krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Orange crop : संत्रा पिकाची पाने पिवळी पडण्याची कारणे व उपाययोजना

1 min read

Orange crop : शेतकरी बंधूंनो, संत्रा बागेत पाने पिवळी पडण्यासंदर्भात शेतक विचारणा करतात. आज आपण संत्रा (Orange) बागेतील पाने (leaves) पिवळी पडण्याची संभाव्य कारणे व त्यावरील व्यवस्थापन (Management) याविषयी थोडे जाणून घेऊया. संत्रा बागेत पाने पिवळी पडण्याची संभाव्य कारणे खालीलप्रमाणे विशद करता येतील.

🌀 बऱ्याच संत्रा बागेत कोवळ्या तसेच पक्व हिरव्या फांद्या शेंड्यापासून खाली वाळत येतात. त्यामुळे फांद्यावरील पाने पिवळी पडतात व गळतात. फांदीचा शेंड्यापासून खाली वाळत आलेला भाग पांढुरका दिसतो व त्यावर सूक्ष्म काळ्या गोल पुटकुळ्या दिसतात. अशी लक्षणे दिसल्यास ती शेंडे मर या रोगाची असू शकतात.
🌀 बऱ्याच वेळा संत्राच्या झाडाचा तजेलपणा नाहीसा होतो व काही बागांमध्ये संत्र्याच्या झाडाची एकच फांदी किंवा झाडाचा एकच भाग पिवळा पडलेला दिसतो. अशा झाडावर फायटोप्थोरा बुरशीचा जमिनीतून प्रादुर्भाव झाला का याचे निदान करून घेणे गरजेचे असते.
🌀 बऱ्याच वेळा जुन्या संत्रा बागेत त्याच जागेवर जमिनीचे निर्जंतुकीकरण न करता लागवड केल्यास व विशेषता झाडाचा कलम युतीचा भाग जमिनीजवळ किंवा जमिनीत गाडला गेल्यास अशा संत्रा बागेत पाय कुज व मूळकूज या रोगाचा प्रादुर्भाव होतो. झाडांची मुळे तंतुमय मुळ्याकडून मुख्य मुळ्याकडे कुजण्यास सुरुवात होते. मुळाची साल कुजून पुढे मुळाचा आतील भागही इतर बुरशीच्या प्रादुर्भावामुळे कुजतो. अशा वेळेस रोगग्रस्त झाडांची पाने प्रथम मलूल होऊन मुख्य शिरा पिवळ्या पडतात व पुढे पूर्ण पाने पिवळी पडून गळून पडतात. अशा रीतीने पूर्ण झाड पर्णहीन होऊन वाळते. अशा प्रकारची लक्षणे पायकुज मुळकुज या रोगात आढळून येतात.
🌀 बऱ्याच संत्रा बागेमध्ये जमिनीत चुनखडीचे प्रमाण 10 टक्क्यांच्या वर असेल तर अशा जमिनीत संत्र्याचे झाडास स्फुरद ,पोट्याश, झिंक व मॅग्नेशियम या अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते आणि त्यामुळे अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडू शकतात.
🌀 बऱ्याच वेळा ज्या बागेत मृग बहार काही कारणास्तव फुटला नाही, अशा बागेत पुन्हा एकदा अंबिया बहाराकरिता ताण दिल्यास ताणाचे अन्नद्रव्यांचे योग्य नियोजन न झाल्यामुळे पाने पिवळी पडू शकतात व पानगळ सुद्धा वाढण्याची शक्यता असते.

संत्र्याची पाने पिवळे पडण्याचे नेमके कारण हेरून सर्वसाधारणपणे खालील उपाययोजना अमलात आणू शकता.
🌀 पाने पिवळ्या पडलेल्या संत्रा बागेला अतिरिक्त तान देण्याचे टाळावे. 🌀 माती परीक्षणाच्या आधारावर झाडाचे वय लक्षात घेऊन शिफारशीप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. सर्वसाधारणपणे 10 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या झाडासाठी एक किलो अमोनियम सल्फेट, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट व 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश याप्रमाणे झाडाच्या परिघात द्यावे. झाडाचे वय 10 वर्षापेक्षा कमी असल्यास खताची मात्रा अर्धी करावी.
🌀 माती परीक्षणाच्या आधारावर सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता लक्षात घेऊन झिंक सल्फेट 200 ग्रॅम, लोह सल्फेट 200 ग्रॅम व बोरॉन 100 ग्रॅम प्रति झाड शेणखतात मिसळून जमीन द्यावे.
🌀 आवश्यकतेनुसार झिंक, लोह व बोरॉन हे अन्नद्रव्य असणारे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त फवारणीचे चिलेटेड सुक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन माती परीक्षणाच्या आधारावर अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास फवारणी करावी.
🌀 संत्रा झाडावर शेंडे मर या रोगाची वर निर्देशित लक्षणे आढळून आल्यास झाडावरील रोगग्रस्त व वाळलेल्या फांद्या किंवा सल पावसाळ्यापूर्वी काढून जाव्यात व त्यानंतर पानावरील ठिपके या रोगाकरिता कॉपरऑक्‍सिक्‍लोराईड 25 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आवश्यकतेनुसार 15 ते 20 दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
🌀 संत्रा वरील फायटोप्थोरा म्हणजे पायकुज, मूळकूज, डिंक्या या रोगाच्या प्रतिबंधासाठी ठिबक सिंचन किंवा डबल रिंग पद्धतीद्वारे ओलिताचे व्यवस्थापन करावे.
🌀 रोगग्रस्त झाडाच्या सालीतून डिंक उघडताना दिसल्यास रोगग्रस्त झाडाची साल धारदार व निर्जंतुक केलेल्या पटाशीने किंवा चाकूने काढून रोगट भाग एक टक्का पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने निर्जंतुक करून घ्यावा व त्यावर बोर्ड मलम (Bordo paste ) 1:1:10 या प्रमाणात तयार करून लावावा.
🌀 झाडाच्या परिघात Cymoxnil 8 percent अधिक Mancozeb 64 percent हे मिश्र बुरशीनाशक 25 ग्रॅम अधिक 50 मिली जवस तेल अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन प्रत्येक झाडाच्या परिघात मिसळावे.
🌀 वर्षातून दोन वेळा म्हणजे पावसाळ्यापूर्वी मे महिन्यात व पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महिन्यात 1:1:10 या प्रमाणात एक टक्का बोर्ड मलम तयार करून झाडाच्या बुंध्यावर जमिनीपासून एक मीटर अंतरापर्यंत लावावा.
🌀 डिंक्या किंवा पायकुज किंवा मुळकूज यांची लक्षणे दिसून येताच ट्रायकोडर्मा हरजियानम अधिक ट्रायकोडर्मा ऍस्पिरिलिम अधिक सुडोमोनास फ्लोरन्स 100 ग्रॅम प्रत्येकी प्रति झाड एक किलो शेणखतात मिसळून झाडाचे परीघात जमिनीत मिसळून द्यावे.
🌀 बहराचे व्यवस्थापन शास्त्रोक्त शिफारशीप्रमाणे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावे.
🌀 वर निर्देशित बाबीचा गरजेनुसार वापर करा व सर्व रसायने लेबल क्‍लेम शिफारसीनुसार वापरा वापरण्यापूर्वी गरजेनुसार तज्ज्ञांचा सल्ला घ्या व आपल्या संत्रा बागेची योग्य शास्त्रोक्त शिफारशीत पद्धतीप्रमाणे नियोजन व व्यवस्थापन करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!