krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Temperature increased : महाराष्ट्रात कशामुळे वाढले उष्णतामान?

1 min read
Temperature increased : मार्च ते मे हा तीन महिन्याचा मान्सूनपूर्व (Pre-monsoon) हंगाम महाराष्ट्रासाठी भौगोलिक रचनेनुसार वातावरणात एकाकी खूप बदल घडवून आणतो. कोकण किनारपट्टीला समुद्राचा खारा वारा कोकणपट्टीतील अधिवासासाठी दररोज आदळतो. दिवसा व रात्री वाऱ्याची दिशा वेगळी असते. याच दरम्यान पाकिस्तान, अफगाणिस्तान व राजस्थानच्या भागातून उच्च दाबाची प्रणाली तयार झाली तर वायव्य दिशेकडून गुजरातच्या अरबी समुद्रावरून वारे, उष्णता व आर्द्रता घेऊन मुंबईसह संपूर्ण कोकणात सह्याद्रीवर अडकून आदळतात व उष्णतेची जबरदस्त लाट मुंबईसह कोकणात तसेच महाराष्ट्राच्या इतर भागापेक्षा जाणवते.

पूर्व मोसमी (मार्च ते मे ) हंगामात जेव्हा दोन प्रति-चक्री वादळे अथवा प्रति-विवर्ते (Anticyclone) किंवा उच्च हवेच्या दाबाचे डोंगर एक अरबी समुद्रात तर दुसरे बंगालच्या उपसागरात किंवा किनारपट्टीच्या भू-भागावर तयार होतात, तेव्हा या दोघांच्या मध्ये वाऱ्याची विसंगती (Wind discontinuity) तयार होते. म्हणजेच वारे एकमेकांच्या विरुद्ध महाराष्ट्रात तसेच देशाच्या मध्यावर वाहू लागतात. अरबी समुद्राच्या बाजूला उत्तरेकडून दक्षिणेकडे तर बंगालच्या उपसागराच्या बाजूला दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतात. या दोघांमध्ये जी निर्वात पोकळी तयार होते तिलाच ‘वारा खंडितता’ (Wind discontinuity) म्हणतात.

सिझननुसार घडणाऱ्या प्रणल्यांनुसारच देशात पूर्व-मोसमी (मार्च, एप्रिल, मे असे तीन महिने ) या सिझनमधील ‘वारा खंडितता’ ही प्रणाली सुद्धा ठळक वैशिष्ठ्याची असते. या प्रणालीमुळे देशात 15 ते 20 डिग्री अक्षवृत्त दरम्यान उच्च दाब क्षेत्रे तयार होतात. काही कालावधीनंतर ते विरळही होत असतात.

आज ही वारा खंडितता प्रणालीमुळे समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीपर्यंत हवेच्या कमी दाबाचा आस हा दक्षिण कर्नाटक ते पूर्व विदर्भापर्यंत पसरला असून याची रुंदीही काही किलोमीटरमध्ये आहे. त्यामुळे तेथे वारा शांत असतो. हवेच्या दाबाच्या रेषाचे व वारा दिशांचे जोड क्षेत्र तयार झालेले आहे. त्यामुळे या क्षेत्रात आर्द्रतायुक्त उष्ण हवा लोटली आहे. सौराष्ट्र व कच्छ, उत्तर कर्नाटकात तसेच नैऋत्य राजस्थानात उष्णतेच्या लाटसदृश्य स्थिती जाणवत आहे. म्हणून या पाच दिवसात महाराष्ट्रात अति नसली तरी उष्णता वाढलेली (Temperature increased) आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!