krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Rain forecast : महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता

1 min read
Rain forecast : 900 मीटर उंचीचा मान्सूनचा मुख्य आस सरासरी जागेवर असल्यामुळे रविवार (दि. 14 जुलै)पासून पुढील चार दिवस म्हणजे बुधवार (दि. 17 जुलै)पर्यंत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची (Rain) शक्यता निर्माण झाली आहे. हा आस दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता असून, पावसासाठी अनुकूलता वाढेल.

Transparent umbrella under heavy rain against water drops splash background. Rainy weather concept.

🔆 ऑफ शोर ट्रफची ताकद व पाऊस
अरबी समुद्रातील ऑफ शोर ट्रफ (Offshore Trough) मजबूत आहे. पण त्याची ऊर्जा मुंबईसह कोकणात व सह्याद्रीच्या घाट माथ्यावरील पावसासाठीच खर्ची होत आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात अजूनही धिम्या गतीने का होईना, पण पाण्याच्या आवकेत सातत्य जाणवत आहे.

🔆 वर्षच्छायेच्या प्रदेश व पाऊस
नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसाठी जोरदार पाऊस कोसळण्यास बळकटपणे ऑफ शोर ट्रफ उभा आहे. उत्तर गुजरात व बंगालच्या उपसागरात वाऱ्याची स्थिती आहे. वर्षच्छायेच्या वरील जिल्ह्यात 14 ते 17 जुलै दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. खान्देश व नाशिक जिल्ह्यात तर आठवडाभर म्हणजे शनिवार (दि. 20 जुलै)पर्यंत मध्यम पावसाची शक्यता कायम आहे.

🔆 इतर राज्यातील पावसाचा परिणाम
सध्या आसाम (पूर्वोत्तर)कडील सात राज्यात व पूर्वेकडील (उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड) राज्यात कमी होणारा पावसाचा जोर, परंतु दक्षिणेकडील (केरळ, कर्नाटक, तामिळनाडू) राज्यात वाढणारा अधिक पावसाचा जोर अशा एकमेकांशी निगडित वातावरणीय प्रणाल्या व तेथील पावसाच्या तीव्रता पाहता महाराष्ट्रातही विशेषतः विदर्भातील 11 व सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव व लातूर अशा एकूण 16 जिल्ह्यांत पुढील पाच दिवस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

🔆 मान्सून सक्रियता व पाऊस
जेव्हा पूर्ण ताकदीने मान्सून सक्रिय होतो, तेव्हा दिवसाच्या 24 तासात केव्हाही म्हणजे मध्यरात्री, पहाटे अथवा दिवसभर किंवा रात्रभर अशा कोणत्याही प्रहरात समुद्र सपाटीपासून दोन किमी उंचीपर्यंतच्या स्ट्रॅटस (Stratus) व स्ट्रॅटोक्युमुलस (Stratocumulus) प्रकारच्या ढगातून पाऊस सलग पडत असतो.

🔆 पावसाची सध्यावस्था
मान्सूनच्या आगमनापासून महाराष्ट्रात मान्सून (Monsoon) सक्रिय होतो न होतो तोच पुन्हा कमकुवतेत जातो. अशा पुन्हा पुन्हा सक्रिय व कमकुवतच्या हेलकाव्यातून कधी येथे तर कधी तेथे अशा मर्यादित एक – दोन चौरस किमी परिसरात सायंकाळच्या 4 ते रात्री 8 प्रहरादरम्यान उष्णता संवहनी (Convective) प्रक्रियेतून तयार झालेल्या क्यूमुलोनिंबस प्रकारच्या ढगातून विजांच्या गडगडाटासह एखाद्या दिवशी एकाकी तीव्र पाऊस होताना दिसत आहे. त्यामुळे पावसाच्या अपेक्षित समान वितरणाला धक्का पोहोचून पावसाळी दिवस कमी होत आहे. पावसाचे आकडे दिसतात, पण पिकांसाठी पाऊस नाही, असे शेतकरी सांगत आहेत. हीच गेल्या महिनाभरातील महाराष्ट्रातील मान्सून च्या पावसाची शोकांतिका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!