krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Onion trader Andolan : कांदा व्यापाऱ्यांच्या मागण्यांना स्वभापाचा पाठिंबा

1 min read
Onion trader Andolan : केंद्र सरकारने कांदा (Onion) निर्यातीवर (Export) लादलेले निर्यात शुल्क (Export duty) हटवावे व बाजार समिती कर कमी (Market Committee Tax) करावा या कांदा व्यापाऱ्यांच्या मागणीला स्वतंत्र भारत पार्टीचा जाहीर पाठिंबा आहे. व्यापाऱ्यांनी बाजार समित्यांमध्ये बहिष्कार टाकून बाजार समिती बाहेरच कांदा खरेदी सुरू केल्यास शेतकरी त्यांना सहकार्य करतील, अशी माहिती स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली आहे.

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी गेल्या आठ दिवसांपासून कांदा खरेदी बंद ठेऊन आंदोलन (Andolan) सुरू केले आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करावे, कृषी उत्पन्न बाजार समिती कर एक टक्क्याऐवजी अर्धा टक्का घेण्यात यावा, नाफेड (National Agricultural Cooperative Marketing Federation of India Ltd.)मार्फत खरेदी केलेला कांदा भारतातील बाजारपेठेत विकू नये, या प्रमुख मागण्या व्यापाऱ्यांसाेबतच शेतकऱ्यांच्या ही हिताच्या आहेत. म्हणून स्वतंत्र भारत पार्टी या मागण्यांना जाहीर पाठिंबा देत आहे.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क आकारल्यामुळे कांद्याची निर्यात जवळ जवळ बंद झाली आहे. अंतरराष्ट्रीय बाजारात कांदा विकण्यासाठी शेतकऱ्यांकडून 40 टक्के कमी दराने कांदा खरेदी करावा लागत आहे. नाफेड मार्फत खरेदी केलेला कांदा परराज्यातील बाजारापेठेत कमी दराने विकला जात असल्यामुळे व्यापाऱ्यांनी जास्त दराने खरेदी केलेला कांदा त्यांना कमी दरात विकावा लागत आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन होऊन अनेक वर्ष झाली आहेत. त्यांच्या विकासकामांना फारसा वाव नाही. तरीही एक टक्का बाजार समिती कर व पाच पैसे पणन विभागाला व्यापारी देत असतात. हा कर शेतीमालाला तितका कमी दर देऊनच वसूल केला जातो. इतका कर आता बाजार समित्यांना देण्याची गरज नाही. हा कर घटवून अर्धा टक्का करावा, ही व्यापाऱ्ंयाची मागणी योग्य आहे. शेवटी हा कर शेतकऱ्यांकडूनच वसूल केला जातो. तो कमी केल्यास शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे जास्त पडतील, असेही अनिल घनवट यांनी सांगितले.

सर्व महाराष्ट्रातील बाजार समित्यांकडून शासनाच्या पणन विभागाला दरवर्षी कोट्यवधी रुपये जमा होतात. याचे पुढे काय होते माहिती नाही. पणन विभाग बाजार समित्यांना कोणतीही सुविधा किंवा सेवा पुरवित नाही. मग, इतकी मोठी रक्कम कशासाठी वसूल केली जाते? असा प्रश्न अनिल घनवट यांनी उपस्थित केला. नाशिक जिल्ह्यात कांदा खरेदी करताना दोन किलो कटती (घट किंवा काट) कापली जात नाही. राज्यातील इतर बाजार समित्यांमध्ये मात्र दोन किलो प्रति क्विंटल कटती घेतली जाते. म्हणून नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांना सुद्धा काटती घेण्याची परवानगी असावी, अशी एक मागणी आहे. ही मागणी मात्र बेकायदेशर आहे. या उलट इतर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये घेतली जाणारी कटती बंद करण्यात यावी, अशी व्यापाऱ्यांची मागणी असायला हवी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

व्यापाऱ्यांच्या या मागण्या शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पार्टीने या पूर्वीच सरकारकडे मांडल्या आहेत. जर सरकार व बाजार समित्या मागण्या मान्य करण्यास तयार नसतील तर व्यापाऱ्यांनी बाजार समित्यांवर बहिष्कार टाकावा व थेट शेतकऱ्यांच्या शेतातून कांदा खरेदी करावा. कांदा नियमन मुक्त असल्यामुळे कुठेही खरेदी विक्री केली जाऊ शकते व कसल्याही प्रकारची फी देण्याची आवश्यकता नाही. याला हमाल माथाडी कायदा सुद्धा लागू होणार नाही. असे केल्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतील व व्यापाऱ्यांना बाजार समिती कायदा आणि हमाल मापाडी कायद्यातून सुटका होईल. व्यापाऱ्यांची तयारी असल्यास शेतकऱ्यांनी रोख पैसे घेऊन व्यापाऱ्यांना कांदा विकून आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, अनिल घनवट यांनी केले आहे. स्वतंत्र भारत पार्टीच्यावतीने या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांना पाठविले आहे. या निवेदनावर स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा सीमा नरोडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!