Rural Diwali : ऐंशीच्या दशकातल्या ग्रामीण दिवाळीची दरवळ…!
1 min read
Rural Diwali : दिवाळी (Diwali) म्हटलं की, आजच्या काळात लक्षात येतात – मॉलमधली गर्दी, ऑनलाइन सेल, सजावट आणि ब्रँडेड गिफ्ट्स. पण एकेकाळी दिवाळी ही फक्त सण नव्हती – ती होती गावपणाची, नात्यांची आणि साधेपणातल्या आनंदाची पर्वणी. तेव्हा ‘मार्केट’ हा शब्दसुद्धा आपल्यापर्यंत फारसा पोहोचलेलाच नव्हता. दिवाळी गावातली असायची, गावकऱ्यांसोबत जगली जायची आणि खरं सांगायचं तर प्रत्येक घरात तिचं वेगळं अस्तित्व जाणवत राहायचं.
दिवाळीची सुरुवातच होत असे वसुबारशेपासून. त्या दिवशी आम्ही मुलं गवताच्या काड्या हातात घेऊन, संध्याकाळी गायी-म्हशी ओवाळायला बाहेर पडायचो. तेव्हा आम्ही गावभर फिरत मोठ्या आवाजात गाणं म्हणायचो –
‘दिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी,
गाई-म्हशी कुणाच्या – लक्ष्मणाच्या,
लक्ष्मण कुणाचा – आई-बापाचा,
दे माई खोबऱ्याची वाटी,
वाघाच्या पाठीत घालीन काठी!’
या गाण्याच्या प्रत्येक ओळीत बालसुलभ आनंद होता, कौतुक होतं आणि त्या साध्या गावकुसातल्या दिवाळीचा सुगंध दडलेला होता. गायी-म्हशींची पूजा, ओवाळणी आणि मुलांच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू – दिवाळीचा आरंभच मंगलमय व्हायचा.
त्या काळी दिवाळीच्या तयारीला कोणतं ‘मार्केट’ लागत नव्हतं. ज्वारीची रास झालेली असायची; ती बाजारात विकून थोडी पैशांची तजवीज व्हायची. फराळासाठी लागणाऱ्या वस्तू फारशा विकत घ्यायच्या नव्हत्या – फक्त साखर, रवा, मैदा एवढंच काहीसं. तेल घरचं असायचं – शेंगदाणे, करडी किंवा सूर्यफूल दाबून गाळून आणलेलं. हरभरे घरात असायचेच, ते दळून बेसन तयार करायचं. गहू पण रब्बीच्या साठ्यातला असायचा. घरातल्या बायकांच्या हाताला चव आणि वेळ दोन्ही असायचे.
सण जवळ आला की, घराघरात तयारी सुरू व्हायची. शिकेकाईच्या शेंगा आणून त्याचा शॅंपू तयार केला जायचा, कुंभारवाड्यातून पणत्या घरी यायच्या, मेहेंदीच्या झाडाचा पाला वाळवून त्याची पूड बनवायची. उन्हाळ्यातच कुरडया, पापड तयार केलेले असायचे. कोणत्याही वस्तूसाठी शहरात धावपळ नव्हती – सर्व काही गावातच, घरच्या श्रमातून, घरच्याच हातांनी तयार व्हायचं. त्या वेळी गावात वीज नव्हती. तरी आकाशकंदील नव्हे, पणत्या आणि कंदिलाच्या मंद उजेडात दिवाळीची रात्र जणू सोन्याने उजळल्यासारखी भासत असे. प्रत्येक घराच्या ओट्यावर दिव्यांची रांग लागलेली असायची. फुलांच्या सुगंधी माळा, ओवाळणीच्या थाळीतून उठणारा धूर आणि पाठीमागून वाजणाऱ्या किणकिणत्या टिकल्या – या सर्वांत खरी दिवाळी दडलेली होती.
पहाटे उटणं लावून आणि तेलाने अंग चोळून पहिली अंघोळ घेण्याचा दिवस म्हणजे खास प्रसंगच असायचा. घराघरात वतलं (ज्यात जाळन टाकून पाणी गरम करायचं भांडं) पेटवलेलं असायचं, अंगणात अभ्यंगस्नानासाठी उठणं ठेवलेलं असायचं. माहेरवासिनी मुली रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत, गाणी गात बसायच्या, आणि पहाटेच उठून भाऊ-चुलत्यांच्या अंघोळीची तयारी करत असायच्या. त्या वेळेचं हसू, गोंगाट आणि नात्यांचं ऊबदारपण आजही मनात घर करून आहे.
भाची-भाच्यांचा उत्साह तर वेगळाच. माळवदावर (माडीवर) पणत्या लावून, फुलबाजे, लवंगी फटाके, कावळे – हेच आमचं फटाक्यांचं विश्व! तेही माफक प्रमाणात, कारण ‘मामा किती देणार?’ याची जाणीव असायचीच! दिवाळीच्या पहिल्या दिवशी फराळावर ताव मारून, गावभर टिकल्या वाजवत फिरणं – हा आनंद काही पैशात विकत घेता येत नाही. तीन-चार दिवस असा उत्साह, गोडधोड, खेळ आणि एकत्र वेळ घालवून जेव्हा दिवाळी संपायची, तेव्हा मामा बहिणीला आणि भाच्यांना नवे कपडे देऊन, गाडीत बसवून निरोप द्यायचा. बस सुटताना डोळ्यांतून पाणी आणि मनात पुढच्या दिवाळीची आस असायची. ती आठवडाभराची धमाल पुढील काही महिन्यांसाठी उत्साह टिकवून ठेवायची.
आजही दिवाळी येते. आता प्रत्येक गोष्ट रेडीमेड मिळते, प्रत्येक तयारी शॉपिंगवर अवलंबून असते. एकेकाळी जी दिवाळी गावाच्या कुशीत रुजलेली होती, ती आता मॉलच्या गेटसमोर उभी आहे. दिवाळीची रोषणाई वाढली असेल, पण त्या जुन्या दिव्यांच्या प्रकाशातलं ऊबदारपण मात्र हरवलंय. त्या काळची दिवाळी – जिथे गाई-म्हशी ओवाळल्या जायच्या, गाणी गात गावभर फिरायचं, आणि फराळाच्या सुगंधात नात्यांचं ऊबदार नातं जपलं जायचं – ती दिवाळी मनात आजही दाटून येते…!