Leopard : बिबट्या, प्रकृती आणि माणूस!
1 min readसंध्याकाळचे 6 वाजले होते. गावात गोठ्यात गुरांसाठी धूर करणे सुरू होतं. आम्ही काल रात्री गावात फिरून गेलो, ही चर्चा एव्हाना गावात झाली होती. त्यामुळे या वेळेला गावातल्या लोकांनी आम्हला चांगला प्रतिसाद दिला. चहा पाणी विचारलं आणि आता बिबट्याबद्दल (Leopard) भीती थोडी कमी आणि उत्सुकता जागी होत होती. पण, त्याच बरोबर अफवाही तेवढ्याच उठत होत्या. अशीच एक अफवा आली की, दांड्या वरच्या एका माणसाने बिबट्या पहिला. तो त्याच्या शेतात लोळत पडला होता. आता हा माणूस नेमका कोण कुठे राहतो, असं करत करत आम्ही बाजूच गाव पालथं घातलं आणि शेवटी आम्ही त्या माणसाच्या घरी येऊन पोहोचलो. त्याची लेक आम्हाला म्हणाली, बाबा तर घरीच आहेत, त्यांनी काही बिबट्या वगैरे पहिला नाही. तेव्हा ही अफवा असल्याचं समजल आणि प्रचंड वैताग आला होता.
आता पुन्हा नव्यानं शोध घ्यायला सुरू झाली. फार वेळ न दवडता ठरल्या जागी कॅमेरा ट्रॅप बसवून आम्ही बाजूच्या आंबोडे गावात जनजागृतीसाठी गेलो. गावकरी मंडळी आंबेडकर समाजमंदिरात बसली होती. आम्ही त्यांना बिबट्याच्या सवयी आणि माणसांनी घ्यायची खबरदारी, गावकऱ्यांचे प्रश्न शंका कुशंका दूर करून कार्यक्रम आटोपून आमच्या बिबट्या सफारीला निघालो.
आज आमची बिबट कमी घुबड सफरीच जास्त सुरू होती. रात्री आम्ही भवानगडच्या रस्त्याला फेरफटका मारत होतो. तिथे ही विजेच्या तारांवर ठिपक्यांचे घुबड बसले होते. अधेमधे कुत्र्यांचे आवाज येत होते. असं करत करत आम्ही खाटाळी गावातून फिरून घरी निघून गेलो. दुसऱ्या दिवशी पहाटेच मी कॅमेरा ट्रॅप काढायला आलो, तेव्हा समजलं भवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाड्यात बिबट्या येऊन गेला. मी तडक त्या पाड्यात गेलो, काही लोकांशी चर्चा केल्यानंतर त्यातल्या एकाने आमचा कुत्रा बिबट्याने उचलून नेला असं सांगितलं. रात्री 10 वाजताच्या सुमारास कुत्री जेव्हा भुंकत होती, त्यावेळी आमचा दरवाजा बंद होता आणि कुत्रा ओट्यावर पडलेला होता. त्याचवेळी त्याला बिबट्यानं उचलून नेलं. कुत्र्यांचा आवाज आणि खडबड झाल्यानं आम्ही बाहेर पाहिलं तेव्हा बिबट्या कुत्रा घेऊन जाताना दिसला.
ही नेमकी तीच वेळ होती, जेव्हा आम्ही भवानगडाच्या रस्त्याला फेरफटका मारत होतो. त्यावेळी कुत्री भुंकत होती, कदाचित त्याचवेळी बिबट्यानं ही शिकार केली असावी. म्हणजे त्यानं आम्हाला पाहिलं देखील असेल कदाचित पण त्यानं यावेळी देखील आम्हाला दर्शन दिलं नाही. मग, पुन्हा एकदा कॅमेरा लोकेशन बदलायच ठरवलं. कारण बिबट्या सतत गावं बदलत होता. त्यात तीनच कॅमेरा आणि गवत येणारे रस्ते अनेक, असे असल्यानं बिबट्याला कॅमेरात टिपण कठीण होऊन बसले होते.
जंगलात कॅमेरा ट्रॅप बसवणे अत्यंत सोपे असते. कारण एखादी जरी पाऊलवाट निवडली तरी त्यात खूप सारे प्राणी विशेषतः बिबटे आणि वाघ सहज टिपता येतात. कारण त्यांच्या पायाला गादी सारखं मांसल भाग असतो, ज्यामुळे शिकार करताना दबक्या पावलाने पुढे जाणं शक्य होतं. पण त्याचमुळे हे प्राणी बहुदा जंगलातली पाऊलवाट सोडून आड मार्गानं जात नसतात. पण गावात मात्र भरपूर रस्ते असतात. त्यामुळे बिबट्या नेमका कोणत्या रस्त्यानं येईल काहीच अंदाज बांधता येत नाही.
शेवटी पुन्हा एकदा बिबट्याच्या प्रमाणे विचार करू लागलो. गावात गुरं कोणत्या रस्त्यानं ये जा करतात, ते पाहू लागलो. एकूण दोन पायवाटा गावामागून येतात त्यातल्या एका पायवाटेवर उंच बाभळीचे झाड होतं, त्या झाडाखाली कोंबडीची पिसं पडलेली मिळाली. नीट पाहिलं तर झाडावर बिबट्यानं नखाने खुणा देखील केल्या होत्या. आता मला नेमकं बिबट्याचं झाड मिळालं होतं आणि कदाचित तो हीच पाऊलवाट गावात ये जा करण्यासाठी देखील वापरत होता. मग या पाऊल वाटेवर एक कॅमेरा ट्रॅप बसवायचं ठरल. सोबत म्हशी एका दुसऱ्या रस्त्याने जिथं खूप चिखल होता, तिथून गावात येत होत्या. त्याठिकाणी देखील कॅमेरा ट्रॅप बसवायचं ठरवून मी संध्याकाळी पुन्हा आलो. ठरल्याप्रमाणे कॅमेरा ट्रॅप बसवून मी घरी निघून आलो.
आज कुठलीच गस्त घालत बसायचं नाही, आराम करायचं आणि उद्या सकाळी कॅमेरा बघायचा. दुसऱ्या दिवशी मी पोहोचण्या आधी वनविभाग पोहोचलं होतं, त्यांनी एक एक करत ट्रॅप कॅमेरे तपासायला सुरुवात केली आणि पाहतो तर बाभळीच्या रस्त्यावरून बिबट्या गावात शिरताना कॅमेरा ने टिपला होता.
माझा अंदाज बरोबर होता. हा एक किशोवयीन नर होता, जो नुकताच शिकार शिकला होता. एवढे दिवस रात्र ज्या एका फुटेजसाठी खटपट करत होतो, ती मिळाली होती. ते राजबिंडे देखणे जानवर पाहून मी खूप खूष झालो. पण त्यानंतर बिबट्या हळूहळू गावात दिसायचा बंद झाला होता. कदाचित त्यानं गाव सोडलं असावं अथवा तो शिकार आणि मानवी स्वभाव शिकला असावा. अधेमधे गावातल्या कोंबड्या, कुत्री गायब होत राहिली पण कोणाचं बांधलेलं जनावर वगैरे कधी धरून नेलं असं आजपर्यंत ऐकवित नाही आलं.
माझं तिथल काम आता संपलं होतं. गावातल्या लोकांनी बिबट्याबरोबर राहणं आणि बिबट्यानं गावातल्या लोकांना न दिसता माणसांच्या सोबत राहणं शिकून घेतलं होतं. अशाप्रकारे बिबट्याला न पकडता एकही माणसाचा जीव न गमावता आम्ही सर्वांनी मिळून हा संघर्ष संपवला होता. बिबटे सहसा निरुपद्रवी असतात. त्यांच्या येण्यानं गावात पिकांची नासधूस करणारी रानटी डुकरांचा बंदोबस्त होतो. आपण आपण नेहमी त्यांना भीत राहतो. आपल्यापेक्षा जास्त ते आपल्याला घाबरत असतात, ही वास्तूस्थिती आहे. परंतु, काही वेळी आपल्या चुकांमुळे आपणच त्यांना नरभक्षक देखील बनवतो.
बहुदा किशोरवयीन बिबटे अथवा म्हातारे झालेले शिकार करण्यास थोडेसे अकुशल बिबटे नरभक्षक होऊ शकतात. बिबट्यानं केलेली शिकार बिबट्याचं वय, त्याच्या सवयी असं खूप काही सांगून जाते. उदा. शिकार केल्यानंतर बिबट्या तिचा कोणता भाग खातो, त्यावरून त्याच्या वयाचा अंदाज घेता येतो. जर त्यानं मांडीचा भाग खाल्ला तर बिबट्या तरुण आहे असं समजल जातं. तर त्यानं जर शिकारीचा पोटाचा भाग खाल्ला असेल तर तो कदाचित म्हातारा असावा असा अंदाज बांधता येतो. म्हाताऱ्या बिबट्याचे दात कमकुवत झाल्यानं त्याला मांडीचा भाग खाता येत नाही. त्यामुळे तो पोटाजवळचा मांसल भाग खातो, असं समजल जातं.
जर बिबट म्हातारा असेल आणि तो लोकवस्तीजवळ आला असेल तर, थोडी जास्त काळजी घ्यावी लागते. ज्यामध्ये घराबाहेर शौचाला जाणे टाळणे, शक्य नसल्यास सोबत कोणाला तरी घेऊन जाणं लहान मुलांना पहाटे आणि संध्याकाळच्या वेळी एकटं न सोडणे, पाळीव प्राणी बंदिस्त गोठ्यात ठेवणे, विशेष करून कोंबड्या रात्री झाडावर बसता कामा नये, अशा लहान लहान गोष्टी केल्यास बिबट्यापासून कोणताही धोका राहत नाही. बिबटे तीन फुटाच्या खाली जे काही आहे, त्यावर शिकार करतात. माणूस जेव्हा शौचाला बसतो, त्यावेळी तो त्याच्या सावजाप्रमाणे भासतो आणि चुकून बिबट्यानं शिकार केली तर त्यानंतर माणूस हे सहज सोपे शिंग, दात नसलेलं सावज आहे हे बिबट्याला कळतं आणि मग तो नरभक्षक होतो. त्यामुळे कित्येक लोकांचे बळी घेतो. म्हणून आपण नरभक्षक घडवत असतो, असं मी म्हणतो.
बिबट्याच्या पावलांचे ठसे देखील खूप काही सांगून जातात तो जखमी आहे का? त्याच वय किती असेल? अशा इत्यादी अनेक गोष्टी केवळ ठसे पाहून समजतात. मादी बिबट्याच्या मागच्या पायाची पॅडलेंथ साधारण 8 सेंटिमीटरपर्यंत असते तर नराच्या मागच्या पायाची पॅडलेंथ 10 ते 12 सेंटिमीटर असते. किशोरवयीन पिल्लांच्या पायाचे ठसे पाहिल्यास बोटं पॅड म्हणजेच गादीला चिकटलेली दिसतात. बहुदा बिबटे चालताना त्याच्या पुढल्या पायावर मागचां पाय टाकत असतात. परंतु ते जखमी असल्यास हे पॅटर्न बदलते आणि बिबट्या जखमी असावा, असा अंदाज बांधता येतो, अशा किती तरी गोष्टी आहेत, ज्या नीट निरखून पहिल्यास सहज समजतात. फक्त डोळे आणि दिमाग उघडा असला पाहिजे.
माणसानं प्रकृतीसोबत मिळून जुळून राहिलं पाहिजे, जसे आपले पूर्वज राहत होते. आज माणूस निसर्गापासून खूप दूर गेला आहे. त्यामुळे त्याला साध्यासाध्या किड्यामुंग्यांची देखील भीती वाटू लागली आहे. या भीतीतून आणि असुरक्षेच्या भावनेतून तो अधिकाधिक क्रूर आणि आक्रमक होत चालला आहे. म्हणून पुन्हा जुन्या प्रकृतीसोबत मिळताजुळत घेऊन पुन्हा माणसानं प्रकृतीचा एक भाग व्हावा म्हणून हा खटाटोप.