krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Shankhodar’s Journey : शंखोदरचा प्रवास… मातीचा प्रवास….!

1 min read
Shankhodar's Journey : असं म्हणतात, प्रभू श्री रामाने वाढवण येथील शंखोदर (Shankhodar) येथे त्यांच्या वडिलांचे पिंडदान केले. हीच जागा निवडली, त्यामागे काही लोकं म्हणतात, इथे पूजेचे शंख (Conch) मिळतात, तर काही म्हणतात, इथे परशुरामाचे वास्तव्य आहे. श्रीमद् भागवत गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, 84 दश लक्ष योनीनंतर एखाद्या आत्म्याला पुन्हा मानव देह मिळतो. आता ह्या सर्वाचा वाढवण शंखोदरशी संबंध काय? पंचक्रोशीतील लोकं वाडवडिलांच्या अस्थी इथेच का विसर्जित करतात?

ह्या सगळ्याचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर, आपल्याला पुन्हा आईच्या गर्भात जावं लागेल, जिथून ह्या सचेतन शरीराची सुरुवात झाली. तर, आपण ह्या मातीतून जन्माला येतो, म्हणजे नक्की काय? तर मातीच विविध खनिजे तयार करते, त्यातून वनस्पती, प्राणी, मासे इत्यादींची उत्पत्ती होते. जे खाऊन आपण आपल्या आईच्या गर्भात जीवनाची सुरुवात करतो. कारण आपल्या आईच्या शरीरात इथल्या मातीत वाढलेले भात, इथल्या खाडी समुद्रात वाढलेली मासळी अन्न म्हणून जात असते. जी एक चेतना संपवून म्हणजेच भाजीपाल्याचे शरीर सोडून मासळीचे शरीर धारण करते. मासळीचे शरीर आपल्या शरीरात संपवून आणखीन नवीन जीवनाच्या प्रकारात बदलत जाते, अज्ञान अबोल, निर्बुद्धतेकडून म्हणजेच एका जीवनाच्या प्रकारापासून नवीन अधिक अद्यावत जीवनाच्या प्रवासाकडे जात असते. अशाप्रकारे खनिज रुपात पडून असलेली माती आपल्या आईच्या गर्भात जाऊन सचेतन होऊन उठते.

त्यातून तुमचा, माझा आणि सर्वांचा जन्म झालेला आहे. आपण हा प्रवास एक ना एक दिवस ह्या जीवन प्रकारातून संपवून पुढल्या जीवन प्रवासाकडे जाणार हे अंतिम सत्य आहे. आणि पुन्हा एकदा ह्या सजीव मातीचा प्रवास निर्जीव मातीकडे आणि तिथून पुन्हा नव्याने सजीव जीवनाकडे होत राहणार आहे. म्हणून आपण हा मातीचा प्रवास लवकर व्हा,वा ह्या हेतूने आपले शरीर जाळून टाकतो. ज्यामुळे शरीरात असलेली माती, खनिजे लवकर निसर्गात विलीन होतात. असे झाल्याने पुन्हा एकदा आपल्या मातीचा 84 दशलक्ष योनी मधून प्रवास सुरू होतो.

आपण ज्या ठिकाणी मातीमोल होतो, तिथं आपल्याच मातीतून गवत उगवत, ते गाय, बैल, इतर प्राणी खातात, पुढे ह्यातून चेतना शक्ती गायीच्या गर्भात वाढून आपणच वासरू म्हणून जन्माला येतो. तर कोणी गवत, ताणातून फुलपाखरू होऊन उडते, नंतर त्यातून पुढे सरकत सरकत ह्या योनी, जीवन प्रकारातून life forms मधून दुसऱ्या जीवन प्रकारात आकार घेत राहत. ह्या निरंतर चेतना शक्तीची एकूण गोळा बेरीज नेहमी असते तेवढीच राहते. हेच भौतिक शास्त्र देखील सांगते. ‘Energy can not be created and can not be distroyed it is always transform from one form to the other.’ हेच जीवनाचं देखील आहे. जीवन हे नित्य बदलणारे असते. एक पणती विझली की, दुसरी नव्यानं पेटते. हेच भगवत गीतेतील सार आहे.

तसे होत असताना आपण आपल्या ठाई असलेल्या चेतना शक्तीने कुठली कर्म करतो. त्यावरून आपल्याला पुढल्या जन्मी नवीन देह मिळतो. जर आपल्या या जन्मीच्या कर्मामुळे इथला समुद्र खाड्या बरबाद होणार असेल तर, त्याच खाड्यात मिसळलेली आपली माती आपल्याला पुढील जन्म माशाच्या रूपात देईल आणि या जन्मी केलेल्या पापाची फळं म्हणून प्रदूषित खाडीत माशाचा जन्म मिळेल. पण या जन्मी जर त्या वाचवण्यासाठी धडपड केली तर पुढील जन्म माशाच्या रुपात पाण्यातला वाढवण इथला स्वर्ग अनुभवायला मिळेल.

असं म्हणतात बारा अवतारांपैकी पहिला अवतार माशाचा आणि शेवटचा कृष्णाचा म्हणजेच मानव शरीराचा आणि म्हणून कदाचित आपण मानवी देह संपला की, त्याची राख नदीत मिसळत असतो. तिथून पुन्हा एकदा माश्याच्या रुपात आपल्या मातीचा नवीन प्रवास सुरू होतो. म्हणून वाढवण सारख्या विविध जैविक साखळी, जैविक विविधता असलेल्या स्थळी आपली अस्थी विसर्जन केल्यास आपल्या मातीचा प्रवास इतर ठिकाणच्या तुलनेत लवकर सुरू होतो. आपली माती इथल्या सागरी शेवाळात जाते. ती शेवाळ खाऊन मासळी वाढते आणि ती मासळी एखादी गर्भवती स्त्री खाऊन लवकर मानवी शरीरात येते. चेतना शक्तीचा हा प्रवास विविध जीवनाच्या प्रकारातून लवकर पूर्ण होऊन पुन्हा लवकर मानवी शरीर धारण करण्यास मदत होते.

थोडक्यात सांगायचं तर, जैवविवधतेने नटलेली वाढवण सारखी स्मृती स्थळे मातीचा हा प्रवास लवकर घडवून आणतात आणि आपले वाडवडिलांची राख आपण इथेच मिसळत आलो आहोत. इथलेच विविध मासे आपण खातो. ज्यामुळे पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे आपण आपल्या वाडवडिलांच्या खनिज रुपी अचेतन, निर्गुण निराकार शक्तीला, आपल्याच बायकोच्या गर्भातून सगुण, साकार रूप देत असतो. आपल्या मुलाबाळांच्या, नातवंडांच्या रुपाने, आपल्याच वाडवडिलांची माती पुन्हा एकदा आपल्याला येऊन भेटते. म्हणून मातीचा हा प्रवास असाच सुरू रहावा, यासाठी वाढवण शंखोदर हे जैविक आणि धार्मिक वारसा स्थळ म्हणून घोषित करून त्या ठिकाणी वाढवण बंदर प्रकल्प कायमचा रद्द केलाच पाहिजे. तर आणि तरच तुमच्या, माझ्या वाडवडिलांची माती, तुमची माझी भविष्यात होणारी माती पुन्हा आपल्या भावी पिढीला येऊन मिळेल. आपण कुठेच जात नसतो, आपला फक्त प्रकार आणि आकार बदलत जातो. आपली गुणसूत्र आपल्या मुलात, नातवात उतरतात आणि आपलीच माती नव्यानं रूप बदलत पुन्हा पुन्हा इथेच येत राहते.

म्हणून आपण जमिनीचे मालक नसतो जमीन आपल्याला जीवन उसन देत असते आणि पुन्हा एकदा हे उसनवारी मिळालेलं जीवन जर सुखाने जगायचं असेल तर, तुमच्या, माझ्या पुढील जन्मासाठी पृथ्वी जशी आज आहे, तशीच उद्या पण राहील ह्याची काळजी घेतली पाहिजे.
सरते शेवटी तुकोबांच्या अभंगांचा काही भाग सांगेन,
हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा,
विसरन व्हावा तुझा विसर न व्हावा,
तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी,
न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा….
तुमच्या माझ्यात ज्या वासना आसक्ती आहेत त्यांचा नाश होऊदे, ह्या पृथ्वीच्या चराचरात देव आहे, ह्याचा विसर न पडो, तर आणि तर ही पृथ्वी जशी काल होती तशी आज आणि उद्या राहील आणि प्रत्येक नवीन जन्माला 9 महिन्यांचा गर्भवास सुखकर होऊन पुढील मातीचा, जीवनाचा प्रवास सुखरूप होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!