krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Yelvas of Latur : लातूरची येळवस अन् ‘वलग्या वलग्या सालम पलग्या’

1 min read
Yelvas of Latur : लातूर जिल्हा आणि जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात गुरुवारी (दि. 11 जानेवारी 2024) समुद्राला जशी पाण्याची भरती येते तशी शेताशेतात माणसांची भरती येते. कोणत्याही पुराणात किंवा इतिहासात नसलेला मात्र शेकडो वर्षाची परंपरा असलेला एक सण म्हणजे येळवस म्हणजे वेळा अमावस्या! हा सण हिरवाईचा अपूर्व सोहळा. 11 जानेवारी रोजी अख्ख्या लातूर जिल्ह्यातील शेतात भरेल. यावेळी कोरोनाचे संकटही नाही. जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक सुट्टीही जाहीर केली आहे. त्यामुळे ही वेळा अमावस्या मोठ्या धुमधडक्यात साजरी होणार आहे. त्याविषयी महाराष्ट्राला समजावे म्हणून हा लेख प्रपंच!

🔆 कसा असतो सोहळा
वेळा अमावस्येच्या चार दिवस अगोदर साधनाची जमवा-जमव सुरू होते. त्यात तुरीच्या शेंगा, चवळी, भुईमूग हा सगळा रानमेवा जमा होतो आणि वेळा अमावस्येच्या पहाटे घराघरात चूल पेटते. बेसन पिठात कालवून चिंच आणि अंबिवलेल्या ताकाच्या पाण्यात वर उल्लेखलेले उकडलेले पदार्थासह शिजवलेली भाजी म्हणजे भज्जी! ही भज्जी म्हणजे अफलातून भाजी. मी आजपर्यंत राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरलो, वेगवेगळे पदार्थ खाल्ले पण भज्जीसारखी अफलातून चव कशाला म्हणजे कशाला नाही. या डिशची तुलना कोणतेही पंचतारंकित हॉटेलही करू शकणार नाही. या बरोबर दिले जाणारे अंबील म्हणजे तर राजदरबारी असलेले सगळे पेय फिके पडावेत असे. चार दिवसांचे ताक ज्वारीच्या पिठात अंबवून जिरा फोडणी दिलेलं हे पेय जे तांब्यावर तांबे रिचवले तरी प्यायची इच्छा होते, ते अंबिल (काही जणांचे तोंडही सुजतात दुसऱ्या दिवशी जादाचा डोस झाल्यामुळे). भल्या थोरल्या भाकरी. गव्हाची खीर. एका शेतात 20 ते 25 लोकं जेवतील एवढा स्वयंपाक वाजत गाजत घरातून डोक्यावरून शेतावर निघतो. एका शेतात खाल्लेली येळवस दुसऱ्या शेतात जाऊन खाण्यासाठी ते जिरावं म्हणून प्रत्येक कोपीच्या पुढे झोका बांधला जातो.

🔆 काय आहे परंपरा
अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो. रब्बी पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो. भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी संस्कृती आहे. सर्व प्राणिमात्रांची मूलभूत गरज म्हणजे अन्न. त्यामुळे मानवी जीवनात अन्न-धान्याचे महत्त्व अविवाद्य असल्याने आपल्या पूर्वजांनी त्यासंबंधी विशेष विचार केलेला आढळून येतो. भारतीय द्विपकल्पात सिंधु संस्कृतीपासून नदीचे जल पूजन करण्याची परंपरा चालत आलेली आहे. गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधु आणि कावेरी या सात नद्या (सप्तसिंधु) भारतीय लोक परंपरेत अतिशय पवित्र समजल्या जातात. त्यामागे त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञता होती. त्याच सप्तसिंधु मातृका म्हणून पूजण्याची परंपरा सुरू झाली. पुढे पिण्याच्या पाण्याच्या विहिरी खोदल्यानंतर त्यातले जल हे या सप्तसिंधुचे प्रतीक म्हणून पूजल्या जाऊ लागले. विहरीच्या जवळ प्रतिकात्मक सात दगड पूजण्याची परंपरा आहे. तीला लातूर जिल्ह्यात आसरा म्हणून ओळखले जाते. आसरा म्हणजे तुच आमची राखण करणारी, सहारा देणारी, पाणी पाजणारी. याच आसराची पूजा वेळा अमवस्येच्या दिवशी प्रत्येक शेतात मस्त ज्वारीच्या कडब्याच्या पेड्यांची कोप करून मनोभावे पूजा करून लक्ष्मीला ब्लाऊज पीसने ओटी भरून नैवेद्य दाखवला जातो. परंपरा म्हणून खोपेला 5 फेऱ्या मारतात आणि ‘वलग्या वलग्या सालम पलग्या’ असे म्हटले जाते. हे कन्नड वाक्य आहे. कन्नडात ‘वलगे वलगे सालम पलगे’ असा उच्चार होतो. त्याचा अचूक अर्थ ‘वांग्याची भाजी आणि पोळी तुम्हाला (लक्ष्मीला) अर्पण करतो. तुम्ही आमच्यावर अनुग्रह करा.’ असा होतो.

सकाळी पूजा करून आणि हा सगळा सुग्रास भोजनाचा भोज चढवून मोठी पंगत बसते. जेवण करताना आपण किती खातोय, याचे भान राहत नाही. प्रत्येकाच्या कोपीला जावून भज्जीचा आस्वाद घेण्याचा आग्रह होतो, तो टाळता येत नाही, पोटाला तडन लागते. जेवणाच्या पात्रावरून उठून झोक्यावर जावून झोका खेळायचे, खालेले अन्न पचवण्यासाठीचा प्रयत्न करायचा आणि पुन्हा दुसऱ्या कोपीवर जाऊन जेवायचे. एकेकाळी 12 बलुतेदार, आठरा आलुतेदार यांनाही आग्रहाने जेवायला बोलवून हे सगळे खावू घातलं जात. संध्याकाळी ज्वारीच्या पेंडीचा टेंबा करून रब्बीचा गहू, हरभरा याच्या वावराला तो पेटवून रान ओवाळून काढायचे आणि तोच टेंबा मिरवत जाऊन गावातील मंदिराच्या समोर टाकायचा. मोठी आग करून ती शमली की, तिच्या राखेतून विस्तव असतानाच ती ठोकरून घरी जायचे, असा मनमोहक सण आहे. त्यानंतर घरातले कर्ते पुरुष माळेगावच्या खंडोबाच्या जत्रेला निघून जायचे. ही जत्रा देशभरात वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध आहे. मोठा घोड्याचा बाजार (माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्यासह अनेकांचे दैवत), गाढवांचा बाजार, सगळ्या भटक्या जमातींची पंचायत यावेळी इथे भरते. देशभरातले तृतीयपंथी दर्शनाला येतात (तृतीयपंथांचे माळेगाव अशीही ओळख), तमाशाचे मोठमोठे फड.यामुळे या जत्रेला पुरुष मंडळीच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने चांगभलं असे. असा हा सण आणि त्याची परंपरा आहे. आजही मोठे हौसेनी सांभाळली जाते. चला तर मग येळवस साजरी करू या… महान परंपरेचा वारसा जपू या…!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!