Orange fruit dropping : संत्रा, माेसंबी फळगळीची कारणे व उपाययोजना
1 min readफळगळीची प्रामुख्याने वनस्पतीशास्त्रीय आंतरीक बदल, किडी आणि रोग ही तीन कारणे आहेत. एकूण फळागळीमध्ये 70 ते 80 टक्के फळे ही वनस्पतीमधील आंतरिक बदलांमुळे तर 8 ते 17 टक्के फळगळ ही कीटकांमुळे होते. 8 ते 10 टक्के फळे ही विविध रोगकारकांमुळे गळून पडतात. मृग व आंबिया या दोन बहारांपैकी अंबिया बहारात सर्वाधिक फळगळ दिसून येते. त्यामुळे फळगळीचे नेमके कारण शोधून त्यानुसार उपाययोजना कराणे गरजेचे आहे.
🌐 आंतरिक बदलांमुळे होणारी फळगळ
🔆 फळधारणेनंतर होणारी बरीचशी फळगळ प्रामुख्याने वनस्पतीशास्त्रीय आंतरिक बदलांमुळे होते. साधारणतः फळ 0.5 ते 2.0 सेंमी व्यासाची असण्याच्या म्हणजे वाढीच्या स्थितीत पाणी, कर्बोदके व संजीवके यासाठी स्पर्धा वाढते. त्यात पाणी किंवा उच्च तापमानाचा ताण असल्यास फळगळ वाढते. याउलट रोग किंवा यांत्रिक जखम, कार्बन-नत्राचे असंतुलन, अन्नद्रव्यांची कमतरता, पाण्याचा अभाव, अति आर्द्रता किंवा जमिनीत असणारा जास्त ओलावा या कारणांमुळे फळगळ वाढते. फळांच्या योग्य वाढीसाठी झाडावर पुरेशी पालवी (एका फळांसाठी साधारण 40 पाने हे प्रमाण) असावी.
🔆 वातावरणातील तापमान हा घटकसुद्धा फळगळीसाठी कारणीभूत असतो. कमी तापमानात फळगळ कमी असते तर उच्च तापमानात फळगळ अधिक दिसून येते.
🔆 खोल काळ्या भारी जमिनीतील संत्रा व माेसंबीच्या बागांमध्ये पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्यामुळे पाणी साचून राहते. जमिनीतील हवा व पाणी यांचे संतुलन बिघडते. श्वसन क्रियेकरिता जमिनीत 10 टक्के प्राणवायू आवश्यक आहे. अन्नद्रव्ये जमिनीतून घेण्याची क्रिया थांबते व तंतुमय मुळे सडतात. फुलगळ, फळगळ व पाने पिवळी पडणे, पानगळ होणे, पानाचा आकार लहान राहणे, शेंड्याकडून फांद्या वाळणे, सल येणे अशा लक्षणांसह फळगळ आढळते. पावसाळ्यात कधी कधी पाण्याची पातळी 1 मीटरपर्यंत येते, परिणामी झाडांची मुळे कुजतात.
🔆 जमिनीतील चुनखडीचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास पाणी झिरपण्याची क्रिया मंदावते. परिणामी, प्राणवायूचे प्रमाण कमी होते. स्फुरद, झिंक, मॅग्नेशियम, फेरस, बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते व रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे झाडांची मुळे सडतात. अनेक वेळा झाड आपोआप दगावते.
🌐 फळगळ रोखण्यासाठी उपाययोजना
🔆 फळधारणा होण्याच्या कालावधीत बागेची खोल मशागत करू नये. खोल मशागतीमुळे झाडांची मुळे तुटतात, जमिनीची जलधारणशक्ती वाढते, पाण्याचा निचरा होत नाही, परिणामी फळगळ होते.
🔆 वाढणाऱ्या फळांचे पुरेसे पोषण होण्यासाठी झाडावर भरपूर पालवी असावी. यासाठी शिफारसीनुसार खतांचा वापर करावा. झाडावर पुरेसे पाने असल्यावरच फवारणीचा अपेक्षित परिणाम होतो.
🔆 जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ उदा. 40 ते 50 किलो शेणखत, 7.5 किलो निंबोळी ढेप वापरावी. शेणखतासोबत ट्रायकोडर्मा 100 ग्राम, पीएसबी 100 ग्राम, सुडोमोनास 100 ग्राम, अॅझोटोबॅक्टर 100 ग्राम प्रति झाड यांचे मिश्रण झाडाच्या परिघामध्ये टाकावे.
🔆 रासायनिक खतासोबत झिंक सल्फेट 200 ग्राम, बोरॅक्स 250 ग्राम मातीत मिसळून द्यावे.
🔆 ही खते फवारणीद्वारे द्यावयाची असल्यास झिंक सल्फेट 0.5 टक्के व बोरॉन 0.1 टक्के फवारणी आंबिया फळांकरिता जुलै-ऑगस्ट महिन्यात आणि मृग बहाराच्या फळाकरिता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये करावी.
🔆 अंबिया बहारात झाडाला पाण्याचा ताण बसू देऊ नये. फळांच्या योग्य वाढीसाठी पाण्याचा पुरेसा पुरवठा करावा.
🔆 पावसाळ्यात बागेत शक्यतो पाणी साचू देऊ नये. पाण्याचा निचरा योग्य रीतीने होण्यासाठी उताराच्या दिशेने चर खोदावेत.
🔆 वेळोवेळी गळून पडलेली फळे ताबडतोब उचलून बागेबाहेर बाहेर कंपोस्ट खड्ड्यात पुरून टाकावीत.
🔆 एनएए 10 पीपीएम (1 ग्राम) किंवा जिब्रेलिक अॅसिड 15 पीपीएम (1.5 ग्राम) किंवा 2-4-डी 15 पीपीएम (1.5 ग्राम) यापैकी एका संजीवकासह युरिया 1 टक्का (1 किलो) अधिक कार्बेन्डाझिम 0.01 टक्के (100 ग्राम) प्रति 100 लिटर पाणी या द्रावणाची फवारणी करावी.
🔆 फळे काढणी केल्यावर झाडावरील सल काढावी. सल काढताना फांदीचा हिरवा भाग 5 सेंमी पर्यंत घेऊन सल काढावी. प्रत्येक वेळी सल काढणाऱ्या अवजाराचे निर्जंतुकीरण करावे. सल काढलेल्या झाडावर बुरशीनाशकाच फवारणी करावी.
🔆 अन्नद्रव्यांचा समतोल वापर करावा. अनेकवेळा बोरॉन कमतरतेमुळे मोठी फळे गळतात. या करिता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. अधिक व दर्जेदार उत्पादनाकरिता 10 वर्षांवरील झाडाकरिता शिफारशीत मात्रा 50 किलो शेणखत, 7.5 किलो निंबोळी ढेप, 800 ग्राम नत्र, 300 ग्राम स्फुरद, 600 ग्राम पालाश प्रति झाड यासह 500 ग्राम व्हॅम, 100 ग्राम स्फुरद विरघळवणारे जिवाणू, 100 ग्राम अॅझोस्पिरीलम, 100 ग्राम ट्रायकोडर्मा प्रति झाड देण्यात यावे. नत्र हे अमोनियम सल्फेटद्वारे द्यावे.
🔆 आंतरपीक घेताना हिरवळीचे किंवा मूग, उडीद व तत्सम पिके घ्यावीत. कपाशी सारखी पिके घेऊ नये.
🔆 सतत पावसाचे पाणी साचून राहल्यास व अतिशय आर्द्रतायुक्त परिस्थितीत फळगळ होत असताना बागेमध्ये तणनाशकाचा वापर टाळावा.
🔆 वाफ्याद्वारे पाणी देताना उखरी करताना झाडाच्या मुळ्या तुटणार नाहीत याची काळजी घ्यावी. उखरीनंतर कॉपर ऑक्सिक्लोराईड 3 ग्राम किंवा कार्बेन्डाझिम 1 ग्राम प्रति लिटर पाणी किंवा ट्रायकोडर्मा द्रावण वाफ्यात ओतावे. ठिबकद्वारे सिंचन करणाऱ्या बागेत उखरीची आवश्यकता भासत नाही.
🔆 वर्षभरात किमान दोन वेळा बोर्डो पेस्ट (1:1:10 या प्रमाणात चुना मोरचूद व पाणी घेऊन) पावसाळ्याच्या अगोदर व पावसाळ्यानंतर लावणे अत्यंत आवश्यक आहे.
🔆 अन्य सर्व फळ पिकांमध्ये फळगळ रोखण्याकरिता पीक उत्तेजकांची शिफारस केली जाते. शिफारशीनुसार त्यांचा वापर करावा.
🔆 फळगळ होऊ नये याकरिता बाग सशक्त तसेच रोगमुक्त ठेवणे. रोग आल्यास रोगाचे त्वरित व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
🌐 किडींमुळे होणारी फळगळ रोखण्यासाठी उपाययोजना
🔆 लिंबूवर्गीय फळझाडांमध्ये प्रामुख्याने रसशोषक पतंग, फळमाश सिट्रससिल्ला व कोळा या किडांमुळे फळगळ दिसून येते. त्यातही फळमाशा व रसशोषक पतंगामुळे सर्वाधिक फळगळ आढळून येते. ही फळगळ सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात दिसून येते.
🔆 फुले येतेवेळी सिट्रससिला या किडाचा प्रादुर्भाव होतो. तो टाळण्यासाठी डायमेथोएट 2 मिली किंवा इमिडाक्लोप्राड 0.5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
🔆 रसशोषक पतंगाकरिता विषारी आमिषे तयार करून बागेत ठेवावे. या करीता मॅलॅथिऑन 20 ग्राम अधिक 200 ग्राम गुळ किंवा खाली पडलेल्या फळांचा रस 2 लिटर पाण्यात मिसळून आमिष तयार करावे. रुंद तोंडाच्या दोन बाटल्यात वरील मिश्रण टाकून प्रत्येक 25 ते 30 झाडांमध्ये 1 या प्रमाणात ठेवावे.
🔆 फळमाशीच्या नरांना आकर्षित करण्यासाठी फळमाशी सापळे प्रती हेक्टरी 25 या प्रमाणात तोडणीच्या साधारण 2 महिने आधीपासून बागेत झाडांवर टांगून ठेवावेत.
🔆 बागेत एक दिवसाआड सायंकाळी 7 ते रात्री 10 च्या दरम्यान ओलसर गवत पेटवून व त्यावर कडूलिंबाच्या ओल्या फांदया /पाने ठेवून धूर करावा.
🌐 रोगांमुळे होणारी फळगळ रोखण्यासाठी
🔆 प्रामुख्याने कोलेटोट्रीकम ग्लोईओस्पोरिऑईडस, बोट्रीओडिप्लोडिआ थिओब्रोमी व काही अंशी अल्टरनेरिया सिट्री या बुरशीमुळे फळगळ होते.
🔆 कॉपर ऑक्सिक्लोराईड 3 ग्राम किंवा कार्बेन्डाझिम 1 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून 1 महिन्याच्या अंतराने जुलैपासून 3 फवारण्या कराव्यात.
🔆 वाढ होणाऱ्या आंबिया बहराच्या संत्रा मोसंबी फळझाडांसाठी शिफारस केलेल्या मात्रेमध्ये मुख्य (डीएपी 1 किलो) व सूक्ष्म (150 ग्राम झिंक सल्फेट) अन्नद्रव्यांच्या मात्रा द्याव्यात.
🔆 पावसामध्ये तीन-चार दिवसांचा सलग खंड पडल्यास जीए-3 1.5 ग्राम+ कॅल्शिअम नायट्रेट 1.5 किलो + 15 ग्राम स्ट्रेप्टोसायक्लिन 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पंधरा दिवसांनी 2-4-डी किंवा एनएए 1.5 ग्राम + 300 ग्रॅम बोरिक ॲसिड + थायोफनेट मिथाइल/कार्बेंडाझिम 100 ग्राम + मोनोपोटॅशिअम फॉस्फेट (00:52:34) 1.5 किलो 100 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
🔆 सलग तीन चार दिवस पाऊस लागून आल्यास झाडांवर ॲलिएट 2. ग्राम ची फवारणी करावी. गरज पडल्यास दुसरी फवारणी मेटालॅक्झील 4 टक्के + मॅनकोझेब 64 टक्के या बुरशीनाशकाची 2.5 ग्राम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
🔆 काढलेली सल बागेत न ठेवता तिचा नायनाट करावा.
🌐 संत्रा फळगळ कमी करण्यासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन
🔆 शिफारशीप्रमाणे खताची (सेंद्रीय व रासायनिक) मात्र योग्य प्रमाणात व योग्य वेळी द्यावी. नत्राची अर्धी मात्र पहिलेपाणी देण्याचे वेळी द्यावी व अर्धी फळे वाटण्याएवढी झाल्यावर द्यावी. खते हे रिंग पद्धतीनेच द्यावीत.
🔆 पाण्याच्या पाळ्या 8 ते 12 दिवसांच्या अंतराने द्याव्या. पाणी प्रमाणात व दुहेरी रिंग पद्धतीने द्यावे. पाणीटंचाई असल्यास उभ्या, आडव्या दांड पद्धतीने किंवा अर्ध आळे पद्धतीने द्यावे. ठिबक सिंचनाची सोय असल्यास अधिक चांगले.
🔆 पावसाळ्यात बागेत पाणी साचू न देता पाण्याचा निचरा होण्याची काळजी घ्यावी. मुख्यात : ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात बागेत पाणी साचून राहत असल्यास दोन किंवा तीन ओळीत एक या प्रमाणात उथळ चर काढून पाणी बागेच्या बाहेर काढावे.
🔆 बागेच्या भाेवती दक्षिण व पश्चिम दिशेस वारा प्रतिबंधक झाडे लावावीत. उदा. हेटा, शेवरा, कॅझुरीना इत्यादी.
🔆 दोन्ही बहरात फळे वाटाण्याएवढी झाल्यानंतर 1 ग्राम एन.ए.ए. किंवा 1 ग्रॅम जिब्रेलिक अॅसिड आधी अल्कोहोलमध्ये विरघळवून 100 लिटर पाण्यात मिसळावे. त्यात एक किलो युरिया मिसळावा. याच प्रकारच्या दोन फवारण्या 40 दिवसांच्या अंतराने घ्याव्यात. पावसाळ्यात फवारणी करताना
याच द्रावणात कार्बेन्डीझम (बाव्हिस्टीन) हे बुरशीनाशक 1 ग्राम प्रती लिटर पाण्यात मिसळावे. मृग बहाराची फळे पावसाळ्यात काळी/करडी होऊन गळत असल्यास ऑलिएट हे बुरशीनाशक 2 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
🔆 फळातील रस शोषण करणाऱ्या पतंगाचा प्रादुर्भाव सप्टेंबर, ऑक्टोबर आणि जानेवारी, फेब्रुवारी या दरम्यान आढळतो. यासाठी बागेच्या परिसरातील अळीच्या खाद्य तणांचा नाश केल्यास पतंगाचा उपद्रव कमी होण्यास मदत होते. तसेच बागेत रात्री धूर केल्यास पतंगांना फळांपासून पळवून लावता येते.
🔆 पसरट भांड्यात केरोसीन मिश्रीत पाणी घेऊन त्यावर विद्युत बल्बचे सापळे पाण्यात किंवा संत्र्याच्या रसात कीटकनाशकाची आमिष तयार करून मोठ्या तोंडाच्या उथळ डब्यात झाडावर लटकविल्यास पतंगांवा प्रादुर्भाव कमी होतो.
संत्रा मार्गदर्शन बद्दल माहिती
Santra Badal margdarshan karne
संत्रा मार्गदर्शन