krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Soybean production; World & India : सोयाबीन उत्पादन; जग कुठे अन् भारत कुठे?

1 min read

Soybean production; World & India : चालू हंगामातील साेयाबीन (Soybean) आता बाजारात यायला सुरुवात झाली आहे.मागील वर्षीपासून साेयाबीनचे दर एमएसपीच्या (किमान आधारभूत किंमत – Minimum support price) आसपास घुटमळत आहेत. केंद्र सरकारने यावर्षी साेयाबीनची एमएसपी प्रतिक्विंटल 4,892 रुपये जाहीर केली असली तरी दर मात्र 3,800 ते 4,700 रुपयांच्या दरम्यान आहेत. अलीकडे दरात प्रतिक्विंटल 100 ते 200 रुपयांचा चढ उतार बघायला मिळत आहे. हा चढ उतार साेयाबीन ढेपेच्या दरामुळे आहे. जगाच्या (World) तुलनेत भारतातील (India) साेयाबीनचा उत्पादन खर्च (Production costs), उत्पादकता (Productivity) व दर (Price) विचारात घेता भारतीय साेयाबीन उत्पादकांची स्थिती विदारक आहे.

🌎 जगातील साेयाबीन उत्पादनात भारताचा वाटा
जगात साेयाबीन उत्पादनामध्ये ब्राझील (Brazil) पहिल्या क्रमांकावर असून, दुसऱ्या स्थानावर अमेरिका (America) आणि तिसऱ्या क्रमांकावर अर्जेंटिना (Argentina) तर चाैथ्या स्थानावर चीन (China) आहे. या क्रमावारीत भारताचा पाचवा क्रमांक लागताे.

🎯 देश उत्पादनातील वाटा
🔆 ब्राझील :- 39 टक्के
🔆 अमेरिका :- 29 टक्के
🔆 अर्जेंटिना :- 13 टक्के
🔆 चीन :- 5 टक्के
🔆 भारत :- 3 टक्के
🔆 पॅराग्वे :- 3 टक्के
🔆 इतर देश :- 8 टक्के

🌎 वाढता उत्पादन खर्च
जागतिक पातळीवर सर्व पिकांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. यात साेयाबीनच्या पिकाचाही समावेश आहे. ब्राझील, अमेरिका व अर्जेंटिनामध्ये सन 2016 ते 2023 या काळात साेयाबीनच्या उत्पादन खर्चात किमान 7 ते 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. इंधनासह कृषी निविष्ठांच्या दरात वाढ झाल्याने या देशातील साेयाबीनचा उत्पादन खर्च वाढला आहे. भारतात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांमुळे कृषी निविष्ठांचे दर वाढले असून, मजुरीच्या दरातही माेठी वाढ झाली आहे.

🔆 ब्राझील :- 782 डॉलर – 65,500 रुपये प्रतिहेक्टर
🔆 अमेरिका :- 665 डॉलर – 55,780 रुपये प्रतिहेक्टर
🔆 अर्जेंटिना :- 351 डॉलर – 29,441 रुपये प्रतिहेक्टर
🔆 भारत :- 476.87 डाॅलर – 40,000 रुपये प्रतिहेक्टर
🌀 विनिमय दर :- 1 डाॅलर – 83.88 रुपये.

ब्राझील व अमेरिकेच्या तुलनेत भारताचा साेयाबीन उत्पादन खर्च कमी आणि अर्जेंटिनाममधील उत्पादन खर्चापेक्षा अधिक आहे. त्यामुळे भारतीय साेयाबीन उत्पादक अवास्तव खर्च करतात, असे म्हणणे संयुक्तिक ठरत नाही.

🌎 हेक्टरी उत्पादकता
जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताची साेयाबीन उत्पादकता फारच कमी आहे. साेयाबीनचे उत्पादन, उत्पादन खर्च आणि प्रतिहेक्टरी उत्पादकतेही ब्राझील प्रथम क्रमांकावर असून, अमेरिका दुसऱ्या आणि अर्जेंटिना तिसऱ्या स्थानावर आहे.

🎯 देश – पेरणीक्षेत्र – उत्पादकता
🔆 ब्राझील :- 458 लाख हेक्टर – 33 क्विंटल प्रतिहेक्टर
🔆 अमेरिका :- 333 लाख हेक्टर – 34 क्विंटल प्रतिहेक्टर
🔆 अर्जेंटिना :- 165 लाख हेक्टर – 30 क्विंटल प्रतिहेक्टर
🔆 चीन :- 105 लाख हेक्टर – 20 क्विंटल प्रतिहेक्टर
🔆 पॅराग्वे :- 37 लाख हेक्टर – 29 क्विंटल प्रतिहेक्टर
🔆 भारत :- 124 लाख हेक्टर – 10 क्विंटल प्रतिहेक्टर
🌀 सोयाबीन पेरणीक्षेत्र व उत्पादकता आकडे सन 2023 च्या हंगामातील आहे.

या आकडेवारीवरून असे लक्षात येते की, अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटिनाच्या तुलनेत भारतीय साेयाबीन उत्पादकांना प्रतिहेक्टर उत्पादन किमान तीन ते साडेतीन पटीने किमी आहे. पॅराग्वे (Paraguay)ची साेयाबीन उत्पादकता ही भारताच्या तिप्पट तर चीनची उत्पादकता दुप्पट आहे.

🌎 साेयाबीनचे सध्याचे दर
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे सरासरी दर 10 डॉलर प्रतिबुशेल्सच्या आसपास आहे. रुपयांमध्ये हा दर 33 रुपये प्रति किलाे म्हणजेच 3,300 रुपये प्रतिक्विंटल हाेताे. दाेन आठवड्यांपूर्वी हेच दर 9.55 डाॅलर प्रतिबुशेल्स हाेते. रुपयांमध्ये हे दर 3,153 रुपये प्रतिक्विंटल हाेतात.
🌀 1 बुशेल = 56 पाउंड = 25.4 किलाे.

ब्राझील
ब्राझीलमध्ये सन 2023 च्या हंगामात प्रतिहेक्टर 33 क्विंटल साेयाबीनचे उत्पादन झाले. 3,000 रुपये प्रतिक्विंटल दराने ब्राझीलच्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर 99 हजार रुपये (1,180.25 डाॅलर) मिळाले. यातून त्यांचा 65,500 रुपयांचा उत्पादन खर्च वजा करता ब्राझीलच्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर 33,500 रुपये (399.38 डाॅलर) मिळाले.

अमेरिका
सन 2023 च्या हंगामात अमेरिकेतील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर 34 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन झाले. त्यांना 3,000 रुपये प्रतिक्विंटल दराने प्रतिहेक्टर 1,02,000 रुपये (1,216.02 डाॅलर) मिळाले. त्यांचा 55,780 रुपये प्रतिहेक्टर उत्पादन खर्च वजा करता त्यांना 46,220 रुपये (551.02 डाॅलर) मिळाले.

अर्जेंटिना
अर्जेंटिनामध्ये सन 2023 च्या हंगामात प्रतिहेक्टर 30 क्विंटल साेयाबीनचे उत्पादन झाले. 3,000 रुपये प्रतिक्विंटल दराने तेथील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर 90,000 रुपये (1,072.96 डाॅलर) मिळाले. त्यांचा 29,441 रुपये प्रतिहेक्टर उत्पादन खर्च वजा करता त्यांना 60,559 रुपये (721.97 डाॅलर) वाचले.

भारत
भारतात सन 2023 च्या हंगामात प्रतिहेक्टर 10 क्विंटल साेयाबीनचे उत्पादन झाले. या काळात शेतकऱ्यांना सरासरी 4,000 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला म्हणजेच भारतीय साेयाबीन उत्पादकांना प्रतिहेक्टर 40,000 रुपये मिळाले. यातून भारतातील साेयाबीनचा 40,000 रुपये प्रतिहेक्टर उत्पादन खर्च वजा केल्यास भारतीय साेयाबीन उत्पादकांच्या हाती रुपया देखील वाचला नाही.

🎯 सोयाबीन उत्पादकांचे निव्वळ उत्पन्न
🔆 ब्राझील :- 33,500 रुपये – 399.38 डाॅलर प्रतिहेक्टर
🔆 अमेरिका :- 46,220 रुपये – 551.02 डाॅलर – प्रतिहेक्टर
🔆 अर्जेंटिना :- 60,559 रुपये – 721.97 डाॅलर – प्रतिहेक्टर
🔆 भारत :- 00,000 रुपये प्रतिहेक्टर

आंतरराष्ट्रीय बाजारात साेयाबीनचे दर भारतीय बाजारापेक्षा 1,000 रुपये 1,500 रुपये प्रतिक्विंटल कमी आहेत. तरीही ब्राझील, अमेरिका व अर्जेंटिनातील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर 33,500 रुपये ते 60,559 रुपये प्रतिहेक्टर निव्वळ उत्पन्न हाेते. विशेष म्हणजे, भारताच्या तुलनेत या तिन्ही देशांमधील साेयाबीनचा उत्पादन खर्च अधिक आहे. तरीही भारतीय साेयाबीन उत्पादकांच्या हाती रुपया देखील शिल्लक राहिला नाही. याची कारणमिमांसा करून वेळीच याेग्य व दीघकालीन उपाययाेजना करणे आवश्यक आहे.

🌎 शेतीचा आकार व उत्पन्न
या देशांच्या तुलनेत भारतीय शेतकऱ्यांकडील शेतीचा आकार कमी असून, भारतात अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. भारतात एकूण लाेकसंख्येच्या तुलनेत शेतकऱ्यांची संख्या 52 ते 55 टक्के असून, ब्राझील, अमेरिका व अर्जेंटिनामध्ये शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. या तिन्ही देशामधील शेतकऱ्यांची जमीनधारणा क्षमता अधिक असून, त्यांच्याकडे प्रत्येकी किमान 10 ते 50 हेक्टर शेतजमीन क्षेत्र आहे. भारतात मात्र कमाल जमीन धारण कायदा याला आड येत आहे. अमेरिकेतील एका शेतकऱ्याने जर 10 हेक्टरमध्ये साेयाबीनचे उत्पादन घेतले तर त्याला 4 लाख 22 हजार 200 रुपये म्हणजेच 5,510.26 डाॅलर निव्वळ उत्पन्न मिळते.

🌎 साेयाबीन उत्पादनातील तफावत
सन 2023 च्या हंगामात पॅराग्वेमध्ये एकूण 39 लाख हेक्टरमध्ये साेयाबीनची पेरणी करण्यात आली हाेती. यातून त्यांना 105 लाख टन साेयाबीनचे उत्पादन झाले. याच हंगामात भारतात 124 लाख हेक्टरमध्ये साेयाबीनची पेरणी (sowing) करण्यात आली आणि त्यातून 120 लाख टन साेयाबीचे उत्पादन झाले. भारताच्या तुलनेत पॅराग्वेचे साेयाबीन पेरणीक्षेत्र तिप्पटीने कमी असूनही त्यांनी उत्पादनात भारताची बराेबरी साधली आहे.

🌎 साेयाबीनचे अर्थशास्त्र
साेयाबीन या पिकाचा समावेश तेलबियांमध्ये हाेत नाही. साेयाबीनचे तेल भारताव्यतिरिक्त जगात कुठेही खाण्यासाठी वापरले जात नाही. साेयाबीनमध्ये तेलाचे प्रमाण केवळ 13 ते 14 टक्के असते. त्यामुळे एक क्विंटल साेयाबीनपासून तूट जाता केवळ 12 किलाे तेल आणि 85 ते 86 किलाे ढेप मिळते. भारतात मात्र साेयाबीन तेलाच्या दराचा संबंध साेयाबीनच्या दराशी जाेडला जाताे. इतर तेलबियांचे अर्थशास्त्र त्यातील तेलाचे प्रमाण आणि तेलाच्या दरावर अवलंबून आहे. साेयाबीनचे अर्थशास्त्र मात्र साेयाबीनच्या ढेपेच्या दरावर अलवंबून आहे. जागतिक बाजारात जीएम (GM – Genetically Modified Seeds) आणि नाॅन जीएम (Non GM – Non Genetically Modified Seeds) साेयाबीन व साेया ढेपेचे (Soya DOC – de-oiled cake) दर सारखेच असतात. मागच्या आठवड्यापर्यंत जागतिक बाजारात साेया ढेपेचे दर सरासरी 305 डाॅलर (25,583 रुपये) प्रति टन म्हणजेच 30.50 डाॅलर (2,558 रुपये) प्रतिक्विंटल हाेते. सध्या हे दर 317 डाॅलर (26,589 रुपये) प्रति टन म्हणजेच 31.70 डाॅलर (2,658 रुपये) प्रतिक्विंटल झाले आहेत. जागतिक पातळीवर ढेपेचे दर वधारल्याने भारतातील साेयाबीनचे दर प्रतिक्विंटल 150 ते 300 रुपयांनी वाढल्याचे दिसून येत आहे.

🌎 सरकारने या उपाययाेजना कराव्या
भारतीय साेयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ब्राझील, अमेरिका व अर्जेंटिनातील शेतकऱ्यांप्रमाणे सोयाबीन उत्पादनातून उत्पादन खर्च वजा जाता हेक्टरी किमान 30,000 रुपये मिळावे, यासाठी सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान 7,000 रुपये दर मिळेल, अशी व्यवस्था सरकारला करावी लागेल. भारतीय शेतकऱ्यांच्या साेयाबीनला सन 2022-23 मध्ये बऱ्यापैकी दर मिळाला. त्यानंतर व आधी ताेटाच सहन करावा लागला. सन 2023 मध्ये तर साेयाबीनच्या दराने मागील चार वर्षातील निच्चांकी पातळी गाठली हाेती. हीच स्थिती चालू म्हणजेच 2024-25 च्या हंगामात राहणार आहे. ही तूट भरून काढण्यासाठी केंद्र व राज्य सरकार काहीच उपाययाेजना करणार नाही आणि करायला तयार देखील नाही. ही परिस्थिती बदलविण्यासाठी तसेच भारतीय साेयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जगाशी स्पर्धाक्षम तयार करण्यासाठी त्या तिन्ही देशांप्रमाणे साेयाबीनची प्रतिहेक्टरी उत्पादकता वाढविणे, त्यासाठी साेयाबीन बियाण्यांवर संशाेधन करणे, साेयाबीनचे जीएम बियाणे (ज्यात सूर्यफुलातील जनुके – genes समाविष्ट केली आहेत) भारतीय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतजमिनीचा सेंद्रीय कर्ब (Organic Carbon) व पीएच (potential of hydrogen) तसेच सिंचन व फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा पीएच स्थिर ठेवण्यासाठी याेग्य उपाययाेजना करणे, देशांतर्गत बाजारात साेयाबीनचे दर कुठल्याही परिस्थितीत काेसळणार नाही किंवा दबावात येणार नाही अशी धाेरणे न राबविणे किंवा निर्णय न घेणे (खाद्यतेल व तेलबिया आयात, आयात शुल्क, निर्यातबंदी) यासह इतर मूलभूत उपाययाेजना करणे अत्यावश्यक आहे. खाद्यतेल आणि तेलबियांच्या उत्पादनात आत्मनिर्भर हाेण्यासाठी उद्याेजक व ग्राहकांचे आर्थिक हित जाेपासणाऱ्या केंद्र सरकारने साेयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक जाेपासण्यावर विचार करायला हवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!