Sugarcane Rate : शेतकऱ्यांनो, साखर कारखान्यांना उसाला 3,500 रुपये दर मागा!
1 min read
सन 2017-18 च्या हंगामासाठी उसाची FRP 2,550 रुपये प्रति टन असताना केंद्राने साखरेची किमान विक्री किंमत (MSP) प्रती क्विंटल 2,900 रुपये जाहीर केली होती. पुढे सन 2019-20 साठी FRP 2,750 रुपये झाल्यावर साखरेची MSP 3,100 रुपये क्विंटल केली. परंतु सन 2017 पूर्वी केंद्रातील कोणत्याही सरकारने साखरेची किमान विक्री किंमत (MSP) नेमून दिली नव्हती. मात्र, सन 2017-18 मध्ये जागतिक व देशांतर्गत बाजारात साखरेचे दर 2,600 ते 2,400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरल्याने केंद्राने 2,900 रुपये MSP नेमून दिली. याचा अर्थ साखर कारखान्यांनी 2,900 रुपयांपेक्षा कमी दराने साखर विकायची नाही. पुढे हे दर 3,100 रुपये करण्यात आले.
गेले दोन वर्षे बाजारातील साखरेचे दर 3,100 रुपये/क्विंटलपेक्षा चढे राहिल्याने आता साखरेच्या MSP ला अर्थ राहिलेला नाही. तरीही साखरेची MSP 3,750 रुपये प्रति क्विंटल करायला हवी. नाहीतर उसाची FRP पूर्णपणे देता येणार नाही, असा शेतकऱ्यांना भीती दाखवणारा कांगावा करत महाराष्ट्र को ऑप शुगर फॅक्टरी फेडरेशनचे चेअरमन पी. आर. पाटील व खासगी कारखानदारांच्या ‘विस्मा’चे चेअरमन बी. बी. ठोंबरे यांनी तशा मागणीचे पत्र केंद्राला पाठवले आहे.
मात्र, दरवर्षी उच्चांकी दर देत, यंदाच्या उसाला प्रति टन 3,500 रुपये दर देण्याचे गुजरातमधील गणदेवी साखर कारखान्याने जाहीर केले आहे. ते महाराष्ट्राप्रमाणेच 700 रुपये तोडणी व वाहतूक खर्च वजा करून हा दर देत आहेत. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील कारखान्यापेक्षा कमी रिकव्हरी असून व कोजनरेशन प्रकल्प नसताना गुजरातमधील कारखान्यांनी उच्चांकी दराची परंपरा राखली आहे. हे कारखाने साखरेचे संपूर्ण उत्पन्न उसाची किंमत म्हणून देतात व उपपदार्थ उत्पन्नातून गाळप खर्च भागवतात. याकडे महाराष्ट्रातील साखर कारखानदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.
महाराष्ट्रात सहकारी कारखाने सभासदांचे नव्हे, तर पुढाऱ्यांच्या खासगी जहागिऱ्या झाल्या आहेत. नुकतीच काही मंडळी सहकारी कारखाना खरेदीच्या व्यवहारातून कारवाया होऊ नयेत म्हणून पक्ष फोडून सत्तेत गेले आहेत. सभासद निष्क्रिय असल्याने कारखानदार आपलीच मुले- बाळे चेअमनपदी बसवत आहेत. मात्र सभासदांना फसवणारी, चुकीची परंपरा गुजरातमध्ये नसल्याने शेतकऱ्यांना चांगले भाव मिळताहेत. अलीकडे कारखानदारांच्या सुरात सूर मिसळत ‘शेतकरी नेते’ साखरेचा किमान विक्री दर प्रति क्विंटल 3,700 रुपये करा. उसाला प्रति टन 5,000 रुपये दर द्या, अशी अव्वाच्या सव्वा मागणी करत आहेत. काहीजण कारखान्यांमधील अंतराची अट काढा, अशी मागणी करत ‘आम्ही कारखाने काढून उसाला प्रति टन 5,000 रुपये दर देऊ’ असे म्हणताहेत. पण त्यामागचे अर्थशास्त्र सांगत नाहीत.
सन 2016 मध्ये साखर कारखानदार व खा. राजू शेट्टी यांच्या प्रयत्नाने साखरेच्या वायद्यावर सरकारने बंदी घातली. त्यामुळे यंदा जागतिक बाजारात साखरेचे दर 5,600 रुपये प्रति क्विंटल असताना भारताच्या निर्यातीला तो मिळवता आला नाही. परिणामी, कारखान्यांचे व शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
आमच्या शेतकरी संघटनेने SMS द्वारे कारखाना चेअरमनकडे ऊस बिल मागणीचे आंदोलन सुरू केले असून, पुढील टप्प्याचे आंदोलन ऑगस्टमध्ये करण्यात येईल.