krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Possibility of rain : गुरुपौर्णिमेपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

1 min read

Possibility of rain : गेली चार दिवस (14 ते 17 जुलै) वर्षच्छायेचा प्रदेशातील सहा जिल्हे (धुळे, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली व कोल्हापूर) वगळता कोकण, सह्याद्रीच्या घाटमाथा सह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली. बुधवार (दि. 17 जुलै)पासून पुढील पाच दिवस म्हणजे रविवार (दि. 21 जुलै) गुरुपौर्णिमेपर्यंत मुंबईसह कोकण व विदर्भातील 18 जिल्ह्यात जोरदार तर संपूर्ण मराठवाडा, खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता (Possibility of rain) जाणवते.

🔆 पावसासाठी पूरक प्रणाल्या प्रणाल्या
🔅 दीड किमी उंचीचा मान्सून ट्रफ (monsoon trough) दक्षिणेकडे झुकला.
🔅 अरबी समुद्रातील ऑफ शोर ट्रफ (Offshore Trough).
🔅 900 मीटरवर सौराष्ट्र व कच्छवर चक्रीय वाऱ्याची स्थिती.
🔅 3,100 मीटरच्या वर साडेचार किमी जाडीतील नाशिक ते वाशिम, गडचिरोली वरून जाणारा शिअर झोन (Shear zone
).
🔅 शुक्रवार (दि. 19 जुलै) ला बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार होणे.

🔆 जोरदार व सलग पावसाचा अभाव का?
मान्सूनच्या सक्रियता व कमकुवतताचे हेलकावे अजूनही संपलेले नाहीत. त्यामुळे मान्सूनच्या बळकट सक्रियेतून व्यापक परिक्षेत्रावर अधिक काळ सतत पडणारा झडीच्या पाऊस कोकण व विदर्भ, वगळता महाराष्ट्रात अजूनही पडलेला नाही. परंतु, सध्य:स्थितीतील वरील वातावरणीय प्रणल्या बघता ही स्थिती निवळेल, असे वाटते.

🔆 धरण जलसाठ्याची अवस्था
मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा व कोल्हापूर या चार जिल्ह्याच्या पश्चिमेकडील सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर 640 किमी लांबी व पूर्व-पश्चिम 10 ते 20 किमी रुंदीच्या नद्या उगम व धरण पाणलोट क्षेत्रातील त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, लोणावळा, खंडाळा, मावळ, मुळशी, ताम्हिणी, वेल्हे भोर, पोलादपूर, महाबळेश्वर, जावळी, बावडा, राधानगरी इत्यादी घाटमाथ्यावरील पट्ट्यात मान्सूनची कामगिरी सध्या उत्तम होत आहे. शिवाय, सध्याच्या वातावरणीय प्रणाल्याही पूरक जाणवतात. त्यामुळे जुलैअखेर कदाचित जलसंवर्धनातून धरणसाठ्याची टक्केवारीही कमीतकमी 70 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

🔆 शेवटच्या टप्प्यातील पेरण्या
ज्या शेतकऱ्यांच्या चांगल्या ओलीअभावी खोळंबलेल्या पेरण्या या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता जाणवते. खरीपपेरीचा हा शेवटचा टप्पा समजावा.

🔆 शिअर झोन
एका शेतकऱ्याने शिअर झोनबाबत विचारलेला प्रश्न व दिलेले उत्तर प्रबोधनासाठी देत आहे. माणिकराव, नाशिक ते वाशिम, गडचिरोली वरून जाणारा शिअर झोन म्हणजे काय?
एकूण तपांबर (ट्रोपोस्फेअर)पर्यंतची उंची सरासरी साडेतेरा किमी असते. समुद्रसपाटीपासून मध्य तपांबर (ट्रोपोस्फेअर)पर्यंतची उंची 7 किमी असते. समुद्रसपाटीपासून मध्य तपांबर(ट्रोपोस्फेअर) पर्यंत म्हणजे 3 किमीपासून वर व 6.5 किमीच्या खाली आकाशात एकूण साडेतीन किमी कमी दाब क्षेत्राच्या हवेच्या जाडीत निर्वात पोकळी असते. तेथे हवा नसते.

आता जर जमिनीपासून 3 किमी उंचीपर्यंत वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असतील. त्याच्या वरच्या पातळीत म्हणजे जमिनीपासून साडेसहा किमी उंचीपासून वर आकाशात वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असतील तर अशा एकमेकाच्या विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यांच्या स्थितीला ‘हॉरीझोन्टल शिअर झोन’ म्हणतात. हा अक्षवृत्त समांतर असतो. म्हणजे 3 किमीपर्यंत एका दिशेने 3 ते 6.5 किमी निर्वात पोकळी आणि 6.5 किमीच्या वर विरुद्ध दिशेने वारे वाहणाऱ्या स्थितीला शिअर झोन म्हणतात. अशी स्थिती उंच आकाशात कोठून कोठे जाते? ती जागा लक्षात यावी म्हणून शहरांची नावे सांगून शिअर झोनचे ठिकाण लक्षात आणून दिले जाते. जेथे शिअर झोन तेथे पाऊस पडण्याची विशेषतः शिअर झोनच्या दक्षिणेकडे शक्यता अधिक असते. अशाच प्रकारचा व्हर्टीकल शिअर झोन असतो. परंतु व्हर्टीकल शिअर झोन विमान चढताना व उतरताना धोकेदायक असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!