Swarajya motivation : स्वराज्य प्रेरणेचा वसा पुढे चालवा!
1 min readमहापुरुषांच्या जयंती व पुण्यस्मरण दिनांना एरवी आपण उत्सव प्रियतेने भारून गेलेलो असतो. उत्सवप्रियता हा तसाही आपल्या भारतीय समाजमनाचा स्थायीभाव आहे. उत्सव प्रियतेच्या पुढे जाऊन महापुरुषांच्या चरित्रातून बोध, प्रेरणा घेण्याचा आजचा दिवस. स्वतःच्या अस्तित्वाच्या निर्माणासोबतच राष्ट्र, समाज व मानवतेसमोरील आव्हानांची कालसुसंगत उत्तरे शोधण्याची प्रेरणा महापुरुषांच्या चरित्रातून आपल्याला मिळत असते. अशाच दोन प्रेरणा सूर्यांची आज जयंती.
स्वराज्य आणि न्याय, रयतेच्या राज्याची मुहूर्तमेढ मराठी मुलखात रोवून इतिहास घडविणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ माॅंसाहेब व उठा, जागे व्हा अन् ध्येयपूर्ती पूर्वी थांबू नका, असा अस्तित्व निर्माणचा संदेश देणाऱ्या ज्ञानयोगी स्वामी विवेकानंद यांच्या चरित्रातून प्रेरणा घेण्याचा आजचा दिवस. आजच्या परिस्थितीत काल सुसंगत विचार करायचा झाल्यास भूमिपुत्रांच्या, शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वराज्याचा व युवकांच्या अस्तित्व निर्माणाचा विचार व त्यासाठी आवश्यक कृतिशील कार्यक्रम, उपाययोजना चिंतनाच्या माध्यमातून पुढे आणणे व ती समाजामध्ये रुजविणे ही आजच्या या दोन प्रेरणा सूर्यांच्या जयंती पर्वामागील खरी कृतिशील प्रेरणा असावी, असे म्हणावे लागेल.
आम्ही धर्माच्या नावावर गुलामगिरी भोगलीय, आम्ही जातीच्या नावावर गुलामगिरी भोगलीय, आम्ही स्त्री-पुरुष भेदाची गुलामगिरी भोगलीय, आम्ही आक्रमकांची गुलामगिरी भोगलीय, आम्ही राजकीय गुलामगिरी भोगलीय, इव्हेंट मॅनेजमेंट व इमेज ब्रॅण्डिंग करून आकर्षक वलयामध्ये आमच्या पुढे प्रेझेंट केल्या जाणाऱ्या कथित आदर्शाची, प्रसंगी राजकीय नेत्यांची ही गुलामगिरी आम्ही भोगतोय. गुलामीचे याहीपेक्षा विदारक चित्र बहुसंख्येने असलेला आमचा सर्जक शेतकरी समाज भोगतोय.
स्वातंत्र्याच्या सात दशकांत एका दाण्याचे हजार दाणे करणाऱ्या आमच्या शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याच्या वाटा आम्ही पावलोपावली गुलामीच्या जोखडांनी अडवून ठेवलेल्या आहेत. अद्यावत बीज तंत्रज्ञानापासून बाजारपेठांपर्यंत कुठेच स्वातंत्र्य नाही. आजच्या काळात कुठे गुलामी व अंधकाराचा राक्षस पहायचा असेल तर तो शेतीतील घाट्यामुळे झालेल्या लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या व रोजगाराच्या शोधात भरकटत असलेल्या युवा पिढीच्या समस्यामध्ये पहायला मिळेल. आज आमच्या युवा पिढीसमोर बेरोजगारी, अनुत्पादकता व नैराश्याचे जे शत्रू दिसत आहेत, त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी चिंतन व कृतिशील उपाययोजनेचा विचार, संकल्प ही राष्ट्रमाता जिजाऊ माॅंसाहेबांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल.
आज स्वराज्याची खरी प्रेरणा जर काही घ्यायची असेल तर ती शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याची प्रेरणा म्हणून घ्यावी लागेल. आझादी, आझादी म्हणतांना, नेमके आपली गुलामगिरी व अडवणूक कुठे आहे, हे ओळखण्याची कुवत व दृष्टी आमच्या युवा पिढीमध्ये आणण्याचा संकल्प आजच्या दिवशी करावा लागेल. या संकल्पाच्या पूर्ततेसाठी उपयोगी सिद्ध होता येणे हीच आदरांजलीची खरी उपयोगिता ठरेल. अद्यावत बीज तंत्रज्ञानापासून बाजारपेठांपर्यंत शेतकऱ्यांच्या पायांतील विविध बेड्या तोडणे हीच आजच्या स्वराज्याची संकल्पना ठरू शकते.
बळीराजानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने शेतकऱ्यांच्या राजाची, शेतकऱ्यांच्या स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना यापेक्षा वेगळी आदरांजली काय ठरू शकेल. आज शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याच्या, न्यायाच्या संकल्पना आम्हाला समजून घ्याव्या लागतील. माणूस म्हणून जगताना वेळोवेळी, नवनव्या आर्थिक आव्हानांना सामोरे जातांना ती स्वातंत्र्याची धोरणे शेतकऱ्यांना हवी आहेत, जी देशातील इतर नागरिकांना, व्यवसायिकांना उपलब्ध आहेत.
आम्ही स्वतःच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आरडाओरडा करतो. पण बहुसंख्येने असलेल्या, खऱ्या उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यवसायात मात्र स्वातंत्र्याचे कवडसेही येऊ न देण्यासाठी मात्र सर्वशक्तीने प्रयत्न करत राहतो. आपल्या व्यक्तिमत्वात, कृतीत हा दुटप्पीपणा अज्ञान, समजून न घेण्याची वृत्ती, बुद्धिभेदाला बळी पडण्यातून बेमालूमपणे आपल्या सामाजिक अभिव्यक्तीमध्ये आलेला असतो. राजकीय लोक त्याला खतपाणी घालत राहतात. हमे चाहिये आझादी म्हणत ओरडणारेही देशातील बहुसंख्य सर्जक शक्ती स्वतंत्र होऊ नये, आपल्या ताब्यात रहावी, यासाठी प्रयत्न करीत राहतात व समाज त्याला बळी पडतो. त्यामुळे सामाजिक संघटना, जातीय संघटनांचे पेव फुटूनही समाजाची ग्लानी दूर व्हायचे नाव घेत नाही. बहुसंख्यकांचे, शेतकऱ्यांचे स्वराज्य हाच एकमेव मार्ग आहे, ही राष्ट्रमाता जिजाऊची प्रेरणा आजच्या जयंती पर्वावर आपणा सर्वांना त्यासाठी घ्यावी लागेल.
रयतेच्या राज्याची ही महाप्रेरणा आपल्यासाठी आपल्या मातीत उपलब्ध आहे, हे जिजाऊंच्या रूपाने आपले भाग्य म्हणावे लागेल. जिजाऊंना आजच्या परिवेशांत समजून घेताना जुलमी सत्तांच्या कचाट्यातून शेतकऱ्यांचे स्वराज्य निर्माण करणारी प्रेरकशक्ती म्हणून बघावे लागेल. जिजाऊंनी स्वराज्याचा संकल्प घेतला तेव्हा रयत जुलमी सत्ताकारणांनी पिडलेली, गांजलेली होती. जे तेव्हा तलवारीच्या, तोफांच्या बळावर होत होते, ते आज कागदी घोडे नाचवून केले जाते. म्हणून 350 वर्षे लोटून गेल्यावर आजही जनता छत्रपतींच्या स्वराज्याची वाट पाहतेय. जिथे कुठल्या फसव्या घोषणा, योजना नव्हत्या, पोकळ आश्वासने नव्हती, होते ते फक्त रयतेचे स्वराज्य अन् शोषणमुक्त व्यवस्था. त्या स्वराज्यासाठी प्राण हातावर घेऊन लढणारे मावळे. स्वातंत्र्याच्या प्रेरणेचे यापेक्षा मोठे उदाहरण जगाच्या इतिहासात सापडणार नाही.
स्वराज्य, स्वातंत्र्य ही मानवी जीवनातील सर्वात मोठी मूल्ये आहेत अन् त्यासाठी सामान्य माणूस ही प्राणपणाने लढू शकतो, ही प्रेरणा जिजाऊंनी दिलीय. म्हणून त्यांना स्वराज्य प्रेरिका संबोधले जाते. आज आमच्या देशात शेतमालाचे भाव खालच्या पातळीवर नियंत्रित करण्यासाठी अनेक कायदे आहेत. उत्पादन खर्च भरून न निघाल्याने कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणारे शेतकरी ही मोठ्या संख्येने आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवा माय, भगिनींचा एकाकी संघर्ष पावलोपावली जिजाऊंच्या स्वराज्याची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही. जिथे रयत, शेतकरी सुखी होते, आनंदी होते. शेतकरी व राजामधला संरक्षणाचा करार छत्रपती रयतेचे राजे म्हणून प्राणपणाने निभावत होते.
शेती, संरक्षणासोबतच पर्यावरण, जलसंधारण, महिला सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था, न्याय आदींचा आदर्श वास्तुपाठ जिजाऊंनी छत्रपतींच्या माध्यमातून रयतेच्या राज्याच्या रूपाने घालून दिला आहे. ही प्रेरणा आमच्या हजारो पिढ्यांना पुरून उरणारी आहे. या प्रेरणेतून आमच्या शेतकऱ्यांनी स्वातंत्र्याचा, स्वराज्य निर्मितीचा बोध घ्यावा, आमच्या युवकांनी अस्तित्व निर्मितीचा बोध घ्यावा व आमच्या मातृशक्तीने आपल्या पुढच्या पिढ्यांना संस्कार, ज्ञान, संघर्ष, स्वाभिमान, कर्तृत्वाचा बोध देण्याचा संदेश घ्यावा, हीच खऱ्या अर्थाने स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता जिजाऊंना आदरांजली ठरेल.