krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Tamarind tree : महाकाय वृक्ष… चिंच!

1 min read
Tamarind tree : चिंच (Tamarind) हे नाव कानावर पडले की, प्रत्येकाच्या जिभेवर पाणी येते. आपले मन लगेच भूतकाळात संचार करू लागते. शेकडो आठवणी मन पटलावरती तरळू लागतात. लहानपणी प्रत्येकाला आंबट खाण्याची भारी हौस असते. यामुळे प्रत्येकाचा भूतकाळ चिंचेच्या आठवणींनी भरलेला असतो. आमच्या लहानपणी देखील आम्हाला चिंच खाण्याची भारी हौस होती. माझ्या शेतामध्ये एक महाकाय असे चिंचेचं झाडं होतं. ते आजही आहे. चिंच या झाडामध्ये अनेक प्रकारच्या जाती होत्या. काही आंबट, गोड. आमच्या गावात ओढ्याच्या बाजूला गुलाबी रंगाच्या चिंचेचे झाड होते. आम्हाला त्या चिंचाचे भारी आकर्षण होते. त्या भागातील काही मुले त्या चिंचा आणून शाळेत विकत असत. मी अनेक वेळा शाळा दुपारी सुटली की, तिकडे जाऊन चिंचा आणत असे.

🌳 चिंचेचे झाड अन् भूत
चिंच सर्वांना आवडत असल्यामुळे मुले सारखी झाडाकडे जात असत. यावेळी गावामध्ये चिंचेवरती भुतं राहतात. वेताळ व त्याची बायको हडळ, त्यांची मुले मुंज्या, खविस राहतात, अशी भीती घरचे आणि इतर माणसे घालत असतं. गावामध्ये स्मशानभूमीत आणि ओढ्याच्या कडेला महाकाय अशी चिंचेचे झाडे होती. ती आजही आहेत. त्या झाडांखाली शेंदूर लावलेले अनेक देवता होत्या. त्यांना मावलाया असे नाव असे. यामुळे यांचीही भीती घातली जाई. तरीही आम्हाला चिंच खाण्याचा मोह आवरत नसे. भीत भीत आम्ही झाडाकडे जायचोच. मनामध्ये भीती असल्यामुळे मुलांना कधी कधी तिथे पांढरी साडी घातलेली बाई, उलट्या पायाची माणसे, झाडावरून खाली हात पुरणारे मुले दिसत असतं आणि गायब होत असत. आज त्या गोड आठवणी जाग्या झाल्या की, हसायला येते.

हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी
दिसशी तू, दिसशी तू, नवतरुणी काश्मिरी!

🌳 चिंचेच्या झाडांची व्याप्ती
चिंच हा अमर्यादित आयुष्यमान लाभलेला, महाकाय विस्तार होणारा वृक्ष आहे. हा वृक्ष भारतात सगळीकडे पहायला मिळतो. महाराष्ट्रातही तो सगळीकडे आढळतो. विदर्भामध्ये जंगलात मोठ्या प्रमाणावर चिंचेचे जंगले आहेत. मेळघाट परिसरात सगळीकडे हा वृक्ष विपुल प्रमाणात आहेत. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर चिंचेची झाडे पहायला मिळतात. पश्चिम महाराष्ट्रात चिंचेचे प्रमाण कमी आहे. 200 ते 300 वर्षे वय असलेले अनेक चिंचेची झाडे आपल्याला ग्रामीण भागात पहायला मिळतात.

🌳 चिंचेचे अर्थशास्त्र
चिंच हे झाड शेतकऱ्यांना आर्थिक फायदा देणारे आहे. यामुळे आजही शेतकऱ्यांनी जुनी झाडे जोपासलेली आहेत. या झाडावरती कोणतेही रोग अथवा कीड जात नाहीत. त्यामळे चिंचेचा उत्पादन कोणताही खर्च नाही. बाजारात चिंचेला प्रचंड मागणी आहे. शेतकऱ्याला 10 वर्षांचे झाड किमान 10,000 रुपये वार्षिक उत्पन्न देते. चिंचा झाडावरून काढण्यासाठी अनेक व्यावसायिक काम करतात. त्यानंतर चिंच फोडण्यासाठी अनेक मजुरांना 3-4 महिने रोजगार मिळतो. याचे निघणारे टरफले विटभट्टी उद्योगासाठी, चिंचुके वस्त्राेद्योग, फटाके उद्योग, चिंचा प्रक्रिया उद्योगासाठी वापरल्या जातात. चिंचा साठविण्यासाठी दक्षिण भारतात मोठमोठी शीतगृहे निर्माण केलेली आहेत. या उद्योगातून महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी 5,000 कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल होते.

🌳 पर्यावरणीय महत्त्व
चिंच हा सदाहरित आणि महाकाय वृक्ष आहे. याचा विस्तार जेवढा जमिनीच्या वरती असतो, तेवढाच जमिनीच्या खाली असतो. याच्या मुळ्या खूप खोलवर जातात. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत खोलवर नेण्याचे कार्य या मुळ्या करतात. यातून भूजल साठा वाढण्यास मदत होते. मे, जूनमध्ये या झाडाला नवती व फुलोरा येतो. यावेळी असंख्य मधमाश्या, कीटक, फुलपाखरे येथे येतात. त्यामुळं परागीभवन होऊन हवा शुद्ध राहते. चिंचेचे झाड अनेक पक्ष्यांचे वस्तीस्थान आहे. पोपटाचे खूप आवडीचे झाड आहे. पावश्या, चिमणी, घुबड, पिंगळा, सुतारपक्षी, कावळा व इतर अनेक पक्षी यावर घरटी बांधून राहतात. हे झाड मोठ्या प्रमाणात कार्बन शोषून घेते व ऑक्सिजन सोडते. हे झाड जलसंधारण, मृदासंधरण तसेच पावसाला आकर्षित करणारे आहे.

🌳 आयुर्वेदिक उपयोग
चिंचेमध्ये अनेक प्रकारची फायटो-केमिकल संयुगे आढळतात. चिंचेमध्ये सामान्यतः टॅनिक ॲसिड, ससिनिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, टायट्रिक ॲसिड आणि पेक्टिन असते. त्याचा जादुई प्रभाव निर्माण करण्यासाठी फायटोकेमिकल्स आणि त्यातील पोषक घटक एकत्र काम करतात. चिंचेमध्ये आढळणारे तांबे, जस्त, मॅंगनीज, सेलेनियम आणि लोह यासारखी खनिजे शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढण्यासाठी प्रतिकार शक्ती देतात. भूक वाढवणारी, पित्ताशयाच्या तक्रारींवर उपयुक्त असणारी चिंच ताप, घसादुखी, सूज, उष्माघात या व्याधींवरही उपयोगी पडते. आतड्यातला मळ पुढे सरकण्यासाठी चिंचेपासून केलेलं औषध वापरतात. चिंचेची पानं, फुलंही आंबटसर असतात. चिंचेत टार्टरिक अ‍ॅसिड आहे. यात जीवनसत्त्व ‘अ’ आणि ‘क’ असून, कॉपर, पोटॅशियम, आयर्न आणि कॅल्शियमही आहे. चिंचेच्या पानांचं पोटीस सुजलेल्या सांध्यांवर लावतात. पानं वाटून भाजलेल्या जखमेवर लावतात. अनेक व्याधींवर चिंच उपयोगी आहेत.

🌳 मानवी आहारातील महत्त्व
आंबट-गोड चिंचेचा वापर चटणी व सॉस तयार करण्यासाठी केला जातो. इतकंच नव्हे तर, दाक्षिणात्य पद्धतीची डाळ (वरण) बनविताना किंवा ठराविक मिठाईचे पदार्थ बनवितानाही चिंचेचा वापर केला जातो. चिंचेच्या वापराने पदार्थाला एक वेगळीच चव प्राप्त होते. दैनंदिन खाद्यपदार्थात चिंचेचा वापर केल्यास त्याचे आरोग्यालाही अनेक फायदे आहेत. चिंचेमधील अनेक पौष्टिक घटक हे आरोग्याच्या अनेक समस्यांपासून संरक्षण करतात.

🌳 झाडाविषयी गैरसमज व अफवा
आधुनिक काळामध्ये चिंचेचा वसवा होतो. या कारणांमुळे असंख्य महाकाय झाडे तोडली गेली आहेत आणि वेगाने आजही तोडली जात आहेत. घराजवळ झाड असेल तर ते घर पाडते, हा एक गैरसमज आहे. या झाडावर भुते राहतात, या कारणांमुळे ही अनेक झाडे तोडली जात आहेत. वरील या सर्व अफवा आहेत, याला कोणीही बळी पडू नये.

🌳 चिंच संगोपन
आजच्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर हजारो एकर जमिन पडिक आहे. या पडिक जमिनीवर चिंचेच्या झाडांची लागवड झाली तर त्या जनिमीचा उपयोग होईल व शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल. यासाठी मागील तीन वर्षांमध्ये नागर फाऊंडेशनच्या माध्यमातुन 3,000 पेक्षा जास्त चिंचेची झाडे रवळगावमध्ये लावली आहेत. त्यांचे यशस्वी संगोपन सुरू आहे. संपूर्ण राज्यात जास्तीत जास्त चिंच लागवड होण्यासाठी, प्रचार, प्रसार, जाणीव, जागृती, प्रबोधन यासाठी विवीध कार्यक्रम, लेखन आपण करत आहोत. सर्वांना आवाहन आहे की, पडिक जमीन, जमिनीच्या बांधावर, घराच्या अंगणात, गावांतील सार्वजनिक जागेवर, मंदिरे, गायरान, जंगलाची जमीन या ठिकाणी मोठया प्रमाणावर चिंच लागवड करावी.

2 thoughts on “Tamarind tree : महाकाय वृक्ष… चिंच!

  1. खूप खूप आभार, माझ्या घाराजवळ पंजोबानी लावलेले झाड आहे, त्याबाबतचे गैर समज मिटले, झाड वाचले, त्याचा फायदा, नेहमीच सावली, भरपूर पक्षी, चिवचिवाट, किलबिलाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!