Citrus Psylla pest management : लिंबुवर्गीय फळांमधील ग्रीनिंग रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन
1 min readCitrus Psylla pest management : लिंबुवर्गीय (Citrus)फळ हे भारतातील तिसरे महत्त्वाचे फळपिक आहे असून, त्यांच्या विविध वाणांची मध्य भारतात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. सिट्रस ग्रीनिंग (Citrus Psylla) हा लिंबुवर्गीय फळ झाडांमधील एक महत्त्वाचा रोग आहे, जो भारतातील अनेक राज्यांमध्ये लिंबूवर्गीय फळांच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम करतो. लिंबुवर्गीय फळ झाडांमधील रोगांपैकी सिट्रस ग्रीनिंग रोग हा सर्वात विनाशकारी आणि घातक मानला जातो.
हा रोग जवळजवळ सर्व जातींच्या लिंबुवर्गीय फळझाडांना संक्रमित करतो. असा अंदाज आहे की, जागतिक स्तरावर या रोगामुळे 60 दशलक्षांहून अधिक लिंबुवर्गीय झाडे या राेगामुळे नष्ट झाली आहेत. सिट्रस ग्रीनिंग रोगाचा प्रसार आशियाई, आफ्रिकी, दक्षिण आणि उत्तर अमेरिकन या 40 भिन्न देशांमध्ये झाला आहे. मागील दशकात हा राेग प्रथम नाेंदविण्यात आला. या रोगामुळे लिंबुवर्गीय फळपिके कमजोर होऊन फांदीमर व ऱ्हास होते. लिंबुवर्गीय झाडांमध्ये जीवाणूचा शिरकाव झाल्यानंतर झाड जिवंत असेपर्यंत जीवाणू त्यात सक्रीय राहतात. या गंभीर रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्यातरी कोणतेही रसायन उपलब्ध नाही.
🔆 राेगाची लक्षणे
या रोगाची लक्षणे बहुधा परिवर्तनशील असतात आणि बहुतांश भागांसाठी विशिष्ट नसतात. सीट्रस ग्रीनिंग रोगग्रस्त झाडांवर खनिजांच्या व अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे (जस्त किंवा लोहाची कमतरता) मिश्रीत असतात. पिवळ्या शेंड्याचा उदय हे सीट्रस ग्रिनींग होण्याच्या प्रमुख लक्षणांपैकी एक आहे. म्हणून या रोगाचे दुसरे नाव हाॅगलाॅन्गबिंग (एचएलबी) असे सुद्धा आहे. पानांवर डाग पडणे, हे विषेशतः मोसंबी फळांवर या रोगाचे सर्वोत्तम सुचक लक्षण आहे. या रोगाची तीव्रता अधिक झाल्यास पानांचा काही भाग हिरवा राहून बाकी भाग पिवळा पडतो व फांद्या मृत झाल्यामुळे झाडे विरळ दिसतात. रोगग्रस्त फळे आकाराने लहान, चवीला कडू व निम्नदर्जाची असतात, अशी फळे बीज विरहित असतात.
🔆 राेगाची कारणे आणि प्रसार
ग्रीनींग हा रोग कॅन्डीडॅट्स लिबेरीबॅक्टर एशियाटिकस या असंवर्धित जीवाणुमुळे उद्भवतो. हा जीवाणू झाडातील अन्नपुरवठा करणाऱ्या ऊतींमध्ये राहतो. नवीन कलम तयार करताना हा रोग संसर्ग झालेल्या बडवुडपासून (कांडीपासून) पसरतो. बगीच्यामध्ये असणाऱ्या सिट्रस सायला (डायफोरिना सिट्री) या किडीमुळे या रोगाचा प्रसार होण्यास मदत होते. त्यामुळे फळांचे उत्पादन आणि गुणवत्ता कमी होते. रोगमुक्त लागवड सामग्रीची खात्री करणे, सिट्रस सायलाचे नियंत्रण, पोषक घटकांचा पुरेपुर वापर आणि योग्य पाणी व्यवस्थापन हेच या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आजच्या काळात उपलब्ध असलेले एकमेव उपाय आहेत.
🔆 राेगाचे व्यवस्थापन
🌀 रोगमुक्त रोपवाटिकेत रोपे व कलमे तयार करणे व कलम कांडीचे (बडवुड) रोगमुक्ततेसाठी प्रमाणीकरण राबवणे. मातृवृक्षांची निवड करताना रोगांचे निदान करून रोगमुक्त मातृवृक्षापासूनच कलम कांडी निवडावी.
🌀 संक्रमित बडवुड किंवा रोपवाटिकेमधून रोपांची विक्री आणि वापर मर्यादित करण्यासाठी नियामक (विलगीकरण) उपाय मजबूत केले पाहिजेत. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी नाेंदणीकृत रोगमुक्त प्रमाणीकरण योजनेद्वारे रोपवाटिकांवर कठोर नियंत्रण आवश्यक आहे.
🌀 एकात्मिक अनुप्रयोग: टेट्रासाइक्लीन हाईड्रोक्लोराईड 600 पीपीएम (6 ग्रॅम/लिटर पाणी) अधिक झिंक सल्फेट अधिक फेरस सल्फेट (200 ग्रॅम प्रत्येकी) पाण्यात घेवून हिवाळ्यात (डिसेंबर ते फेब्रुवारी) महिन्यात 45 दिवसांच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. झिंक सल्फेट व फेरस सल्फेट झाडाच्या आळ्यामध्ये टाकावे.
🌀 रोगाचा प्रसार एशियन सिट्रस सायला (डायफोरिना सिट्री) या किडीद्वारे होत असल्यामुळे किडीच्या सक्रीय काळात (नवतीचा हंगाम) थायमेथोक्झाम (25 टक्के डब्ल्यूजी) 0.3 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड (17.8 टक्के एसएल) 0.5 मिली. प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून 15 दिवसाच्या अंतराने आळीपाळीने फवारणी करून नियंत्रण करावे.
🌀 रोगाची लक्षणे दिसणाऱ्या फांद्याची छाटणी केल्याने जीवाणूंचा संचय होणे टाळता येते. या जीवाणूची हालचाल संसर्ग झालेल्या झाडांमध्ये फार संथ गतीने होते. त्यामुळे ज्या फांद्यामध्ये लक्षणे दिसतात, त्याच फांद्या कापाव्यात. जास्त प्रमाणात संसर्ग झालेल्या म्हणजे 50 टटक्यांपेक्षा जास्त संसर्ग झालेल्या झाडांला मुळासकट उपटुन जाळून टाकावे. सायला किडींची संख्या कमी असल्यावर झाडाची छाटणी करून रोगग्रस्त फांद्या नष्ट कराव्या. अन्यथा या रोगाचा प्रसार प्रादुर्भावीत झाडे व सायला किड अशा दोन्ही कारणामुळे जलद गतीने होईल.
🌀 प्रत्येक छाटणी नंतर, छाटणीची साधने, सिकेटर्स 1-2 टक्के सोडियम हायपोक्लोराईड द्रावणाने निर्जंतुक करावेत.
🌀 गोंडलिंबाचे झाड हे सीट्रस सायला किडीचे पर्यायी खाद्य (होस्ट) आहे. त्यामुळे बगीचाच्या परिसरात किंवा आजूबाजूला गोडलिंबाचे झाडे लावू नये.
🌀 झाडांच्या आरोग्यासाठी आणि फळबागांचे आयुष्य वाढवण्यासा शिफारस केलेल्या प्रमुख तसेच सूक्ष्म पोषक घटकांची योग्य मात्रा द्याव्यात.
(🌀 नोंद :- वरील कीटकनाशकीय, बुरशीनाशकीय, कोळीनाशकीय लेबल क्लेम शिफारसीत नाही, संशाेधनावर आधारित आहे. काही रसायने व संजीवके लेबल क्लेममध्ये नाहीत, याची शेतकऱ्यांनी नाेंद घ्यावी.)