Crop Insurance Formula : पीक विमा याेजनेचा 80:110:150 टक्के फॉर्म्युला काय आहे?
1 min readया फॉर्म्युल्याप्रमाणे ज्यावर्षी विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान होईल, त्यावर्षी शेतकऱ्यांना सुमारे 150 टक्के नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. त्यातील 110 टक्के रक्कम पीक विमा कंपन्या देणार आहेत तर उरलेले 40 टक्के रक्कम सरकारकडून देण्यात येणार आहे. ज्यावर्षी शेतकऱ्यांचे अजिबात नुकसान होणार नाही, त्यावर्षी शेतकऱ्यांनी भरलेल्या प्रीमियममधील 80 टक्के रक्कम पीक विमा कंपन्यानी सरकारला परत करायची आणि उरलेले 20 टक्के रक्कम पीक विमा कंपन्या त्यांच्या व्यवस्थापनापोटी स्वत:कडे ठेऊन घेईल, असा हा पंतप्रधान पीकविमा योजनेचा फॉर्म्युला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना, शेतकरी संघटना महिला आघाडी अहिल्यानगर यांनी खरीप व रब्बी हंगाम 2023-24 चे पीक विमा नुकसानभरपाईसाठी अहमदनगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री सुधाकर बोराळे यांनी तत्काळ दखल घेत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे राज्य अधिकारी श्री विनायक दीक्षित यांच्या सोबत 20 जून रोजी अहमदनगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली. आपल्या बॅंक खात्यात 20 जुलैपर्यंत पैसे जमा करण्याचे लेखी आश्वासन श्री विनायक दीक्षित शेतकऱ्यांच्रूा प्रतिनिधींना दिले. त्यानुसार पीक विमा नुकसानभरपाई पोटी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना 110 टक्के नुकसान भरपाई मिळणार आहे. उरलेली 40 टक्के नुकसानभरपाई देण्यात यावी, यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांना सरकारशी भांडून आपल्या हक्काचे पीक विमा नुकसानभरपाईचे पैसे मिळवावे लागणार आहेत.
आपल्या हक्काचा 110 टक्के पीकविमा नुकसानभरपाई सुमारे 1,129 कोटी रुपये, 11 लाख 90 हजार शेतकऱ्यांना ओरिएंटल विमा कंपनीकडून मिळविण्यासाठी जिल्ह्यातील पीकविमाधारक शेतकरी मित्रांनी ज्याप्रमाणे साथ दिली, तशीच साथ 150 टक्के नुकसाभरपाईचे फॉर्म्युल्याप्रमाणे उरलेले 40 टक्के रक्कम सरकारकडून भांडून मिळविण्यासाठी द्यावी, अशी नम्र विनंती आहे.
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे राज्य अधिकारी श्री विनायक दीक्षित यांना फोनवर अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसानभरपाई कधीपर्यंत देण्यात येणार आहे, अशी विचारणा केली. तुम्ही 20 जुलैपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. पण अजूनही पैसे जमा झालेले नाहीत, याची माहिती त्यांना देण्यात आली. त्याचबरोबर त्यांना 1 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील शेतकरी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या शिवाजीनगर, पुणे येथील मुख्य कार्यालयाला टाळे ठोकण्याचे आंदोलन करण्याचा इशाराही दिला. कारण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संयम आता संपत आला आहे. जिल्ह्यातील पीक विमाधारक शेतकरी मित्रांनो, आपली आपल्या हक्काचे पैसे घेण्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे मुख्य कार्यालय शिवाजीनगर, पुणे येथे जाण्याची तयारी आहे का?