Dr. M. S. Swaminathan : डाॅ. एम. एस. स्वामीनाथन : शेती व शेतकरी हितचिंतक
1 min readडॉ. स्वामीनाथन यांच्या कार्याचा प्रारंभ कसा झाला, याबद्दल श्री कुमार केतकर यांनी श्री अतुल देऊळगावकर यांनी डॉ. स्वामीनाथन यांच्या जीवनावर लिहिलेल्या पुस्तकासाठीच्या प्रस्तावनेत जे लिहिले आहे, ते इथे देत आहे. ‘स्वातंत्र्य प्राप्तीनंतर महिनाभराने स्वामीनाथन जुन्या दिलीत येऊन पोचले. अतुल देऊळगावकरने स्वामीनाथन यांच्या मन:स्थितीचे त्या वेळचे वर्णन करताना म्हटले आहे, रेल्वे प्लॅटफॉर्मवर फाळणीनंतरची हिंस्त्रता वाहत होती. आप्तांना डोळ्यादेखत कापते जाताना पाहून थिजलेली मने आणि गोठलेले डोळे भारताकडे येत होते, तर काही भारतातून जायची शिकस्त करीत होते. अंगावरच्या कपड्यानिशी आलेले निर्वासित कमालीच्या भेदरलेल्या अवस्थेत दाटीवाटीने बसले होते. स्वामीनाथन यांना हिंदीचा गंध नव्हता. इंग्रजी जाणणारा माणूस गाठून त्यांची माहिती घेतली.दिल्लीत हिंसाचाराची आग उसळली होती. रात्र प्लॅटफार्मवरच टक्क जागून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सुन स्वामीनाथन टांग्याने पुसा शेती संस्थेकडे निघाले. मृतांच्या नातेवाइकांचे हंबरडे जखमींच्या वेदना थरकाप उडवत होत्या. स्वातंत्र्याची वही,’रक्तानं’ माखवणाऱ्यांबद्दल स्वामीनाथन यांच्या मनात तिडीक निर्माण झाली. वाहत्या रक्ताची किळस भरली, ती आयुष्यभर राहिली. पुढील आयुष्यात स्वामीनाथन कधीही रक्त पाहू शकते नाहीत.
हिसेंतून अहिंसा जन्माला आली आणि भुकेतून अन्नधान्याच्या अर्थशास्त्राची जाण. दुष्काळामुळे शेतीप्रश्नाचे भान आले आणि आजूबाजूचे अज्ञान पाहून मनात प्रकटले आधुनिक विज्ञान. या आधुनिक विज्ञानाचा उपयोग भारताला अमेरिकेच्या PL-480 च्या मदतीतून मुक्त करण्यासाठी यशस्वीपणे स्वामीनाथनजी यांनी केली. म्हणूनच त्यांना हरित क्रांतीचा प्रणेता Father – of Green Revolution ही पदवी देण्यात आली. त्यांना त्यांच्या कार्यासाठी जगातील अनेक महत्त्वाची पारितोषिके मिळाली आहेत. भारत सरकारचे, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या पदव्या मिळाल्या आहेत. माझ्या मते, त्यांना शांतीचे नाेबेल पारितोषिक मिळाले नाही ही माझी खंत आहे.
माझा त्यांचा परिचय 2005 सालीच झाला. मी सन 1970 पासून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतो आहे. हरित क्रांतीमुळे शेती उत्पादन (Production) वाढले. पण शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढाला हा मुद्दा मी मांडत होतो. हाच मुद्दा मी 2005 साली जेव्हा शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणून प्रो. स्वामीनाथनजी वर्धा जिल्ह्याच्या दाैऱ्यावर आले, तेव्हा त्यांच्या समोर मांडण्याची संधी मिळाली. मी माझ्या गावात वायफड, जिल्हा वर्धा इथे एक छोटी शेतकऱ्यांची सभा प्रो. स्वामीनाथनजी यांच्यासाठी आयोजित केली होती. त्या सभेत स्वामीनाथनजी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे पण दिलीत. देशातील व विदर्भातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या वाढत्या घटनांमुळे ते फार व्यथीत होते. सन 1990 नंतरच्या तथाकथीत मुक्त अर्थव्यवस्थेमुळे शेती आणि बिगर शेती क्षेत्रातील आर्थिक अंतर वाढत आहे, हे त्यांना जाणवत होते. ही दरी कमी करायची असेल तर ग्रामीण भागात पैशाचा प्रवाह वाढवावा लागेल. फक्त शेतमालाचे उत्पादन वाढवून समानता येणार नाही तर वाढलेल्या उत्पदनामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे. शेतमजुरांची मंजुरीही वाढली पाहिजे.याबद्दल त्यांचे विचार स्पष्ट होते. म्हणूनच त्यांच्या शेतकरी आयोगाच्या अहवालात स्पष्टपणे अशी शिफारस केली आहे की, शेतकऱ्यांना शेतीमालाचे हमीभाव वाढवून देण्यात आले. कृषी मूल्य व खर्च आयोगाने सर्व खर्चावर 50 टक्के नफा जोडून हमीभाव जाहीर करावे व ते बाजारात मिळतील, अशी व्यवस्था सरकारने करावी. शेतमजुरांची कमीतकमी मजुरी ही शहरी संगठीत वर्गाच्या कमीतकमी वेतनाशी जोडलेली असावी.
या मांडणीबद्दल मी त्यांना सरळ प्रश्न विचारला की, तुम्ही हरित क्रांतीचा प्रचार करताना एकरी उत्पादन वाढविण्याचे उपदेश शेतकऱ्यांना करीत होता व आता शेतकऱ्यांना योग्य नफेशिर किंमत मिळाली पाहिजे, असे म्हणता. हा विरोधभास नाही का? त्यांनी सेकंदाचाही वेळ न घेता उत्तर दिले, ‘त्या वेळेस मी देशाचा विचार करीत होतो. आपला देश अमेरिकेच्या मदतीवर (PL-480) जगत होता. Ship to mouth अशी परिस्थिती होती. अन्नधान्याच्या गुलामीतून मुक्तीसाठी उत्पादन वाढविण्याची गरज होती. आज मी अध्यक्ष आहे शेतकरी आयोगाचा! कृषी आयोगाचा नाही. शेतकऱ्यांनी उत्पादन वाढविले व वाढलेल्या उत्पादनाने त्यांचा नफा वाढला नाही तर त्या वाढीव उत्पादनाचा त्यांना काय लाभ?’ म्हणूनच ते म्हणतात, शेतीचा विकास किती उत्पादन वाढले यांनी न माेजता शेतकऱ्यांचे उत्पन्न किती वाढले, यानी मोजले पाहिजे.
मी त्यांच्या समोर बोलताना त्यांना असं म्हणालो की, घटनेप्रमाणे शेती हा राज्याचा विषय आहे. पण शेती संबंधातले सर्व महत्त्वाचे निर्णय केंद्राच्या हातात आहे. उदाहरणार्थ, M.S.P. आयात-निर्यात धोरण, WTO., पतपुरवठा, मुद्रानीती इत्यादी. त्यांनी त्यांच्या अहवालात शेती हा विषय सर्वसमावेशक सूचित असावा (concurrent List) अशी शिफारस केली आहे, डॉ. स्वामीनाथन व पी. साईनाथ यांच्या मुळेच पूर्व प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंगजी वायफडला आले होते. डॉ. मनमोहन सिंगजींनी 2008-09 च्या सुमारास जाहीर केलेली (1) कर्जमुक्ती, (2) रोजगार हमी योजना, (3) हमी भावातील (M.SP) 28 ते 50 टक्के वाढ या निर्णयात डॉ. स्वामीनाथनजी यांच्या शेतकरी आयोगाच्या अहवालाचा प्रभाव होता, हे नाकारता येणार नाही. पण सन 2009 नंतर युपीए-2 (UPA-2)च्या सरकारने ते सातत्य टिकविले नाही. सन 2014 नंतरच्या मोदीजींच्या सरकार ने 50 टक्के नफा जोडून भाव देण्याची घोषणा केली. पण, ती A2+Fl वर केली. डॉ. स्वामीनाथनजींची शिफारस C2+50 टक्केची आहे. ही व्यथा त्यांनी व्यक्तही केली आहे.
माणसाला माणसासारखं जगण्याचा अधिकार देणारी राजकीय, आर्थिक, सामाजिक व्यवस्था निर्माण व्हावी, हीच त्यांची इच्छा होती. ती पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी कार्य करावे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.