krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Debt Recovery : सक्तीची कर्जवसुली; सरकारी ठगांचा बंदोबस्त!

1 min read
Debt Recovery : हे वाचताना एखाद्याला अतिशयोक्ती वाटेलही; पण सक्तीची वसुली करताना वसुली अधिकारी शेतकर्‍यांना 'तुझी बायको गहाण ठेव', 'तुझी मुलगी रातच्याला पाठव', पण आमची वसुली दे, या भाषेत बोलायचे. शरद जोशींनी इतिहासात पहिल्यांदाच सन 1980 च्या दशकात 'कर्जवसुली (Debt Recovery) अधिकार्‍यांविरुद्ध गावबंदी' जाहीर केली आणि शेतकरीपुत्रांनी गावागावात या जुलमी वसुलीचा, प्रसंगी पोलिसांच्या लाठ्या खाऊन व तुरुंगाची हवा खाऊन या प्रकाराचा प्रतिकार केला.

बँकांची सक्तीची कर्जवसुली हा प्रकार तर सन 1995 पर्यंत सुरू होता. सक्तीची वसुली म्हणजे एखाद्या शेतकर्‍यावर एखाद्या बँकेचे जर 50 हजार रुपये कर्ज असेल तर वसुली अधिकारी त्या शेतकर्‍याच्या घरात घुसून त्याच्या घरातली स्वयंपाकाची भांडी, पलंग, पाचपन्नास किलो अन्नधान्य जप्त करायचे. या वस्तूंची एकूण किंमत दोन-चारशेच असायची. पण या वस्तू जप्त करून त्याचे चावडीवर प्रदर्शन मांडून त्या शेतकर्‍याची पुरेपूर नाचक्की करणे, हा त्यामागचा हेतू असायचा. सक्तीचा वसुलीने आजपर्यंत हजारो शेतकऱ्यांचा अब्रूचे धिंडवडे काढून त्यांना समाजात अपमानीत केले होते. सक्तीची वसुली व अपमानाच्या धास्तीने ने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल टाकत स्वतःला संपवले.

स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी शेतसारा न भरल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जप्त केल्या होत्या. त्याविरोधात महात्मा गांधीजींनी आंदोलनाचे हत्यार उपसत चंपारण्यातील शेतकऱ्यांचा समर्थनात सत्याग्रह केला आणि सक्तीच्या वसुलीचा बंदोबस्त केला. स्वातंत्र्यानंतर इंग्रज गेले पण व्यवस्था शेतकऱ्यांचा शोषणावरच कायम उभी टाकली. शेतकऱ्यांना सक्तीची लेव्ही लावत बेकायदेशीररित्या सक्तीच्या वसुलीने शेतजमीन लिलाव व्हायला लागले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच शरद जोशीचा नेतृत्वात या जुलमी वसुलीचा शेतकरीपुत्रांनी प्रतिकार केला. निळ्या जिन्स पॅन्टातला गांधी (Gandhi in denim) शेतकऱ्यांचा योद्धा बनला.

🎯 सरकारी ठगांचा बंदोबस्त
दि.18 नोव्हेंबर 1994, कळगाव, ता. उमरी, जिल्हा नांदेड.
तो काळाच धामधूमीचा होता. एका बाजूला सरकारने राबवलेल्या अनेकानेक शेतकरीविरोधी कायद्यांनी शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडून त्यांना देशोधडीला लावले असताना दुसऱ्या बाजूला सरकारी ठगांनीही यात कसलीच कसर कमी पडू दिली नाही. सरकारी ठगांनी शेतकऱ्यांचा बेकायदेशीररित्या वसुलीने केलेला छळ आता चव्हाट्यावर आला होता. शरद जोशींनी सुरू केलेल्या पुढारी आणि वसुली अधिकऱ्यांचा गावाबंदीने आता महाराष्ट्र पेटला होता. गावाबंदीचे लोन आता कामनगावातही धडकले होते.

कळगावातील शेतकरी तुकाराम केवळा चव्हाण पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेऊन गावी सहकुटुंब परतला होता. गावात वसुली अधिकाऱ्यांनी बेकायदा वसुलीला सुरुवात केली होती. शेतकऱ्यांनी वसुलीचा धास्तीने कुणी बकरं तर कुणी कोंबडं, कुणी दारू तर कुणी गळ्यातील कुडका-मुडका दागिना देऊन तात्पुरती वसुली थांबवत होत. अगोदरच पंढरपुराला जाऊन पैस्याने नागोळ होऊन आलेल्या तुकारामजवळ फुटकी कवडीही नव्हती. ठरल्याप्रमाणे वसुली अधिकारी तुकाराम चव्हाण यांचा घरी आले आणि जे मिळेल ते काढून घेण्याचा प्रयत्न करत होते. पण दुर्देवाने त्यांचा जवळ काहीच मिळाले नाही. मग वसुली अधिकारी आपल्या पवित्र्यात यायला लागले. बघता बघता वसुली अधिकाऱ्यांनी तुकारामाचा घरातील सर्व सामान बाहेर काढायला लागले. त्यात पलंग, घरावरील पत्रे, संसारउपयोगी वस्तू, भांडीकुंडी रस्त्यावर काढून त्यांचा इज्जतीचे लचके तोडत होते. गावातही शेतकरी संघटनेचे बरेच कार्यकर्ते होते. प्रशासनाचा ताकतीपुढे कोणाचेही काहीही चालत नव्हते. कार्यकर्त्यांनी पाच किलोमीटर अंतरावर असलेला संघटनेचा बालेकिल्ला कामनगावात जाऊन सुरेशराव देशमुखांना झालेली हकीकत सांगितली. झालेल्या प्रकाराने सुरेशराव देशमुख आणि गावातील मूठभर कार्यकर्त्यानी कळगावचा दिशेने पायी मोर्चा वळवला.

कामनगावातील संघटनेचे कार्यकर्ते कळगावला येणार या धास्तीने वसुली अधिकाऱ्यांनीही उमरी पोलीस प्रशासनाची मदत बोलावून घेतले. कामनगावच्या पित्त खवळलेल्या आंदोलकांनी कळगावला जाताना हाडोळीतील कुंभाराचे गाढवं नेले. आता काही क्षणात प्रशासनाची आणि आंदोलनाचा पवित्र्यात असलेल्या कार्यकर्त्यांशी आमने सामने गाठ पडणार होती. वेळ झाली आणि सर्व अमोरासमोर आले. रस्त्यावर टाकलेला शेतकऱ्यांचा उभा संसार बघून देशमुख संतापले आणि जो जो आमचा आड येईल, त्या त्या सर्वांनाच गाढवावर बसून धिंड काढण्याचे आव्हान दिले. खवळलेल्या आंदोलकांच्या धास्तीने पोलीस प्रशासन माघारी परतले आणि वसुली अधिकारी मात्र चांगलेच गावले. आंदोलनकर्त्यांनी चपलांची माळ घालून सर्व वसुली अधिकाऱ्यांना आळीपाळीने गाढवावर बसून कळगाव, हाडोळी आणि कामनगावातून धिंड काढून त्या निर्दयी, क्रूर सक्तीचा बेकायदा वसुलीला लगाम लावला.

पुढे काही दिवसांनी संघटनेचे दुसरे धडाडीचे सहकारी हनमंतराव पाटलांचा नेतृत्वात लामकानी येथे सुद्धा वसुली अधिकाऱ्यांची गाढवावर बसून धिंड काढली गेली. सरकार आणि सरकारी ठगांचा मनात आता संघटनेचा नावाचं काहूर शिरलं होतं. जीवाच्या, अब्रूच्या आकांताने वसुली अधिकारी आता गावागावात जाऊन सक्तीची वसुली करण्यावर लगाम लागला होता. पण भू-विकास बँकेने मात्र आपला पवित्रा बदलला होता. गावात जाऊन सक्तीची वसुली करण्यापेक्षा शहरातच शेतजमीन लिलाव करून शेतकऱ्यांचा जमिनी बळकावण्याचे अभियान जोरात सुरू झाले.

🎯 शेतजमीन लिलाव कायमचे हद्दपार
बरोबर 15 दिवसांनी भू-विकास बँकेने उमरी येथे 101 शेतकऱ्यांचा जमिनीचे जाहीर लिलाल ठेवले. त्या दिवशी शरद जोशींची बिलोलीत सभा होती. गावातील बहुतांश कार्यकर्ते अगोदरच सभेला पोहाेचले होते. सुरेशराव देशमुख सभेला निघण्याचा तयारीत असताना 101 शेतकऱ्यांपैकी बेंबर येथील एका शेतकऱ्याने ज्यांना जंगमाचे महाराज म्हणून ओळखले जाते, त्यांनी देशमुखांना गाठवले. घडलेला प्रकार सांगितला. सुरेशराव देशमुख आणि काही कार्यकर्त्यांनी बिलोलीची सभा न करता भू-विकास बँक गाठवली.

भू-विकास बँकेत जाताच आग्यामोहोळ उठावा तसे कार्यकर्ते अधिकाऱ्यावर तुटून पडले. देशमुखांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावायला सांगत वरिष्ठांना कळगावातील ताजा प्रकरणाचा दाखला दिला. अगोदरचा भयग्रस्त असलेले अधिकारी आणि त्यावर अचानक झालेला हल्ला, त्यांना समजण्यापलीकडे होता. देशमुखांनी शेतजमीन लिलाव कायमचा रद्द करण्याची जी मागणी केली ती त्यांचा कडून अधिकृत लिहून घेत शेतजमीन लिलावांना कायमचे हद्दपार करून टाकले.

कामनगावातील लहान थोरांनी, बायका पोरांनी, तालुक्यातील बहुतांश गावांनी घेतलेल्या आंदोलनाचा आक्रमक पवित्र्यांनी सक्तीची वसुली आणि शेतजमीन लिलाव देवीचा रोगासारखे कायमचे बंद झाले. शेतकरी स्वातंत्र्याची आज पाहट होत असताना आंदोलनकर्ते गेली 30 वर्ष उलटून गेली असताना अजूनही न्यायालायचे उंबरठे झिजवत आहेत.

🎯 आंदाेलनात सहभाग
🔆 विदेशी पॉलीवस्त्रांची होळी – सन 1986.
🔆 बेकायदेशीर वसुलीला लगाम – सन 1994.
🔆 शेतजमीन लिलाव हद्दपार – सन 1994.
🔆 गृहमंत्र्याच्या सभेतील करारा जबाब – सन 1994.
🔆 सीमाबंदीतील कापसाचा रणसंग्राम – सन 1994.
🔆 कापूस आंदोलनाला हिंस्रक वळण – सन 1996.
🔆 बाळ ठाकरेंचा नांगर सभेतील झंझावात – सन 1997.
🔆 मग्रूर वजनमापे निरीक्षकास चोप.
🔆 वायदाबंदी विरोधात अक्रमक.
🔆 सक्तीच्या वीज बिलाने कार्यकारी अभियंत्यास काळे फासले.
🔆 विनापरवाना आरामिशन आंदोलन – सन 2006.

सुरेशराव देशमुखांनी एक नव्हे, दोन नव्हे, असंख्य शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करून स्वतःचा जीवाची पर्वा न करता अनेक आंदोलने रेटून पुढे नेली आणि शेतकरी लुटीची क्रूर परंपरा थांबवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!