krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Chhatrapati Shivaji Maharaj : शेतकऱ्यांचा राजा : छत्रपती शिवाजी महाराज

1 min read
Chhatrapati Shivaji Maharaj : ‘रयत सुखी तर राजा सुखी, शेतकरी सुखी’ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्यकारभाराचे मुख्य सूत्र होते. हेच खर्‍या अर्थाने त्यांच्या राज्यकारभाराचे धोरण होते. हे स्वराज्य शेतकऱ्यांचे आहे, शेती करणे हे रयतेचे मुख्य बलस्थान आहे, संपूर्ण प्रजेचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे, शेती हे केवळ जीवनावश्यक साधन नसून, रयतेच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहे. याची महाराजांना जाणीव होती. महाराजांचे शेती, माती आणि माणसांविषयीचे विचार आज्ञापत्र, बखरीमधून दर्शन होते. स्वराज्याच्या हिताचे रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने लोक लोककल्याणकारी राजे होते. आज मात्र राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नाही.

🔆 लोकाभिमुख राज्यकारभार
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादायक आणि वैभवशाली आहे. त्यांनी मोठा पराक्रम गाजवून रयतेचे स्वराज्य निर्माण केले. मोगल, आदिलशाही, इंग्रज यांच्या विरोधातील त्यांची लढाई राजकीय होती, धार्मिक नव्हती. त्यांचा राज्यकारभार लोकाभिमुख होता. शिवाजी महाराजांनी नेहमीच कष्टकरी, शेतकरी यांचे हित जोपासले. शिवकाळात अनेकदा दुष्काळ पडला. सिंचनाचे प्रमाण कमी होते. उद्योग-व्यवसाय मर्यादित होते. तरीदेखील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाहीत. कारण, शिवरायांचे शेती आणि शेतकरीविषयक धोरण. ते त्यांच्या अनेक पत्रांतून आणि आज्ञापत्रांतून स्पष्टपणे दिसते.

🔆 शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण
स्वराज्य स्थापनेच्या रणसंग्रामात त्यांनी शेतकऱ्यांची कधीही हेळसांड होऊ दिली नाही. 23 ऑक्‍टोबर 1662 रोजी सर्जेराव जेधे यांना पाठविलेल्या पत्रात शिवाजी महाराज म्हणतात, ‘तुमच्या इलाख्यात मोगलांची फौज (शाहिस्तेखान) येत असल्याची बातमी हेरांनी दिली आहे. त्यामुळे इलाख्यातील सर्व रयतेला लेकराबाळांसह घाटाखाली सुरक्षित जागा असेल तेथे पाठवणे. या कामात हयगय करू नका. या कामात हयगय कराल, तर तुमच्या माथी रयतेचे पाप बसेल. गावोगावी हिंडून सेतपोत जतन करणारांचे हित जोपासावे. या कामात दक्षता बाळगावी.’ परचक्रापासून शेती अणि शेतकरी वाचला पाहिजे, याबाबत शिवरायांनी घेतलेली काळजी आजदेखील पथदर्शक आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून त्यांनी लढाया केल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या हिताला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. ‘शेतकऱ्यांना लुटू नये, शेतकऱ्यांची चोरी करू नये, शेतकऱ्यांची इमानेइतबारे सेवा करावी. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठासदेखील मन दाखवू नये. शेतकऱ्यांच्या काडीसदेखील हात लावू नये. जर तुम्ही तसे कराल, तर मी तुमच्यावर राजी नाही (नाराज आहे.) असे समजावे,’ असे शिवाजी महाराजांनी 5 सप्टेंबर 1676 रोजी आपल्या सुभेदाराला लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

🔆 शेतीमालाला रास्त भाव मिळेल याची काळजी
स्वराज्यातील शेतीमालाला रास्त भाव मिळेल, याकडे शिवरायांनी लक्ष दिले. अतिरिक्त शेतीमाल योग्य मोबदला देऊन खरेदी केला. तो परमुलखात नेऊन विकण्याची सोय केली. शिवरायांनी शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती कशी केली, ते पुढील उल्लेखावरून स्पष्ट होते. ‘जिन्नसच वसूल घेऊन जमा करीत जाणे आणि मग वेळच्या वेळी विकत जाणे. महाग विकेल आणि फायदा होईल ते करीत जाणे. वसूल हंगामशीर घ्यावा आणि साठवण करून विक्री अशी करावी, की कोणत्या वेळेस कोणता जिन्नस विकायचा, माल तर पडून राहता कामा नये आणि विक्री महाग झाली पाहिजे. दहा बाजार केले तरी चालतील, पण मालाला भाव मिळाला पाहिजे. त्याचा फायदा होईल.’

🔆 अडचणी, टंचाई काळात शेतकऱ्यांना मदत
टंचाईच्या काळात शिवाजीराजे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. टंचाईप्रसंगी शिवाजीराजे आपल्या सुभेदाराला सांगतात, ‘कष्ट करून गावोगावी फिरा. शेतकऱ्यांना गोळा करा. ज्याला बैलजोडी आणि जोत हवा असेल त्याला ते द्या. पैसे द्या. खंडी, दोन खंडी धान्य द्या. दिलेल्या मदतीचा वसूल वाडीदिडीने करू नका. मुद्दलच जेवढी हळूहळू ऐपत आल्यानंतर घ्या. त्यासाठी तिजोरीवर दोन लाख लारी बोजा पडला तरी चालेल.’ आपल्या राज्यातील मजूर, गरीब, शेतकरी सुखी राहिला पाहिजे, तो उपाशी झोपता कामा नये, त्यासाठी तिजोरीवर प्रसंगी बोजा पडला तरी चालेल, ही शिवरायांची भूमिका होती. त्यांनी शेतकऱ्यांचे हित जोपासले, हे त्यांच्या वरील आदेशावरून स्पष्ट होते. कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी आज आत्महत्या करत आहेत. शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळत नाही, तर दुसरीकडे धान्याची आयात केली जात आहे. त्यामुळे शेतकरी वैफल्यग्रस्त झाला आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना आधार देऊन उभे करण्यासाठी शिवरायांच्या शेतकरी धोरणाची देशाला गरज आहे.

🔆 शेतातील झाडांसह शेतजमिनीची काळजी
एका आज्ञापत्रात शिवाजी महाराज म्हणतात, ‘आरमारासाठी झाड हवे असेल तर आंबा-साग तोडू नका. कारण ती एका सालात पैदा होत नाहीत. शेतकऱ्यांनी त्यांना अनेक वर्षांपासून लेकराबाळांप्रमाणे वाढविलेले असते. ती झाडे तोडली तर शेतकऱ्यांच्या दुःखास पारावार राहणार नाही. ती तोडणे म्हणजे प्रजापीडन आहे. झाड हवे असेल तर जीर्ण झालेले झाड त्याच्या मालकाच्या परवानगीने त्याचा योग्य मोबदला देऊन त्याला आनंदी करून तोडून न्यावे. अत्याचार सर्वथा न करावा.’ जमीन संपादनाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी शेतकऱ्यांना आज संघर्ष करावा लागतो. अनेकदा शेतकऱ्यांवर अन्याय होतो. पण शिवाजीराजे म्हणतात, ‘शेतकऱ्यांवर अत्याचार न करता त्यांना योग्य मोबदला देऊनच संपादनूक करावी.’ सन 1676 मध्ये प्रभानवल्लीचा सुभेदार रामजी अनंत यास लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे की, ‘रयतेकडून भाजीच्या देठाचीही अपेक्षा न करता रास्त आणि बिनचूक वर्तन केले पाहिजेत’. हे पत्र राज्याभिषेकानंतरचे आहे. हे पत्र इतके मोलाचे आहे की त्यातील विचारधन आजही शेतीचा विकास करण्याच्या कामी उपयुक्त ठरावे.

🔆 सारा वसूल करण्याची पद्धती
सारा वसूल करताना रयतेवर अधिक भार पडणार नाही, जुलूम जबरदस्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. शेतीच्या उत्पन्नात रयतेचा वाटा रयतेला मिळेल आणि सरकारचा वाटा सरकारला मिळेल असेच वर्तन करावे. रयतेवर काडीचाही जुलूम केला अथवा गैरवर्तन केले तर राजे तुमच्यावर नाराज होतील हे पक्के समजावे, असेही पत्रात म्हटले आहे.

🔆 शेतकरीभिमुख धोरणांची गरज
शिवरायांनी नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासले. प्रशासनाला वेळोवेळी शेतकरीहितासाठी दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शेतीमालाला योग्य भाव मिळेल, याकडे लक्ष दिले. शेती आणि अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था येण्यासाठी शिवरायांच्या शेतकरीभिमुख धोरणांची आजही गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना त्यांच्या विचाराचा जागर होऊन आजच्या राज्यकर्ते आणि प्रशासन यांना सद्बुद्धी मिळावी, खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन ठरेल.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!