Rain forecast : सध्या मध्यम ते मुसळधार पाऊस तर तीन दिवसानंतर उघडीपी
1 min read✳️ रब्बी पिकांसाठी महत्त्वाचा पाऊस
सध्या 25 सप्टेंबरपासून होत असलेला पाऊस हा रब्बी हंगामातील दुसऱ्या आवर्तनाचा पाऊस आहे. या हंगामाच्या तिसऱ्या आवर्तनात किरकोळ पाऊस संभवताे.येत्या 9 ते 13 ऑक्टोबर दरम्यान पुणे, अहमदनगर व उत्तर सातारा या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रासाठी 5 ते 10 ऑक्टोबर असा सरासरी पाच दिवसांचा परतीच्या पावसाचा कालावधी असला तरी ‘परतीचा पाऊस’ या नावाखाली तो होतोच असे नाही. त्याअगोदर व नंतरही होणारा पाऊस महत्त्वाचा समजावा, असेही त्यांनी सांगितले.
✳️ परतीचा पाऊस
25 सप्टेंबरला राजस्थानमधून परतलेला नैऋत्य मान्सून अजून जागेवरच स्थिर आहे. या पाच दिवसात त्याने माघारीची विशेष प्रगती दाखवली नाही. वायव्य भारतात त्याच्या परतीसाठी सध्या वातावरण अनुकूल आहे. येत्या तीन दिवसात कदाचित तेथून मान्सून माघारी फिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर भारतातील पर्यटनासाठी सध्याचा काळ उत्तम असू शकतो.
✳️ नवीन कमी दाबाचे क्षेत्र
शुक्रवारी (दि. 29 सप्टेंबर) बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाब क्षेत्र तयार झाले आहे. ‘एमजेओ’ (Madden-Julian Oscillation) सध्या भारत सागरीय क्षेत्रातच असून त्याचा आम्प्लिटुडे 1 पेक्षा अधिक असल्याने नवीन निर्मित कमी दाब क्षेत्राला त्याची मदत होवू शकते. पण, एमजेओ 2 ऑक्टोबरनंतर मात्र भारत सागरी व भूभाग परिक्षेत्राच्या बाहेर पडत असल्याने त्याचे पुढे मार्गक्रमण होत आहे. सध्या एल निनो (El Nino) सक्रीय असून, पुढील काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. शिवाय, आयओडी (Indian Ocean Dipole) नुकताच धन अवस्थेकडे झुकू लागला आहे, अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली.
✳️ शेतीच्या कामाविषयी सल्ला
मंगळवार (दि. 3 ऑक्टाेबर) पासून पावसाच्या उघडीपीची शक्यता विचारात घेता द्राक्षेबाग छाटणी, उन्हाळ कांदा रोपं टाकणी, उर्वरित शिल्लक लाल कांदा लागवड तसेच रब्बी ज्वारी, हरबरा आदी पिकांची पेरणी करावयास हरकत नाही. अर्थात याबाबतचा निर्णय शेतकऱ्यांनी स्वतःच्या विवेकाच्या कसोटीवर घ्यावा. कारण, रब्बीच्या तिसऱ्या आवर्तनातील किरकोळ पाऊस 9 ते 13 ऑक्टोबर दरम्यान पुणे, अहमदनगर व उत्तर सातारा जिल्ह्यात होवू शकतो. इतरत्र ढगाळ वातावरण राहू शकते, असा अंदाजही हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.