Unseasonal rain weather : आगामी 20 दिवस अवकाळी पावसाचे वातावरण
1 min read
Unseasonal rain weather : यावर्षी मान्सून (Monsoon) 23 ते 31 मे दरम्यान कधीही केरळमध्ये दाखल होऊ शकतो. अंदमान व आग्नेय बंगालच्या उपसागरात दाखल झालेला मान्सून चांगला कोसळत असून, त्याच्या पुढील वाटचालीस अनुकूल वातावरण तयार होत आहे. आज (दि. 12 मे)पासून पुढील 15 ते 20 दिवस म्हणजे 31 मे पर्यंत म्हणजेच मान्सून केरळात दाखल होईपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत दिवसागणिक मान्सूनचा नव्हे तर मान्सूनपूर्व (Pre-monsoon) विजा, वारा वावधनासह मान्सूनपूर्व अवकाळी पावसाची (Unseasonal rain) शक्यता जाणवते. त्यातूनच कदाचित महाराष्ट्रात पेरणीपूर्व शेतीच्या मशागतींना चालना मिळू शकते. शेतकऱ्यांनी लक्ष ठेवून आवश्यक असलेल्या खरीप पेरणीपूर्व मशागत करावी.
🎯 तापमान
अवकाळीच्या वातावरणामुळे महाराष्ट्रात दिवसाचे कमाल तापमान (Temperature), त्याचबरोबर पहाटेचे किमान तापमानही सरासरीच्या खालीच राहण्याची शक्यता आहे. अर्थात 4-5 दिवसासाठी तापमानात थोडी चढ-उतार जरी जाणवली तरी एकंदरीत उर्वरित मे महिन्यात दिवसाची उष्णता व रात्रीचा उकाडा विशेष जाणवणार नाही. हे वातावरण (Atmosphere) महाराष्ट्रभर राहील.
🎯 मान्सूनची शक्यता
प्रशांत महासागरातील समुद्री पाण्याचे तापमान व तेथील हवेचे दाब व मान्सून आगमनासंबंधीच्या इतर पाच वातावरणीय घडामोडी पाहता मान्सून देशाच्या दक्षिण टोकावर म्हणजे केरळमध्ये सरासरी तारखेच्या चार दिवस अगोदर म्हणजे 27 मे या प्रावधानिक तारखेला दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील वर्षी 30 मे राेजी अपेक्षित असताना तो 31 मे ला केरळात दाखल झाला हाेता. प्रत्यक्षात मान्सूनची अरबी समुद्रीय शाखा महाराष्ट्रात 10 ते 11 जूनला पोहोचली होती. परंतु, मान्सूनी प्रवाहात ताकद नव्हती. या वर्षी 27 मे या तारखेत कमी अधिक चार दिवस विचारात घेतले तर मान्सून केरळात 23 ते 31 मे दरम्यान कधीही दाखल होऊ शकतो.
मुंबईत 10 जूनला व सह्याद्री ओलांडून महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात 15 जूनला मान्सून अपेक्षित असला तरी अरबी समुद्रात पश्चिम किनारपट्टी समांतर मुंबईकडे येणाऱ्या मान्सूनच्या प्रवाहात बळकटपणा किती आहे, हे पाहूनच महाराष्ट्रात मान्सून जूनच्या कोणत्या तारखेला प्रवेश करेल, हे सांगता येईल. त्या अगोदर पूर्वमोसमी अवकाळी पावसाच्या सरीची अपेक्षा करू या! दिवसाची उष्णता व रात्रीचा उकाडा विशेष जाणवणार नसल्याने या वर्षीचा मे महिना आल्हाददायक जाईल असे वाटते.