Pests Management of cotton crop : कपाशीवरील महत्त्वाच्या किडींचे व्यवस्थापन कसे करायचे?
1 min read🔆 कपाशी पिकामध्ये विविध रस शोषण करणाऱ्या किडी संदर्भात वेळोवेळी सर्वेक्षण करा. यात मावा, तुडतुडे व फुलकिडे या सर्व किडी एकत्रित सरासरी संख्या 10 प्रतिपान किंवा त्यापेक्षा जास्त संख्या आढळल्यास आवश्यकतेनुसार तसेच या किडी पिकाच्या आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडत असेल तर एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा घटक म्हणून खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी.
❇️ बुफ्रोफेजिन 25 टक्के प्रवाही 20 मिलि अधिक 10 लिटर पाणी
❇️ फिप्रोनिल पाच टक्के प्रवाही 30 मिलि अधिक 10 लिटर पाणी
❇️ इमिडाक्लोप्रीड 17.8 टक्के प्रवाही 2.5 मिलि अधिक 10 लिटर पाणी
या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची गरजेनुसार वर निर्देशित किडींची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असेल तरच फवारणी करावी.
🔆 कपाशीवरील पांढऱ्या माशी संदर्भात वेळोवेळी सर्वेक्षण करा. पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 25 म्हणजेच एकरी 10 पिवळे चिकट सापळे पिकाच्या समकक्ष उंचीवर लावा. सर्वेक्षणामध्ये सरासरी 8 ते 10 प्रौढ पांढऱ्या माशा किंवा 20 पिल्ले प्रतिपान आढळून आल्यास आवश्यकतेनुसार एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा घटक म्हणून इतर उपाय योजनेबरोबर आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असेल तर खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची गरजेनुसार फवारणी करू शकता.
❇️ फ्लोनिकामिड 50 टक्के डब्ल्यूजी 3 ग्राम अधिक 10 लिटर पाणी
❇️ स्पायरोमेसीफेन 22.9 टक्के एससी 12 मिलि अधिक 10 लिटर पाणी
यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची पांढऱ्या माशी करता आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन गरजेनुसार फवारणी करावी.
🔆 कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या (Pink bollworm)व्यवस्थापनासाठी हेक्टरी पाच म्हणजेच एकरी दोन कामगंध सापळे गॉसिलूर या कामगंध गोळीसह कपाशीच्या पिकात लावावे. या कामगंध सापळ्यांमध्ये सतत दोन ते तीन दिवस सरासरी आठ ते दहा गुलाबी बोंडअळीचे नर पतंग सापळ्यात आढळून आल्यास मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचे पतंग सापळ्यात अडकवून गुलाबी बोंडअळीचे पुढच्या पिढीचे प्रजनन थांबवण्याकरिता म्हणजेच मास ट्रॅपिंग हेक्टरी 15 ते 20 म्हणजेच एकरी सहा ते आठ कामगंध सापळे कपाशीच्या शेतात लावावे.
🔆 कपाशीच्या शेतामध्ये डोमकळ्या म्हणजेच गुलाबाच्या न उमललेल्या कळीप्रमाणे फुले आढळून आल्यास, अशा कपाशीच्या शेतामधील डोमकळ्या शोधून अळीसह अशा डोमकळ्यांचा नाश करावा. सुरुवातीच्या अवस्थेत 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा Azadirectin 3000 पीपीएम 40 मिलि अधिक 10
लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.
🔆 कपाशीच्या पिकात नत्रयुक्त खताचा व संजीवकाचा अतिरिक्त, अवाजवी व अशीफारशीत वापर टाळावा.
🔆 पीक उगवणीनंतर 50 ते 60 दिवसांनी ट्रायकोग्रामा चिलोणीस किंवा ट्रायकोग्रामा बॅक्टरी या मित्र कीटकाची हेक्टरी 1.5 लाख अंडी प्रती हेक्टर या प्रमाणात दर 12 ते 15 दिवसांच्या अंतराने कपाशी शेतामध्ये पानाच्या मागच्या बाजूने टाचून लावावी.
🔆 कपाशीवरील गुलाबी बोंडअळी संदर्भात आठवड्यात एकदा प्रति एकर साधारणत: 20 प्रतिनिधी कपाशीची झाडे निवडून या झाडावरील पात्या, फुले, बोंडं याची नोंद घेऊन गुलाबी बोंडअळीग्रस्त पात्या फुलवून यांची संख्या नोंदवावी. याची सरासरी काढून गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव पाच टक्क्यांपेक्षा जास्त आढळून आल्यास कपाशीचे झाडे निवडून 5 ते 10 टक्क्यांच्या दरम्यान प्रादुर्भाव आढळून आल्यास प्रोफेनोफोस 50 टक्के प्रवाही 30 मिलि किंवा Indoxicarb 15.8 प्रवाही 10 मिलि अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी.
🔆 ज्या ठिकाणी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव 10 टक्क्यांच्या वर आढळून आला असेल, अशा ठिकाणी Chlorantraniliprole 9.3 टक्के + Lambda Cylohathrine 4.6 टक्के या मिश्र कीटकनाशकाची 5 मिली किंवा Indoxicarb 14.5 टक्के + Acetamapride 7.7 टक्के 10 मिलि अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची आवश्यकतेनुसार फवारणी करावी.
🟢 टीप :-
❇️ कोणतीही रसायने फवारण्यापूर्वी लेबल क्लेम शिफारशीचा संदर्भ घेऊन लेबल क्लेम शिफारशी प्रमाणेच रसायने फवारणी करावी.
❇️ रसायने फवारणी करताना सुरक्षित कीडनाशक फवारणी तंत्राचा अंगीकार करावा.
❇️ अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करून फवारणी टाळावी व प्रमाण पाळावे.
❇️ रसायने वापरण्यापूर्वी प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य निदान करून लेबल क्लेम शिफारशीप्रमाणेच वापरणे गरजेचे आहे.
🟢 संदर्भ :- डॉ. डी. बी. उंदिरवाडे, विभाग प्रमुख, कीटकशास्त्र विभाग, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, यांची 29 सप्टेंबर 2023 ला कृषी विस्तारासाठी शेतकरी हितामध्ये प्रसारित केलेली प्रेस नोट.