Expensive wedding : या महागड्या लग्नांवर नेमका आक्षेप काय?
1 min read🌀 विवाह ही एक बाजारपेठ
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया (Confederation of All India) या संघटनेने नोव्हेंबर 2023 मध्ये म्हटल्याप्रमाणे, भारतात 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2023 या काळात 38 लाख लग्नं होणार असून, या लग्नांवर किमान 4.74 लाख कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. 2022 च्या याच काळात 32 लाख लग्न झाली होती व त्यात 3.75 लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. 2022 वर्षीपेक्षा 2023 मध्ये 1 लाख कोटी रुपयांनी खर्च वाढ झाली आहे. या एकूण लग्नांपैकी सुमारे 50 हजार लग्नं अशी असणार आहेत, ज्यात एका लग्नात किमान 1 कोटींपेक्षा जास्त खर्च केला जाईल. याशिवाय 7 लाख लग्नं अशी असणार आहेत, ज्यात प्रत्येकी 3 लाख रुपयांपेक्षा कमी खर्च केला जाईल. तर इतर 50 हजार लग्नं अशी असतील, ज्यात प्रत्येकी 50 लाख रुपये खर्च केले जातील. विवाहाची अर्थव्यवस्थेला मदत होते आणि एक मोठी बाजारपेठ व आर्थिक उतरंड यातून उभी राहिली आहे. हा एक मुद्दा असला तरी सामाजिक परिणाम बघायला हवा.
🌀 महाराष्ट्रातील चर्चेतील लग्न
महाराष्ट्रात मोहिते कुटुंबात 1970 च्या दशकात लक्षभोजन दिले म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती. त्याकाळात मीडियाने प्रचंड टीका केली होती. उधळपट्टी करणे हा एक सामाजिक गुन्हा मानून नंतर अनेक वर्षे खूप टीका होत राहिली. त्यानंतर शरद पवार, गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीच्या लग्नाला झालेली गर्दी आणि खर्च हा चर्चेचा विषय होत राहिला. पण किमान ही लग्न लोक सहभागाची तरी होती.
🌀 हायप्रोफाईल लग्न
गेल्या 15 वर्षात नवश्रीमंत वर्गाने सामान्य माणसांच्या गर्दीपेक्षा निवडक मान्यवर सेलिब्रिटी लोकांची गर्दी आणि प्रचंड खर्च आणि संपत्तीचे प्रदर्शन याभोवती सारे विवाह फिरत आहेत. अनुष्का शर्मा व विराटच्या इटलीत झालेल्या लग्नाने त्याला वेगळाच आयाम दिला. त्यातून हायप्रोफाईल लग्न (High profile wedding) अधिकच कक्षेबाहेर सरकली. पैसे त्यांचे आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीपैकी हा खर्च हिमनगाचे टोक आहे. मग यात तुमचे काय बिघडते. ते त्यांचा पैसा खर्च करतात, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? असा प्रश्न नव्या पिढीतील तरुण विचारतात.
🌀 नव्या पिढीचा प्रश्न
पैसे जर कमावले आहेत तर ते कसे खर्च करावेत? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हा नव्या पिढीचा प्रश्न आहे. वरवर बघता हा प्रश्न तार्किक ही आहे. मूल्यव्यवस्था हा फारसा या नव्या पिढीचा काळजीचा विषय नसणे स्वाभाविक आहे. कारण ते ज्या काळात जगतात, ज्या आर्थिक व्यवस्थेचा भाग आहे. त्या काळात व्यक्तिवादी विचारसरणीत तळातल्या समाजावर काय परिणाम होईल, याचा विचार मागे पडणे स्वाभाविक आहे.
🌀 या विवाहाचा परिणाम
महात्मा गांधींनी वाराणसीला जेव्हा भेट दिली, तेव्हा तेथील दागिने घालून आलेल्या श्रीमंत व्यक्तींवर त्यांनी जाहीरपणे त्यांच्यासमोर टीका केली होती. गांधींच्या भूमिकेनुसार आज आपण या नव्या श्रीमंत प्रदर्शनाचे विश्लेषण करण्याची आवश्यकता आहे. श्रीमंतांनी आपल्या संपत्तीकडे विश्वस्त म्हणून बघावे, या गांधींच्या विचाराने आज फार कोणी वागणार नाही, हे ही समजण्यासारखे आहे. पण आपल्या या वागण्याचा समाजातील तळातील वर्गावर काय परिणाम होईल? याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. या विवाहाचा परिणाम हा होतो की, त्यांच्या खालच्या आर्थिक पायरीवर जे उभे आहेत ते रोल मॉडेल म्हणून स्वीकारतात आणि त्याचप्रकारे खर्च करू लागतात. देशातील सर्व उद्योजक, सेलिब्रिटी, राजकारणी या लग्नात वापरलेल्या पद्धती आयटेम आता अनुकरणात आणतील.
🌀 किमान 100 कोटींची लग्न होण्याचे प्रमाण वाढेल
आजच जयपूर, उदयपूर अशा ठिकाणी राजवाड्यात लग्न करण्याचे अनुकरण मोठ्या शहरात तसे राजवाडे उभे करून, तसे फॉर्महाऊस उभे करून पंचतारांकित हॉटेलसारख्या स्पेशल रूम हॉल तयार करून सुरू झाले आहे. आपण त्या वर्गातले आहोत, हे दाखवण्यासाठी माणसे पेलत नसताना हा बडेजाव करतात. माझी चिंता ही या उच्चभ्रू वर्गाच्या खर्चाची नाही. हे हळूहळू सरकत सरकत खूप खाली येते.
🌀 लग्नव्यवस्था महागली
माधुरी दीक्षितच्या ‘हम आपके है कौन’ या एका चित्रपटाने लग्नव्यवस्था प्रचंड महाग करून दाखवली. त्याने ड्रेस डिझाईन पासून अनेक बाजारपेठा फुलवल्या. आज शहरी भागात आणि अगदी तालुक्यात सुद्धा लग्नानंतर रिसेप्शन देण्याचा एक पॅटर्न तयार झाला आहे. काही लाख रुपयांचे पॅकेज यासाठी मोजावे लागते. प्री वेडिंग शूट (Pre wedding shoot) असा एक प्रकार अगदी ग्रामीण भागापर्यंत पोहोचला आहे. लाखभर रुपये त्यासाठी मोजले जातात.
🌀 अनुकरण संस्कृतीत गरिबांची फरफट
या अनुकरणाचा सर्वात वाईट परिणाम हा ग्रामीण पातळीवर होतो आहे. पूर्वी ग्रामीण भागात लग्न अगदी शेतात, घरासमोर होत असत. छोटा मांडव टाकून बैलगाडीने वऱ्हाड येणारी साधी सुधी लग्न आज शहरी नव श्रीमंत वर्गाच्या अनुकरणाने गरिबांची फरफट होते आहे हा मुख्य चिंतेचा विषय आहे. ग्रामीण भागातील नव श्रीमंत वर्गाने संपत्तीचे प्रदर्शन सुरू केले. ग्रामीण राजकीय नेत्यांनी ही सुरुवात केली. लोकांच्या संपर्काचे माध्यम म्हणून नेते लग्नातून फिरू लागले. उद्योगपती, सेलिब्रिटीच्या लग्नाला जर पंतप्रधान, मुख्यमंत्री येत असतील तर ग्रामीण लग्नात आमदार, खासदार, सभापती अपरिहार्य झाले. ते यावेत म्हणून लोक जीव काढू लागले. नेतेही मोठ्या गर्दीत जाऊन शुभेच्छा देणारी भाषणे करू लागले. लग्नात जमणारी गर्दी आणि तेथे होणारा प्रचंड खर्च हा प्रतिष्ठेचा मानदंड झाल्याने परवडत नसले तरी कर्जबाजारी होऊन लोक अनुकरण करू लागले. लग्नासाठी फार्महाऊस घेणे, रिसेप्शनचा जो एक पॅटर्न तयार झाला आहे. ते आपण केले नाहीतर आपण गरीब ठरू, अशा समजुतीने कनिष्ठ मध्यमवर्ग सुद्धा त्यात भरडला जातो आहे. मध्यमवर्ग कुटुंबाचा आज लग्नाचा खर्च 10 लाखांच्या पुढे गेला आहे. तो करणे जीवावर येते, पण या अनुकरण संस्कृतीत तो करावाच लागतो.
🌀 महागड्या शहरी लग्नाचे मिनी मॉडेल
यात सर्वात वाईट स्थिती ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी यांची होते. घरासमोर मांडव टाकून आता कोणीही लग्न करीत नाही. अगदी तालुक्याच्या पेक्षा छोट्या गावातील लॉन असलेली मंगल कार्यालय तयार झाली आहेत. सगळे जण तिथं लग्न करतात. महागड्या (Expensive) शहरी लग्नाचे मिनी मॉडेल तिथे असते. ड्रोन कॅमेरे पासून सारे काही असते. मंगल कार्यालय सगळा ठेका घेते आणि लाखांचे जास्त रक्कम मोजून हे पॅकेज परवडत नसले तरी गरिबांनाही हे मॉडेल स्वीकारावे लागते. पतसंस्था, बँकांचे कर्ज ज्या कारणासाठी वाटले जाते, त्यात लग्नासाठी कर्ज हे महत्त्वाचे कारण असते.
🌀 कर्जबाजारीपणाचे कारण
याचा सर्वात विदारक पैलू शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नात दिसून आला. शेतकरी आत्महत्येचे आजपर्यंत जे अभ्यास झाले, त्यात लग्नासाठी घेतलेले कर्ज हे एक कारण आढळून आले. ‘दारिद्र्याची शोधयात्रा’ या अभ्यासात मी ग्रामीण महाराष्ट्रात फिरलो. त्यात लोक स्थलांतरित मजूर का होतात? याचा अभ्यास केला, तेव्हा लग्नासाठी ठेकेदाराकडून उचल घेतली जाते व ती फेडण्यासाठी मजूर कामाला जातात, असे आढळून आले आहे. सालगडी प्रथेत लग्नासाठी कर्ज काढून नंतर कामाला जे जातात त्यांना ‘लग्नगडी’ म्हटले जाते. तेव्हा अंबानी इतके महागडे लग्न करताना खाली झिरपत झिरपत अनुकरणाने गरीब वर्गाची इतकी भयंकर फरफट होत असते. अनुकरण हा रोग इतका संसर्गजन्य असतो की जन रीत बनते त्याला सारे बळी पडतात. हे विचारात घेवुन समाजावर प्रभाव टाकणाऱ्या राजकीय नेते, उद्योजक, सेलिब्रिटी यांनी आपल्या संपत्तीचे प्रदर्शन टाळण्याची गरज आहे.
🌀 सामुदायिक विवाह चळवळ गरजेचे
यातून बाजारपेठ गती घेते, असाही एक मुद्दा मांडला जातो. पण या बाजारपेठेचे बळी हा खर्च न परवडत असलेला मोठा गरीब वर्ग आहे हे लक्षात घ्यायला हवे. त्यासाठी सामुदायिक विवाह चळवळ गतिमान करणे व त्याला प्रतिष्ठा देण्यासाठी प्रभावशील व्यक्तींनी त्यात आपल्या मुला मुलींचे लग्न करणे, असे करायला हवे. त्यानेच या विवाह सोहळ्यातील संपत्तीचे प्रदर्शन थांबेल व गरिबांची फरफट थांबेल.