर्दी, दमा, खोकला आणि अ‍ॅलर्जी इत्यादी श्वसनाचे आजार (Respiratory problems) वाढू शकतात.

♻️ पर्यावरणावर नकारात्मक परिणाम
कोनोकार्पस झाड वेगाने वाढते आणि ते स्थानिक (native) झाडांसाठी स्पर्धा निर्माण करते. या झाडांची मुळे जमिनीत खूप खोलवर जातात व आत माेठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त वाढतात. त्यामुळे ही झाडे इतर झाडांची वाढीला बाधा निर्माण करत असल्याने इतर झाडांची पूर्ण क्षमतेचे वाढ होत नाही. त्यामुळे स्थानिक जैवविविधता (Biodiversity) धोक्यात येते.

♻️ मातीची गुणवत्ता खराब करणे
या झाडाच्या मुळांपासून काही प्रकारचे रसायन (Allelopathic chemicals) मोकळे होतात, जे आजूबाजूच्या इतर वनस्पतींच्या वाढीस अडथळा करतात. या झाडांच्या मुळांमध्ये विशिष्ट प्रकारचे रसायन तयार हाेत असल्याने ते मातीची गुणवत्ता खराब करते.

♻️ पाणी शोषण खूप जास्त
या झाडाची मुळे जमिनीत खूप खाेलवर जातात आणि अवास्तव वाढत असल्याने ती जमिनीतील पाणी माेठ्या प्रमाणात शाेषून अथवा ओढून घेतात. त्यामुळे भूजल पातळी कमी हाेते. विशेषतः कोरड्या भागात (जसे गुजरातमधील कच्छ) या झाडांमुळे भूजल पातळीवर (Groundwater level) वाईट परिणाम होतो.

♻️ आगीचा धोका
कोनोकार्पसचे कोरडी पान आणि फांद्या सहज पेट घेत असल्याने शहरी भागात आग लागण्याचा धोका वाढतो.

♻️ शहरी भागातील नुकसान
कोनोकार्पस झाडांची मुळे (Roots) प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने शहरांमधील रस्ते, दूरसंचार केबल्स, इतर केबल्स, ड्रेनेज , पाणीपुरवठा पाईप्स आणि इमारती यांना नुकसान होऊ शकते.

♻️ चार राज्यांमध्ये बंदी
कोनोकार्पसचे गुणधर्म आणि त्याच्यापासून हाेणारे दुष्परिणाम विचारात घेत तेलंगणात सन 2022 मध्ये, गुजरातमध्ये 23 सप्टेंबर 2023 राेजी, आंध्र प्रदेशात सन 2024 मध्ये तामिळनाडूत 1 जानेवारी 2025 राेजी या झाडाच्या लागवडीवर तेथील राज्य सरकारने बंदी घातली आहे. ही बंदी घालताना तेथील सरकारांनी त्याची कारणे देखील स्पष्ट केली आहे. भूजल पातळी कमी हाेणे, मानवी व सर्वजनिक आराेग्यावर विपरित परिणाम हाेणे, नागरिकांना श्वासनाचे आजार हाेणे, त्यात वाढ हाेणे, शहरांमधील नागरी सुविधांचे नुकसान हाेणे आदी महत्त्वाची कारणे या चारही राज्यांमधील सरकारांनी दिली आहेत. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये या झाडांची लागवड केली जात आहे.

ही झाडे निसर्गातील जैवविविधतेला धाेका निर्माण करतात. या झाडावर काेणताही पक्षी कधीच बसत नाही किंवा त्यांची घरटी तयार करीत नाही. काेणताही प्राणी पाने खाण्यासाठी या झाडाला ताेंड लावत नाही किंवा त्याचा वासही घेत नाही. राज्य सरकारने ‘नीरी’च्या माध्यमातून या झाडावर संशाेधन करावे. संशाेधनाच्या निरीक्षणातून या झाडाचे उपद्रवमूल्य लक्षात घेऊन त्याच्या लागवडीवर बंदी घालण्याचा विचार करावा, असे मत हाॅर्टिकल्चरिस्ट प्रा. डाॅ. याेगेश पावशे यांनी व्यक्त केले आहे.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!