krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Fertigation : फर्टिगेशन म्हणजे काय (भाग – 2)

1 min read
Fertigation : जमिनीमध्ये एकूण 17 अन्नद्रव्ये उपलब्ध असली, तरी त्याचे प्रमाण कमी अधिक आढळते. महाराष्ट्रातील जमिनीत पालाश जास्त प्रमाणात असून, स्फुरद आणि नत्र या अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते. सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाणही कमी अधिक असते. त्यामुळे फर्टिगेशनला (Fertigation) विशेष महत्त्व आहे.

जमिनीत कोणत्याही अन्नद्रव्यांची कमतरता असल्याचा त्याचा परिणाम पिकांच्या वाढीवर होतो. हे टाळण्यासाठी माती परीक्षण (Soil testing) करण्याची आवश्यकता असते. माती परीक्षण अहवालानुसार आपल्या जमिनीतील मुख्य अन्नद्रव्ये (Major Nutrients) आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे (Micronutrients) नेमके प्रमाण समजू शकते. हे समजल्यावर कमतरता असलेल्या घटकांची रासायनिक खताद्वारे नेमक्या प्रमाणात पूर्तता करता येते.

पारंपरिक खतांमध्ये उदा. सुपर फॉस्फेट (Super phosphate), डाय-अमोनिअम फॉस्फेट (Di-ammonium phosphate), म्युरेट ऑफ पोटॅश (Murate of Potash) ही खते 100 टक्के पाण्यात विरघळत नाहीत. संपूर्ण जमिनीवर किंवा गाडून दिल्याने मातीतील खनिज पदार्थांच्या संपर्कात आल्याने त्यांचे स्थिरीकरण होते. पिकासाठी दिलेल्या पाण्यासोबत त्यांचा निचरा होतो. एकूण खतांची कार्यक्षमता कमी होऊन पिकांसाठी उपलब्धता कमी होते. या समस्येवर मात करण्यासाठी पाण्यामध्ये संपूर्ण विद्राव्य अशा सरळ, संयुक्त, मिश्र रासायनिक खतांची निर्मिती झाली आहे. ही खते ठिबक व तुषार सिंचनाद्वारे पाण्यासोबत विरघळून देता येतात.

तीव्र कमतरता असलेल्या तातडीच्या स्थितीमध्ये फवारणीद्वारेही या खतांची पूर्तता करता येते. त्याचे नियोजन पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार करावे लागते. फवारणीवेळी वनस्पतीच्या पानांशी चिकटून राहण्यासाठी चिकट द्रव्यांचा वापर करावा. फवारणीसाठी चिलेटेड (chelated) स्वरुपातील खते 1 किलोच्या पॅकेजिंगमध्ये विविध कंपन्यांद्वारे उपलब्ध आहेत. ही खते पिकांना त्वरित उपलब्ध होतात.

सूक्ष्म सिंचन पद्धतीतून देण्यासाठीही संपूर्ण विद्राव्य खतांच्या विविध श्रेणी उपलब्ध आहेत. हे पॅकेजिंग प्रामुख्याने 25 किलोमध्ये मिळतात. ही खते पाण्यासोबत पिकांच्या मुळांच्या कक्षेत दिली जात असल्याने पिकांना लवकर उपलब्ध होतात. पिकांची चांगली वाढ होते. शेतकऱ्यांच्या खते देण्याची वेळ, मजुरी, श्रम, खर्च यात बचत होते. पिकाची वाढ जोमाने झाल्याने रोगांना बळी पडण्याचे प्रमाण कमी होते. पिकाच्या वाढीनुसार खते देता येतात. खते विभागून जमीन, पिकाच्या व हवामानातील बदलानुसार देता येतात.

✴️ विद्राव्य खते द्या फवारणीद्वारे
साधारणतः पानांत असलेल्या अन्नद्रव्याच्या पातळीवर पिकांची उत्पादनक्षमता ठरते. पीकवाढीच्या निरनिराळ्या अवस्थेत त्यांची गरज वेगळी असते. त्यानुसार संतुलित प्रमाणात ही अन्नद्रव्ये पुरवल्यास पिकांची वाढ चांगली होते. फवारणीद्वारे विद्राव्य खते दिल्यास ती त्वरित वनस्पतींना उपलब्ध होतात. त्यामुळे कमतरता असलेल्या अन्नद्रव्यांची पूर्तता करण्यासाठी फवारणी हा मार्ग उपयुक्त ठरतो. विद्राव्य खते घन व द्रवरूप स्वरुपात उपलब्ध असून, वाहतूक, साठवणूक आणि वापरणे सुलभ ठरते. त्यांच्या किमती पारंपरिक खतांच्या तुलनेत अधिक आहेत. मात्र त्यांची गुणवत्ता आणि उपयुक्तता लक्षात घेता फायदेशीर ठरू शकतात.

✴️ फवारणीतून खते देण्याचे उद्देश
पिकांना उदिप्त करून त्यांची उत्पादन प्रक्रिया वाढविणे. अतिवृष्टीमुळे किंवा सतत पाऊसमानामुळे जमिनीतील खते वाहून जातात. तसेच पाणी साचल्यामुळे कार्यरत मुळे कार्यरत नसतात. अशा वेळी काही वेळ पाऊस थांबला असता फवारणीमधून खते देता येतात. ती पिकांना त्वरित उपलब्ध होतात. जमिनीतील पाण्याची कमतरता किंवा कडक उन्हाळा अशा परिस्थितीत फवारणीद्वारे खतांची पूर्तता करता येते. सायंकाळी अशी खते दिल्यास पाने कार्यरत राहतात. पीक अवर्षण स्थितीत तग धरू शकते.

✴️ महत्त्वाचे
फवारणीतून दिलेली खते जमिनीतून दिलेल्या खतांना पर्याय होऊ शकत नाहीत, हे लक्षात ठेवावे. या तंत्राचा वापर पानातील पोषणद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी करावा. विशेषतः फुलोऱ्यात, मोहोर येण्याच्या वेळी, फलधारणा, त्यानंतर फळांची वाढ होण्यासाठी अन्नद्रव्यांची अधिक मात्रा आवश्यक असते. अशा वेळी फवारणीद्वारे दिलेली खते उपयोगी पडतात.

✴️ काही प्रमुख विद्राव्य खते
✳️ 19:19:19, 20:20:20
या खतांना स्टार्टर ग्रेड (Starter grade) म्हटले जाते. यात नत्र अमाईड (Nitrogen amide), अमोनिकल व नायट्रेट (Ammonic and Nitrate) या तिन्ही स्वरुपात असतो. या खताचा उपयोग प्रामुख्याने पीकवाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी होतो.

✳️ 12:61:00
या खतास मोनो अमोनियम फॉस्फेट (Mono ammonium phosphate) म्हणतात. यात अमोनिकल (Amonic) स्वरुपातील नत्र (Nitrogen) कमी असतो. पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे (Phosphorus) अधिक प्रमाण असते. नवीन मुळांच्या तसेच जोमदार शाकीय वाढीसाठी तसेच फुलांच्या योग्य वाढीसाठी व पुनरुत्पादनासाठी या खतांचा उपयोग होतो.

✳️ 00:52:34
या खतास मोनो पोटॅशिअम फॉस्फेट (Mono potassium phosphate) म्हणतात. यात स्फुरद (Phosphorus) व पालाश (potassium) ही अन्नद्रव्ये भरपूर आहेत. फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे. डाळिंब पिकामध्ये फळांच्या योग्य पक्वतेकरिता तसेच सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत विशेषत्वाने वापरले जाते.

✳️ 13:00:45
या खतास पोटॅशिअम नायट्रेट (Potassium Nitrate) म्हणतात. यात नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण जास्त असते. फुलोऱ्यानंतरच्या अवस्थेत व पक्व अवस्थेत या खताची आवश्‍यकता असते. अन्ननिर्मिती व त्याच्या वहनासाठी हे खत उपयोगी आहे. या खतामुळे अवर्षण स्थितीत पिके तग धरू शकतात.

✳️ 00:00:50
या खतास पोटॅशिअम सल्फेट (Potassium sulfate) म्हणतात. पालाश (potassium) बरोबरच या खतांमध्ये उपलब्ध स्वरूपातील गंधकही (sulphur) असतो. पक्वतेच्या अवस्थेत हे खत उपयोगी पडते. या खतामुळे भुरीसारख्या रोगाचे नियंत्रण शक्य होते. तसेच पीक अवर्षण स्थितीत तग धरू शकते.

✳️ 13:40:13
पात्या, फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फुलगळ थांबून कपाशीची बोंडे व अन्य पिकांत शेंगाची संख्या वाढते.

✳️ कॅल्शिअम नायट्रेट (Calcium nitrate)
मुळांची वाढ होण्यासाठी तसेच पीक काटक होण्याच्या दृष्टीने वाढीच्या सुरुवातीच्या काळात व बोंडे किंवा शेंगावाढीच्या अवस्थेत या खताचा वापर होतो.

✳️ 24:24:00
यातील नत्र हा नायट्रेट (Nitrate) व अमोनिकल (Amonic) स्वरुपातील आहे. शाकीय वाढीच्या तसेच फुलधारणा त्याचा वापर करता येतो.

✳️ फवारणीसाठी द्रावण तयार करताना घ्यावयाची काळजी
पाण्यामध्ये खत विरघळवावे. खत पूर्णपणे विरघळेपर्यंत पाणी ढवळत राहावे. कॅल्शिअम जास्त असलेल्या पाण्यात थोडे गरम पाणी किंवा आम्लयुक्त पाण्याचा वापर करावा. अशा कॅल्शिअमयुक्त पाण्यात (calcium-rich water) कीटकनाशके (Pesticides), बुरशीनाशके (Fungicides), खते वापरण्याचे टाळावे. बोर्डो किंवा लाइम मिक्श्चर (Bordeaux or lime mixture) साठविलेल्या डब्यात खतांचे द्रावण तयार करू नये. फवारणी कडक उन्हाची वेळ टाळून करावी. फवारणीसाठी सकाळी 9 ते 11 व सायंकाळी 4 ते 6.30 ही वेळ योग्य मानली जाते.

🌐 माहिती सौजन्य :- डॉ. पपिता गौरखेडे. (मृदा विज्ञान व कृषी रसायन शास्त्र)

1 thought on “Fertigation : फर्टिगेशन म्हणजे काय (भाग – 2)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!