krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Women in agriculture : महिलांचे शेतीतील स्थान…!

1 min read
Women in agriculture शेती (Agriculture) हा मानवी इतिहासातील पहिला उद्योग आहे. त्याचा शोध स्त्रियांनी (Women) लावला. गर्भवती असताना आणि प्रसूतीनंतर शिकार करणे स्त्रियांना काहीसे त्रासदायक होत असे. तेव्हा विशिष्ट गवताच्या बिया जमिनीत टाकल्यावर तसेच गवत उगवून त्याला त्याच बियांचे भरघोस झुपके लागतात. पशू पक्षी ते मोठ्या आवडीने‌ खातात. त्या झुपक्यातले दाणे अतीशय रुचकर लागतात; हे निरीक्षण त्या स्त्रियांनी प्रत्यक्षात आणले आणि शेती सुरू झाली.

🌏 ‘स्फ्य’ शेती
जमिनीत भेगा पाडून बियांची पेरणी करत. शेतीच्या या प्राथमिक अवस्थेत ‌वापरात येणाऱ्या लाकडी अवजाराला ‘स्फ्य’ म्हणत. त्या काळातल्या शेतीला ‘स्फ्य’ शेती म्हणतात. स्फ्य म्हणजे विस्तारित होणारी. नंतर लोखंडी अवजारे‌ तयार होऊ लागली. पशुपालनामुळे बैलांचा उपयोग शेतीसाठी होऊ लागला आणि स्फ्य‌ शेतीपेक्षा भरपूर जास्त धान्य उत्पादन होऊ लागले. शेती हा नुसता उद्योग न राहता व्यवसाय झाला आणि वस्तू विनिमयात धान्याला महत्त्व मिळू लागले. गर्भवती असताना आणि प्रसूतीनंतर बैलांचे कासरे सांभाळत, लोखंडी अवजारे वापरणे स्त्रियांना जड जाऊ लागले. म्हणून हळूहळू शेती पुरुष वर्गाकडे‌ गेली. आजही या इतिहासाची आठवण म्हणून ऋषिपंचमीच्या दिवशी स्त्रिया स्वत:च्या कष्टाने पिकवलेले धान्य, भाज्या, फळे खातात. बैलांच्या कष्टाने पिकवलेल्या वस्तू त्या दिवशी वर्ज्य असतात. ऋषिपंचमीच्या व्रत आणि उद्यापनाच्या कर्मकांडात‌ वसिष्ठ पत्नी अरुंधतीचे स्मरण, आवाहन आणि पूजन हेच तथ्य आहे. अरुंधती म्हणजे अवरोध, विरोध न करणारी, सहकार्य करणारी. एकमेकींचे अनुभव, कल्पना, माहिती एकमेकींना सांगून सहकार्याने‌ शेतीत नवनवीन प्रयोग करण्याचा तो कालखंड‌ होता.

🌏 शेती उत्पन्नाचे शोषण
स्त्रियांचा शेतीतील सहभाग अक्षरश: पुरातन काळापासून आजपर्यंत आहे. शेतीच्या व्यवस्थापनाचे उत्तम वेळापत्रक स्त्रिया तयार करतात आणि अंमलात आणतात. वेळ, कष्ट, पैसा आणि शेतीला लागणाऱ्या बियाणे खतांचाही योग्य वापर योग्य प्रमाणात करतात. शेतीसाठी वेळ कष्ट आणि पैसा पुरेसा तरीही काटेकोरपणे वापरतात आणि बचतही करतात. शेतीला ‘जीवनशैली’ म्हणून नुसते गौरवून चालणार नाही. उद्योग आणि व्यवसायात रुपांतर झालेल्या या जीवनशैलीला आर्थिक व्यवहाराची शिस्त हवी. शेतीतल्या वरकड उत्पन्नातून पूर्वी शेतीला पूरक असलेली बलुतेदारी तयार झाली. पण आता शेतीच्या वरकड उत्पन्नाचे औद्योगिक क्षेत्रासाठी आणि अकृषक नागरिकांच्या सोयीसाठी शोषण होत आहे. म्हणून शेती व्यवसाय उद्ध्वस्त‌ होण्याच्या बिंदूवर येऊन ठेपला आहे. आजही‌ शेतकरणी‌, शेतीमातीशी कष्टाचे ईमान सांभाळून‌ आहेत. पण आपल्या मुलामुलींनी शेतीच्या भानगडीत अडकू‌ नये, हे त्यांचे मत, त्यांना उद्‌विग्न करणाऱ्या‌ अनुभवांमुळे बनले आहे. त्या स्वत: अजूनही शेतीत कष्टतच आहेत.

🌏 पेरणीचं गणित
उन्हाळवाही‌ झाली की, पहिल्या पावसानंतर शेतातला गतवर्षीच्या पिकाचा कचरा‌ वेचण्याचं मोठं काम‌ स्त्रिया करतात. कचरा‌ वेचून जाळला‌‌ जातो. त्यामुळे अनेक किडींचे‌ जीवनचक्र तुटते‌ आणि‌ नवीन पिकांवर‌ किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. पाऊस‌ पडल्यावर पेरणी सुरू होते. पेरणी करताना धान्याच्या बियांची ओटी स्त्रिया पोटाजवळ बांधतात. औतामागे चालत, एका हातात सरते घेऊन त्यात दुसऱ्या हाताच्या‌ मुठीने पावलागणिक किती ‘दाणे’ जमिनीत पेरायचे, याचं गणित त्यांना पक्क ठावूक असतं. ठराविक पावलांत मुठीतलं धान्य संपतं. पेरताना सरतं, भुसभुशीत मातीतून‌ पुढे नेण्याचीही एक कलाच असते. विशिष्ट अंतरावर गळ्यातल्या हाराचे मोती असावेत तसे काळजीने आणि हळुवारपणे‌ धान्याचे दाणे मातीत सोडले‌ जातात. पूर्वी पऱ्हाटीची सरकी पेरायचे. आता टोबली जाते. पावलांच्या दुतर्फा ‘फाडलेल्या तासांवर’ ठराविक अंतराने सरकी टोबतात. बियाणं किती खोल टोबायचं याचही गणितच!

🌏 हाती पालव आणि ईळा…
पुरेसा पाऊस झाला की, बी तरारून येतं. वावरात हिरवे‌ ठिपके हिरव्या ओळी दिसायला लागतात. आता शेतकरणीच्या हातात ‘पालव आणि‌ विळा’ येतो. आता अतिशय महत्त्वाचं, कष्टाचं आणि सतत चालणारं काम ‘निंदण’ सुरू होतं. घरातल्या टीचभर आरशात बघणाऱ्या नवीन‌ सूनबाईंना घाई करताना घरातल्या इतर जणी म्हणतात. चला सुनबाई लवकर शेतात. आता निंदणाचे फेर होईपर्यंत, ‘हाती पालव आणि ईळा, कपाळी कुंकवाचा टिळा…’ वावरात वाकवाकून निंदण करायचं आणि ओल्या गवताचे जड पुंजाणे धुऱ्यावर नेऊन टाकायचे. कमरेची काडी आणि पाठीचं खापर होतं. पावसाचे दिवस, ओली माती, गवत ओलं, हातात कायम विळ्याची मूठ. बोटं हळुवार झालेली. विळ्याची धार, गवताच्या पात्याची धार, कधी क्वचित काटेरी गवताचा थोम, कधी बोचणारी दगडाची ठिकरी, यामुळे बोटं फुटतात. पण निंदण थांबवून चालत नाही. जखमेत चुना भरून काथ लावून वर एक चिंधी बांधून निंदण सुरूच राहतं.

🌏 खतं देणे, फवारणी करणे
मग खत देण्याचं, औषध फवारण्याचं काम सुरू होतं. नैसर्गिक शेतीचे कितीही गोडवे गायले तरी इतकी मोठी लोकसंख्या पोसायला रासायनिक शेतीला पर्याय नाही. सरकी टोबणं, खतं देणं, औषध फवारायला पंपासाठी पाणी पुरवणं, ही काम बहुधा शाळकरी मुली करतात. पैसा वाचवायला स्वत:च्या शेतात, पैसा कमवायला दुसऱ्याच्या शेतात. पोळ्यानंतर पाऊस थोडा कमी होतो.

🌏 शेंगा ताेडणी, कापूस वेचणी
दसऱ्याच्या सुमारास उडीद, मूग, बरबटी, चवळीच्या शेंगा तोडणीचं काम सुरू होतं. तेही तसंच. कडधान्य वाचवायला स्वत:च्या शेतात, कडधान्य मिळवायला‌ दुसऱ्याच्या शेतात. त्याच सुमारास पऱ्हाटीची बोंड उमलू लागतात. ‘सीतादेवी’ पूजा झाली की, कापूस वेचणी सुरू. तेव्हा तर पूजेत करतात तसंच आपल्या लेकराला झाडाला बांधलेल्या झोळीत झोपवून माय कापूस वेचत असते. पाठीवरच्या खांदाडीत जितका कापूस जास्त तितका चेहरा जास्त हसरा. हा कापूसच 2-3 वर्षांनी का होईना शेतीच्या गणितात बेरीज करून देतो. एरवी वजाबाकी ठरलेली. कापूस वेचताना पऱ्हाटीच्या फांद्या नख्यांनी कपडे फाटतात, अंगावर ओरखडे येतात. तिकडे दुर्लक्ष करून काम सुरू असतं.

🌏 जिथे जिथे विळा, तिथे तिथे स्त्रिया
पूर्वी विदर्भात ज्वारीचा पेरा भरपूर होत असे. ज्वारी खुडण्याचं काम महिलाच करतात. दिवसभर हात उंचावून खुडताना मान आखडते. बरगडीन् बरगडी दुखते. पण मजुरी आणि ‘वण’ घेताना मिळणारी ज्वारीची कणसं बघितली की, दु:ख कमी होतं. तूर, गहू, हरभरा, वाटाणा सवंगण्याचं‌ काम स्त्रियांचंच. जिथे जिथे विळा चालवायचा ते ते काम स्त्रियांचं. भुईमूग उपडणं, आढी खणून भुईमूग झोडपून शेंगा काढणं. दिवाळीच्या सुमारास तीळ, मटकी सवंगणं, बाजरी खुडणं हेही स्त्रियांच काम.

🌏 इतर कामे
शेतमाल घरी आला की, उन्हात खणखणीत वाळवणं, हेही घरलक्ष्मीचंच काम. शेतात भाजीपाला असेल तर तोडणी – काढणीची कामं स्त्रियांकडेच. धान्य असो की, भाजीपाला, बी बियाणे व्यवस्थित वाळवून सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी स्त्रियांचीच. परसबागेतल्या झाडांची निगा राखायची. घरच्या जनावरांच – गाय, म्हैस, बैल, गोऱ्हे, कालवडी, वगार, टोणगे यांच्या‌ चारा पाण्याचं (विहिरीचं पाणी हंडा पोहऱ्यानी आणून ) काम महिलांचंच. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पिकांच्या‌ पेरणी – काढणीच्या वेळा, पद्धती वेगवेगळ्या असतील, पण सगळ्या कामांत कष्टांचा जास्तीत जास्त वाटा स्त्रियांचाच असतो.

🌏 शेतीतील कष्ट वाया जातात…
आतापर्यंत ही आणि अशी अनेक कामे महिला करत आल्या आहेत. आता मात्र शेतीच्या अर्थकारणामुळे शेतकरी आणि शेतकरणींच्या मानसिकतेत बदल झाला आहे. शेती तोट्याचा व्यवसाय आहे, हे आता सिद्ध झाले आहे. त्याचे‌ सामाजिक दुष्परिणाम आपण सगळे बघत आणि भोगत आहोत. अजूनही शेतकऱ्यांच्या तरुण मुलांच्या मनात कष्टाची‌ भीती नाही. पण हे कष्ट वाया जातात. त्यांचे मोल मिळत नाही. घामाचं दाम‌ मिळत नाही, हे त्यांना पूर्णपणे कळून चुकले आहे. शेतकऱ्याला पोशिंदा, अन्नदाता म्हणून नुसते गौरविणे हा धूर्तपणा‌ वाटतो. गरज नसताना शेतमालाची बेसुमार आयात करून आणि संधी असताना निर्यात बंद करून शेतमालाचे भाव पाडले‌ जातात. शहरी ग्राहकांना तर शेतकऱ्यांच्या कष्टाशी काहीही देणे घेणे नाही. दूध, धान्य, फळे, भाजीपाला वर्षभर स्वस्तात स्वस्त मिळावा, ही या लोकांची‌ इच्छा! त्यांच्या इच्छेसाठी ‘महागाई’ होणार नाही याची काळजी व्यवस्था काटेकोरपणे घेते. टाेमॅटाेची आयात आणि कांद्याची निर्यात बंदी हे‌ उदाहरण अगदी ताजे आहे.

🌏 जय जवान… जय अनुसंधान
दळणवळण, संदेशव्यवस्था, बॅंकिंग क्षेत्र, सेवा, बांधकाम, वैद्यकीय क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र या सगळ्या क्षेत्रात जगातलं नवनवीन तंत्रज्ञान अतिशय तत्परतेने आणलं जातं, लागू केलं जातं. शेतीक्षेत्रात मात्र तंत्रज्ञानाला विशेषत: जैविक तंत्रज्ञानाला बंदी आहे. एचटीबीटी बियाण्यांपासून पिकवलेल्या डाळी, मका, सोयाबीन परदेशातून आयात करून इथे ओतली जातात. पण, आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना ते बियाणं वापरायला बंदी! ते बियाणं आणि त्याला योग्य तणनाशक शेतकऱ्यांना सहज मिळालं तर 75 वर्षेच काय पिढ्यान् पिढ्या, निंदणाच्या कष्टात आयुष्य घालवणाऱ्या स्त्रियांचे कष्ट थोडे तरी कमी होतील. तणनाशकाने तण, गवत तिथल्यातिथे मुरून मरून जाते. त्यामुळे जमिनीचा कस वाढतो. हा अनेकांचा अनुभव आहे. जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान ही घोषणा नुसती अनुप्रास म्हणून नव्हे, तर प्रत्यक्ष कार्यान्वित झाली पाहिजे.

🌏 आर्थिक अस्पृश्यता
शेतमालाची बाजारपेठही खुली हवी. त्यात ‘व्यवस्थे’चा हस्तक्षेप नको. बाजारपेठ मागणी आणि पुरवठा या तत्वावर चालते. खुल्या बाजाराच्या भावातल्या मंदी आणि तेजीचे चढ उतार शेतकरी सहज स्वीकारेल. पण भाव पाडण्याचं धोरण शेतकरी आता सहन करू शकत नाही. शेती उद्ध्वस्त झाल्यामुळे अनेकानेक शेतकरी कुटुंबासह शहरात दाखल होत आहेत. अशा स्थलांतरात सगळ्यात अनिश्चितता येते ती शेतकरी महिलांच्या बाबतीत. तरीही त्या‌ आपले शेतीतले महत्त्वाचे स्थान सोडून शहरात अगदी झोपडपट्टीत रहावे‌ लागले तरी राहात आहेत. नोकरी मिळत नाही म्हणून नाईलाजाने आणि क्वचित आव्हान समजून शेती करणारे तरुण आहेतही. पण त्यांचे लग्न होत नाही, ही विचित्र आणि भयंकर सामाजिक‌ समस्या आहे. शेती करणाऱ्या मुलाशी लग्न ठरलं तर शेतकऱ्यांच्याच मुली जीव द्यायला निघतात. शेतकरी आर्थिक अस्पृश्य ठरला आहे. ही आर्थिक अस्पृश्यता दूर करायची असेल तर अनुदाने वाटून श्रमशक्ती पांगळी करण्यापेक्षा बियाण्यांपासून बाजारपेठेपर्यंतची बंदी उठवून, शेतकऱ्यांना उमेद देणे योग्य ठरेल. शेतीत स्वत:चे‌ स्थान जबाबदारीने कष्टपूर्वक टिकवून‌ ठेवणाऱ्या‌ महिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून निर्णय घेणे योग्य ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!