Orange fruit dropping : संत्रा, माेसंबी अंबिया बहार फळगळ राेखण्यासाठी या उपाययाेजना करा!
1 min readOrange fruit dropping : सद्यस्थितीत संत्रा (Orange) व माेसंबीच्या अंबिया बहाराची फळे विकसनशील अवस्थेत आहेत. साधारणतः झाडांची निरोगी स्थिती, झाडांमधील संजीविकांचा फळांच्या शेवटच्या टोकापर्यंत होणारा पुरवठा, कर्ब-नत्र यांचे संतुलन, संतुलित पोषण यामुळे फळे झाडावर परिपक्व होईपर्यंत टिकण्यास मदत होते. मात्र, किमान आणि कमाल तापमानात फरक झाल्यास, वातावरणात अधिक आर्द्रता निर्माण झाल्यास, कर्ब-नत्र यांचे असंतुलन निर्माण झाल्यास, अपुरे पोषण, पाण्याचा अभाव तसेच रोग व कीड या कारणांमुळे फळगळ (Fruit dropping) संभवते. त्यामुळे फळगळीचे लक्षणे (Symptoms) जाणून त्याचप्रमाणे उपाययोजना करणे गरजेचे आहे.
🔘 वनस्पतीशास्त्रीय आंतरिक फळगळ
फळांच्या योग्य वाढीसाठी झाडास पुरेशी पालवी असणे गरजेचे आहे. पुरेशी पालवी नसल्यास मर्यादित स्वरुपात अन्नसाठा तयार होतो. अन्नद्रव साठले नाही तर झाडांवरील फळे पोसल्या जात नाहीत. त्यामुळे पालवीनुसार फळे झाडास ठेवावीत. अपुरे पोषण आणि संजीविकांचा असमतोलपणा निर्माण झाल्यास पेशीक्षय होऊन फळगळ होते. पाण्याचा अभाव झाल्यास फळांना पाणी उपलब्ध होत नाही. उलट फळांमधून पानांकडे पाणी वाहून जाते. त्यामुळे फळे पिवळी होऊन पडून गळतात. या गळमध्ये संत्रा/मोसंबीचा पिवळेपणा हा देठापासून सुरू होतो व खालपर्यंत पसरून फळगळ होते. बरेचदा देठाजवळ पिवळ्या छटा दिसतात.
🔘 बुरशीजन्य फळगळ
संत्रा फळझाडांमध्ये बुरशीजन्य फळगळ प्रामुख्याने कोलेटोट्रीकम, डिप्लोडिआ, फायटोप्थोरा व ऑलटरनेरिया या बुरशीमुळे होते. या बुरशींचे संक्रमण फळांच्या देठास होऊन फळांची साल व देठ यांच्या जोडावर होऊन काळपट तपकिरी डाग पडतात व तो भाग कुजतो आणि फळांची गळ होते. झाडांवर जुन्या वाळलेल्या फांद्या अधिक असतील तर बुरशींचे बीजफळे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव करतात. परिणामी, आर्थिक नुकसानकारक फळगळ आढळून येते.
🔆 देठ सुकणे किंवा कोलेटोट्रीकम स्टेम ॲण्ड राॅट
कोलेटोट्रीकम बुरशीमुळे संत्रा फळाच्या देठाजवळ काळी रिंग तयार होऊन तो भाग काळा पडतो व भाग नंतर वाढत जातो व संपूर्ण फळ सडते. कोवळ्या फांद्यावरील पाने सुकणे व ती वाळणे ही या रोगाची सुरुवातीची लक्षणे आहेत. बरेचदा उशिरा झालेल्या संसर्गामुळे रोगग्रस्त फळे संकुचित होतात, काळे पडतात, वजनाने हलके होऊन कडक होतात आणि दीर्घ काळापर्यंत देठांना लटकत राहतात. हा रोग मे महिन्याच्या शेवटी ते जून महिन्यात पहिला पाऊस पडल्यानंतर दिसून येतो.
🔆 फायटोप्थोरा फळांवरील तपकिरी राॅट किंवा ब्राउन राॅट
ब्राउन राॅट रोग पावसाची रिमझिम, अपुरा सूर्यप्रकाश, थंड हवा, अधिक आर्द्रता, कमी तापमानात फळांवर उद्भवतो. जमिनीलगतची हिरवी असलेली फळे यावर तपकिरी/करड्या डागांची सुरुवात होते. फळे एका बाजूने करपण्यास सुरुवात होते. फळांच्या हिरव्या कातडीस (साल) संक्रमण होऊन पूर्ण हे तपकिरी काळ्या रंगामध्ये परावर्तीत होते व फळे सडून गळतात. फळे खाली पडल्यानंतर फळांच्या पृष्ठभागावर पांढऱ्या बुरशीची वाढ दिसून येते.
🔘 व्यवस्थापन
🌀 वनस्पतीशास्त्रीय आंतरिक फळगळ व्यवस्थापनाकरिता खालील उपाययोजना कराव्यात :-
🔆 वनस्पतीशास्त्रीय आंतरिक फळगळ नियंत्रणाकरिता एनएए 1 ग्रॅम (10 पीपीएम) किंवा 2-4डी, 1.5 ग्रॅम (15 पीपीएम) किंवा जिब्रेलिक ॲसिड, 1.5 ग्रॅम (15 पीपीएम) अधिक युरिया (1 किलो) अधिक 100 लिटर पाण्यामध्ये मिसळून यांची फवारणी करावी. मिश्रद्रावणाची फवारणी करताना 15 दिवसांच्या अंतराने दोन फवारे ज्यामध्ये आलटून पालटून संजीवके एनएए किंवा 2-4 डी किंवा जिब्रेलिक ॲसिड 1.5 ग्रॅम याचा समावेश करावा.
🔆 झाडांच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रवे व्यवस्थापन करताना अंबिया बहारातील फळे असणाऱ्या झाडांना जुलै व सप्टेंबर महिन्यात 90 ग्रॅम नत्र अधिक 75 ग्रॅम पालाक्ष प्रति झाड जमिनीद्वारे द्यावे.
🔆 संत्रा/मोसंबी/लिंबू फळवाढीकरिता जिब्रेलिक ॲसिड 1.5 ग्रॅम (15 पीपीएम) अधिक पोटॅशीयम नायट्रेट (13:00:45) 1 किलो अधिक 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
🔆 सूक्ष्म अन्नद्रवे झिंक सल्फेट 5 ग्रॅम, फेरस सल्फेट 1 ग्रॅम व बोराॅन 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन अंबिया फळांकरिता जुलै-ऑगस्ट महिन्यात तसेच मृगाच्या फळाकरिता ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये फवारणी करावी.
🌀 बुरशीजन्य रोगापासून होणाऱ्या फळगळ व्यवस्थापनाकरीता खालील उपाययोजना कराव्यात :-
🔆 सर्वप्रथम खाली पडलेल्या पानांची व फळांची विल्हेवाट लावावी. ती शेतात तशीच राहू देऊ नये. अन्यथा या रोगाची तीव्रता वाढण्यास मदत होऊन संक्रमण जलद गतीने होते. वाफा स्वच्छ ठेवावा.
🔆 बागेच्या उताराच्या बाजूने शेतातील पाणी बाहेर काढावे. कारण जिकडे पाणी साठून राहते, त्या भागात फायटोप्थोरा बुरशीची लागण अधिक होते.
🔆 देठ सुखी किंवा कोलेटोट्रीकम स्टेम ॲण्ड राॅट मुळे होणाऱ्या फळगळीसाठी बोर्डेक्स 0.6 टक्के मिश्रणाची किंवा काॅपर ऑक्सिक्लोराईड 50 डब्लूपी 2.5 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम 50 डब्ल्यूपी 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.
🔆 ब्राउन राॅट किंवा फायटोप्थोरा फळावरील तपकिरी कुजमुळे होणाऱ्या फळगळीसाठी संपूर्ण झाडावर फोसिटिल एएल 2.5 ग्रॅम किंवा काॅपर ऑक्सिक्लोराईड 50 डब्ल्यूपी 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करवी.
(🌀 नोंद: वरील कीटकनाशकीय, बुरशीनाशकीय, कोळीनाशकीय लेबल क्लेम शिफारसीत नाही. संशाेधनावर आधारित आहे. तसेच काही रसायने व संजीवके लेबल क्लेममध्ये नाहीत, याची शेतकऱ्यांनी नाेंद घ्यावी.)